तशीच पोस्टर्स दुसऱ्या दिवशी, शनिवारी, 4 मार्च रोजी सकाळी देखील होती जी जिनिव्हा येथील एका मित्राने ओळखली होती. शनिवारी संध्याकाळपर्यंत या पोस्टर्स संदर्भातला व्हिडीओ ट्विटर, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवर संपूर्ण भारतात व्हायरल होत होता, तेव्हा स्वित्झर्लंडमधील ती पोस्टर्स गायब झाली होती.
भारताविषयी पूर्णपणे खोटी आणि द्वेषपूर्ण संदेश देणारी ही पोस्टर्स शुक्रवार, 3 मार्च 2023 रोजी एका विद्यार्थ्याने जिनेव्हा येथील यूएन चौकात पाहिली. ज्या ज्यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या महत्त्वाच्या बैठका नियोजित असतात त्यावेळी अशाप्रकारची पोस्टर्स अनेकदा पद्धतशीररीत्या त्या तारखांच्या वेळी प्रदर्शित केली जातात. एका विद्यार्थिनीने अनेक वेळा अशा पोस्टर्ससमोरून चालत जाताना कशी लाज वाटते, ही व्यथा सांगणारा व्हिडीओ बनवला आहे. मात्र दिवसेंदिवस हे असे मेसेज अधिकाधिक विचित्र आणि अधिक द्वेषपूर्ण होत चालले आहेत. या व्हिडीओमध्ये जे काही बघायला मिळाले ते द्वेषपूर्णच होते. आसामवर भारताचा ताबा आहे, भारत बलात्काराद्वारे दहशत निर्माण करत आहे, भारत सक्तीने नको असलेल्यांना बाजूला करत आहे, मणिपूरमधील वर्णद्वेष थांबवा आणि आसाम भारताच्या वेढ्यात आहे, अशा घोषणांनी (मजकूरांनी) भरलेली ही पोस्टर्स अनेकदा बघायला मिळाली.
तशीच पोस्टर्स दुसऱ्या दिवशी, शनिवारी, 4 मार्च रोजी सकाळी देखील होती जी जिनिव्हा येथील एका मित्राने ओळखली होती. शनिवारी संध्याकाळपर्यंत या पोस्टर्स संदर्भातला व्हिडीओ ट्विटर, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवर संपूर्ण भारतात व्हायरल होत होता, तेव्हा स्वित्झर्लंडमधील ती पोस्टर्स गायब झाली होती. अर्थातच, हे द्वेषपूर्ण संदेश तयार करणारी टोळी, भारतीय सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवून होती. त्यामुळे, भारताने कोणतीही कारवाई करण्याआधीच हे लोक त्या ठिकाणाहून पळून गेले. एकतर ते भारतातील लोकांच्या प्रतिक्रियेमुळे घाबरले होते किंवा बहुधा त्यांच्याकडे जिनिव्हा कॅन्टोनची (प्रशासनाची) आवश्यक परवानगी नव्हती आणि त्यांनी त्याचे शुल्क देखील भरले नव्हते. कारण काहीही असो, ते तिथून पळून गेले.
रविवारी जेव्हा भारताने स्विस राजदूताला यासंदर्भात पाचारण केले, तेव्हा त्याच्या 24 तास आधीच पोस्टर्स गायब करण्यात आली होती. या घटनेचे पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटून नयेत, याची काळजी घेत राजदूताला पाचारण करणे आवश्यक होते. केवळ ट्विटरवरच या व्हिडीओला एक दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत! स्वित्झर्लंडनेच या प्रकाराला नियंत्रित करण्यासाठी पावले उचलली होती, कारण भारतीयांच्या मनात जिनेव्हाबद्दलच्या निर्माण झालेल्या या नकारात्मक प्रतिमा बदलण्याची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे होते. स्विस राजदूताला विशेषत: रविवारी बोलावणे, खरंतर अपमानास्पद आहे! यापूर्वी कधीही असे घडले नव्हते.
यामागे कोण आहे, हे आता पाहूया. ही पोस्टर्स लावण्यासाठी जिनिव्हा प्रशासनाकडे परवानगी मागण्यासाठी उपलब्ध असलेला फॉर्म ट्विटरवर शेअर केला गेला आहे. त्यामुळे स्पष्टपणे, जिनिव्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे याबाबतची सर्व माहिती आहे आणि यामागे नेमके कोण आहे त्यांची नावे, पत्ते, दूरध्वनी क्रमांक हे सर्व तपशील त्यांच्याकडे आहे. जिनिव्हा येथील दूतावास, ज्यांनी वर्षानुवर्षे भारताला लज्जास्पद वाटणाऱ्या अशा पोस्टर्सकडे दुर्लक्ष केले, त्यांना हा मुद्दा जिनिव्हा प्रशासनासमोर मांडावाच लागेल. या लोकांची नावे आणि पत्ते विचारावे लागतील. तसेच अशा गोष्टींना यापुढे परवानगी देऊ नये, अशी विनंती करावी लागेल.
लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा की, त्या चौकात निषेध, पोस्टर्स झळकणे आणि असे प्रकार घडणे यात नवीन असे काहीच नाही. मात्र, नेहमीच घडणाऱ्या या प्रकारांमध्ये काही देशांतील लोक त्यांच्याच स्वतःच्या सरकारचा निषेध करत असतात. इतर शक्तिशाली देशांबद्दल कधीच काही बोलत नाहीत. महत्त्वाचे म्हणजे, पत्रकांचे वाटप करताना किंवा आंदोलनामागच्या भूमिकेबद्दल बोलणारे कोणीतरी तिथे उपस्थित असते. याउलट भारताशी संबंधित पोस्टर्स झळकावण्यामागचे कारण हे वेगळेच आहे. ही पोस्टर्स झळकावून तिथून पळ काढायचा म्हणजे, ते पोस्टर लावणारे कोण आहे, हे गुलदस्त्यात राहते. या लावलेल्या पोस्टर्सची जबाबदारी घ्यायला तिथे आजूबाजूला कोणीच नसते.
खरेतर, ती जगातील सर्वात महत्त्वाची जागा आहे. जिनिव्हाला भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकासाठी, संयुक्त राष्ट्रांच्या इमारतींच्या बाहेर आणि ब्रोकन चेअर या स्मारकासमोर एखादे तरी छायाचित्र (फोटो) काढणे आवश्यक असते. UNHRC, WIPO, ITU, आणि UN त्या चौकाकडे कानाडोळा करतात. WTO, ICRC आणि WHO ची कार्यालये या चौकापासून हाकेच्या अंतरावर आहेत. मात्र, हे निषेध कोणत्याही देशांबद्दल असतात, आंदोलकांनी पैसे दिले, वेळेचे पालन केले आणि जागा स्वच्छ ठेवली की जिनिव्हाचे प्रशासन अनेकदा अशा आंदोलनांकडे दुर्लक्ष करतात. मात्र भारत हा अशातशा देशांपैकी नाही आणि हे जिनिव्हामधील अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले पाहिजे.
महत्त्वाचे म्हणजे, ही भावना आपल्याच धोरणकर्त्यांनी प्राथमिक पातळीवर आत्मसात करायला हवी. असे संदेश पूर्णपणे काल्पनिक आणि भयानक आहेत, आणि म्हणूनच हा मुद्दा स्वित्झर्लंडबरोबर द्विपक्षीय स्तरावर चर्चेला घेतले जाणे आवश्यक आहे. यात अभिव्यक्ती स्वातंत्र्यचा मुद्दा, मान्य. परंतु जर जिनिव्हा हे आंतरराष्ट्रीय नियम बनवण्याचे एक जबाबदार केंद्र असेल, तर त्यांनी काही गोष्टींचे उत्तरदायित्व घ्यावे.
अर्थात, भारताबद्दल असे अत्यंत दिशाभूल करणारे व द्वेषपूर्ण संदेश जगात कुठल्याही सार्वजनिक चौकांमध्ये कधीही येऊ नयेत, याची खबरदारी भारतीय नागरिक, भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्रालय यांनी घेणे आवश्यक आहे.
संगीता गोडबोले
(अनुवाद : आराधना जोशी)
साभार : न्यूजभारती
लेखिकेविषयी –
संगीता गोडबोले, या भारतीय महसूल सेवेच्या (IRS) माजी अधिकारी असून, सध्या जिनिव्हा येथे वास्तव्यास आहेत. भारतविरोधी जी पोस्टर्स अलिकडे जिनिव्हात झळकली होती त्याच्या त्या प्रत्यक्षदर्शी आहेत. ही पोस्टर पूर्णपणे निराधार आणि त्याद्वारे भारताची जगात बदनामी करण्याचा द्वेषपूर्ण प्रयत्न का आणि कसा आहे हे त्यांनी स्पष्ट केले आहे.