“मला आशा आहे की तरुण पिढी प्रेरित होईल,” हे उद्गार आहेत भारताचे अंतराळ नायक निवृत्त विंग कमांडर राकेश शर्मा यांचे. पहिले भारतीय अंतराळवीर होण्याच्या ऐतिहासिक घटनेला 40 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ते बोलत होते. अगदी 40 वर्षांपूर्वी प्रत्येक भारतीयाने अनुभवलेला अभिमान ते पुन्हा अनुभवत होते. तेव्हा अंतराळात जाणारे ते पहिले भारतीय ठरले. शर्मा नवी दिल्ली येथील रशियन सेंटरमध्ये आभासी (virtually) माध्यमातून बोलत होते. त्यांनी अंतराळातील त्यांचे अनुभव उपस्थितांना सांगितले. भारताने अंतराळात पाठवलेल्या पहिल्या नियोजित मानवयुक्त उड्डाणासाठी गगनयानच्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाबद्दलही त्यांनी भाष्य केले.या मोहिमेतील चार भारतीय अंतराळवीरांनी रशियातील स्टार सिटीमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. भारताचे पहिले अंतराळवीर शर्मा यांनीही त्याच ठिकाणी प्रशिक्षण घेतले होते.
“अनेकदा लोक मला विचारतात की मी जे प्रशिक्षण घेतले होते तेच प्रशिक्षण आताच्या चारजणांच्या गटाला मिळाले आहे का? आणि मला वाटते की त्याचे उत्तर होय असेच आहे,” असे शर्मा म्हणाले. गेल्या 40 वर्षातील तंत्रज्ञानातील बदलांबाबतही त्यांनी आपले मत व्यक्त केले. तांत्रिक प्रदर्शन आणि घटकांमधील सुधारणा तसेच विश्वासार्हतेवर त्यांनी भाष्य केले. ते पुढे म्हणाले, “पण मनुष्य बदललेला नाही. त्यामुळे, अंतराळ प्रवासातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण मानवी शरीराला ज्या प्रकारे तयार करतो त्यात कोणताही बदल झालेला नाही.”
“मानवी शरीर आणि आत्म्या यावरील शर्मा यांचा विश्वास पुढच्या पिढीला अजूनही प्रेरणा देत आहे, अर्थात ही गोष्ट मोठ्या प्रमाणात लोकांना ज्ञात नाही”. 50 हून अधिक लढाऊ वैमानिकांच्या पथकामधून निवडण्यात आलेल्या शर्मा यांच्या अनेक कठीण चाचण्या घेण्यात आल्या. 3 एप्रिल 1984 रोजी शर्मा यांची सोव्हिएत सोयुझ टी-11 मोहिमेसाठी निवड झाली. आज अनेकांच्या हे लक्षातही नसेल की त्यांच्यासाठी राखीव अंतराळवीर म्हणून रवीश मल्होत्रा यांची निवड झाली होती, जे एअर कमोडोर म्हणून निवृत्त झाले.
राकेश शर्माचे “सारे जहाँ से अच्छा हैं” हे शब्द त्यावेळी अत्यंत लोकप्रिय झाले होते. अंतराळातून भारत कसा दिसतो? असे विचारणाऱ्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना उत्तर देताना शर्मा यांनी हे उद्गार काढले होते. रशियन केंद्रातील कार्यक्रमात अंतराळ शास्त्रज्ञांनी म्हटल्याप्रमाणे हा संपूर्ण प्रकारच स्वप्नवत होता. भारत त्यावेळी अंतराळातील महासत्ता नसतानाही राकेश शर्मा यांच्या निवडीमुळे अशक्यप्राय गोष्ट शक्य झाली होती.
40 वर्षांनंतर,भारताची पहिली नियोजित अंतराळ मोहीम गगनयानसाठी ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशू शुक्ला यांची अंतराळवीर म्हणून निवड झाली आहे. शर्मा यांनी ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेतले त्याच ठिकाणी म्हणजे युरी गागारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये या चार अंतराळवीरांनी प्रशिक्षण घेतले आहे.
रशियाच्या या मिशनचे उपप्रमुख रोमन बाबुश्किन यांनीही पहिल्या भारतीय अंतराळवीराच्या ऐतिहासिक उड्डाणाच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त भाषण केले. भारत-रशिया अंतराळ संबंधांचा संदर्भ देताना ते म्हणाले की, तत्कालीन सोव्हिएत युनियन आताचा रशिया, अंतराळ क्षेत्रात नेहमीच भारताचा मित्र आणि भागीदार राहिला आहे. “आपल्याला 1975 मध्ये परत जाण्याची गरज आहे जेव्हा सोव्हिएत युनियनने भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट आणि नंतर 1979 मध्ये भास्कर प्रक्षेपित केला होता. आता, भारताने स्वत:चा अंतराळ कार्यक्रम विकसित केला असून, त्याला अंतराळ क्षेत्रातील महासत्तेचा दर्जा प्राप्त झाला आहे.”
अंतराळ क्षेत्रात रशिया-भारत सहकार्याच्या इतर मुद्द्यांबाबत बोलताना बाबुश्किन म्हणाले की, दोन्ही देश संयुक्त राष्ट्रांच्या बाह्य अंतराळ समितीत संवादाला चालना देण्यासाठी एकत्र काम करतील जेणेकरून अंतराळात शस्त्रास्त्रांची शर्यत रोखण्यात मदत होईल. संयुक्त राष्ट्रांच्या निर्णयावर लक्ष केंद्रित करताना बाबुश्किन म्हणाले, “रशियाने हा ठराव विचारार्थ सादर केल्यानंतर, संयुक्त राष्ट्रांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मसुदा ठराव मंजूर केला”. रशियन डी. सी. एम. ने पुढे स्पष्ट केले की या ठरावाला ‘अंतराळात पहिले शस्त्र तैनात करू नका’ असे शीर्षक देण्यात आले. त्याला 127 देशांकडून पाठिंबा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतरच्या काळात या क्षेत्रात अनेक महत्त्वाच्या चर्चा होणार आहेत आणि तसेच यासाठी लक्षणीय काम करण्याची गरज आहे. मात्र भारताच्या जेन झेड (नवीन पिढीतील) अंतराळप्रेमींनी बुधवारची संध्याकाळ राकेश शर्मा यांचीच असल्याचे एकमताने मान्य केले. एकजण आम्हाला म्हणाला, “माझा जन्म त्यावेळी झाला नसला तरी राकेश शर्मा यांनी नेमके काय साध्य केले हे माझी आई नेहमीच मला सांगत आई आहे आणि चांद्रयान-3 तसेच गगनयान लवकरच प्रत्यक्षात साकार होणार असल्याने इतर पिढ्यांना सांगण्याजोगा इतिहासही आपल्यासमोर असेल. अर्थात, आपण सांगणाऱ्या प्रत्येक कथेची सुरुवात राकेश शर्मा यांच्यापासून होईल.”
अश्विन अहमद