पहिल्या भारतीय पर्यटकाच्या म्हणजे गोपी थोटाकुरा यांच्या अंतराळ पर्यटनाला रविवारी सुरुवात झाली. भारतीय वंशाचे उद्योजक आणि वैमानिक असणारे गोपी थोटाकुरा हे अंतराळ पर्यटन करणारे पहिलेच भारतीय ठरले आहेत.
ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या ब्लू ओरिजिन या कंपनीतर्फे गोपी थोटाकुरा हे ‘एनएस – 25’ या मोहिमेसाठी पर्यटक म्हणून रविवारी अंतराळ सफारीवर निघाले आहेत. या मोहिमेत थोटाकुरा यांच्यासह आणखी पाच अंतराळ पर्यटक म्हणजे सिल्वेन कायरन, कॅरोल शॅलर, केनेथ एल. हेस, मॅसन एंजल आणि माजी हवाई दल कॅप्टन एड ड्वाइट हे सहभागी झाले आहेत.
अंतराळ पर्यटन ही संकल्पना गेल्या काही वर्षांपासून चर्चेचा विषय बनली आहे. हवाई वाहतूक क्षेत्रातील हा असा एक विभाग आहे, जो पर्यटकांना अंतराळवीर होण्याची संधी उपलब्ध करून देतो. यात मनोरंजन, विश्रांती किंवा व्यावसायिक हेतूंसाठी अंतराळ सफारी करता येतात.
1984 साली विंग कमांडर राकेश शर्मा अंतराळात जाणारे पहिले भारतीय होते. रशियातील साल्यूत ७ या अंतराळ स्थानकावरून रशियन अंतराळ यानातून शर्मा यांनी उड्डाण केले होते. तर थोटाकुरा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय पर्यटक ठरले आहेत.
जेफ बेजोस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ या कंपनीच्या ‘न्यू शेफर्ड’ या कार्यक्रमाअंतर्गत होणारी ही सातवी मोहीम असून मानवी इतिहासातील 25वी अंतराळ मोहीम आहे. आतापर्यंत एकूण 31जणांनी पृथ्वीच्या वातावरणाबाहेर अंतराळात उड्डाण करण्याचा पराक्रम केला आहे.
थोटाकुरा यांचा जन्म आंध्र प्रदेशातील. ‘एम्ब्री-रीडर एअरोनॉटिकल युनिव्हर्सिटी’मधून त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण झाले. प्रिझर्व्ह लाईफ कॉर्प या जागतिक केंद्राचे सहसंस्थापक म्हणून थोटाकुरा ओळखले जातात. व्यापक स्वास्थ्य आणि आरोग्य क्षेत्रात हे केंद्र काम करते. व्यावसायिक उड्डाणांसोबत विविध प्रकारची हौशी उड्डाणेही थोटाकुरा यांनी केली आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय वैद्यकीय वैमानिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले आहे.
अजून तरी नवीन संकल्पना असलेले अंतराळ पर्यटन ही अत्यंत महागडी गोष्ट आहे. अवकाशाबाहेर जाण्यासाठी एका प्रवाशाला साधारणत: किमान दशलक्ष डॉलर्सचा खर्च करावा लागतो. ही रक्कम अर्थातच बहुसंख्यांच्या आवाक्याबाहेरची आहे. याशिवाय अवकाश पर्यटनामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, केंब्रिज युनिव्हर्सिटी आणि मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील काही संशोधकांनी 2022 मध्ये या संदर्भात केलेल्या एका संशोधन हे निरीक्षण नोंदवले होते. अंतराळ यानामधून वायू आणि घन रसायने थेट वरच्या वातावरणात सोडली जातात. त्यामुळे वातावरणाच्या तापमानात अधिक वाढ होऊ शकते असेही या संशोधनात दिसून आले.
आराधना जोशी
(वृत्तसंस्थांच्या इनपुट्सवरून)