गोवा शिपयार्ड लिमिटेडचा (जीएसएल) 2024 मधील महसूल 1 हजार 753 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून हा आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल आहे. अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय यांनी जीएसएलच्या 58 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना सांगितले की, कंपनीच्या महसूलात झालेली ही वाढ उल्लेखनीय असून सर्व आर्थिक निकषांमध्ये मागील वर्षांच्या कामगिरीपेक्षा यंदाची कामगिरी लक्षणीय आहे. कंपनीने एकूण महसुलात 100 टक्के वाढ साध्य केली असून या आर्थिक वर्षात प्रथमच 2 हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केल्याचे त्यांनी नमूद केले.
1957 साली स्थापन झालेली
जीएसएल ही संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम (डीपीएसयू) आहे. आपल्या ग्राहकांच्या गरजेनुसार विविध जहाजांची रचना आणि बांधणी, जहाजांची दुरुस्ती आणि आधुनिकीकरण तसेच तंत्रज्ञानाचे हस्तांतरण अशा विविध प्रकारच्या सेवा ही कंपनी पुरवते.
कंपनीच्या सीएमडीने जाहीर केल्याप्रमाणे कंपनीने 1 हजार 753 कोटी रुपयांचा विक्रमी महसूल मिळवला आहे. याचाच अर्थ महसुलात 102 टक्क्यांची वार्षिक वाढ झाली आहे. करपूर्व नफा 78 टक्के जास्त असून तो 365 कोटी रुपये होता तर कर भरल्यानंतरचा नफा गेल्या वर्षीच्या 155 कोटी रुपयांच्या तुलनेत 271 कोटी रुपये होता. 31 मार्च 2024 पर्यंत कंपनीला मिळालेल्या एकंदर ऑर्डरची किंमत 18 हजार 562 कोटी रुपये होती, ज्यामुळे आगामी वर्षांसाठी स्थिर महसूल दृश्यमानता मिळेल. आर्थिक वर्ष 2024 मध्ये एका शेअर किंमत 13.28 रुपयांवरून 23.31 रुपये झाली. म्हणजे त्यातही 76 टक्क्यांची वाढ झाली.
वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये, वर्षभरात जाहीर केलेल्या 5 रुपये प्रति समभाग या अंतरिम लाभांशाव्यतिरिक्त, आर्थिक वर्ष 2024 साठी प्रति समभाग 2 रुपये हा अंतिम लाभांश जाहीर करण्यात आला. गेल्यावर्षीच्या 62.86 कोटी रुपयांच्या तुलनेत एकूण लाभांश 2 कोटी रुपये इतका आहे.
जीएसएल सध्या 22 प्लॅटफॉर्मसाठी केलेल्या करारांवर काम करत आहे जी कंपनीच्या इतिहासातील सर्वाधिक संख्या आहे. या करारांमध्ये
भारतीय नौदलासाठी दोन प्रगत युद्धनौका आणि सात नेक्स्ट जनरेशन ऑफशोअर पेट्रोल व्हेसेल्स (एनजीओपीव्ही), भारतीय तटरक्षक दलासाठी दोन पेट्रोल क्राफ्ट व्हेसेल्स (पीसीव्ही) आणि आठ फास्ट पेट्रोल व्हेसेल्स (एफपीव्ही) आणि श्रीलंका नौदलासाठी एक फ्लोटिंग ड्राय डॉक यांचा समावेश आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये, कंपनीने अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहेत. यामध्ये दोन युद्धनौकांपैकी पहिली आयएनएस ट्रिपुट आणि भारतीय तटरक्षक दलासाठी पहिली पेट्रोल क्राफ्ट व्हेसेल्स (पीसीव्ही) समुद्र प्रताप यांचे प्रक्षेपण समाविष्ट होते. याव्यतिरिक्त, कंपनीने लक्झेंबर्ग स्थित जान डी नुल ग्रुपसाठी नेक्स्ट जनरेशन ट्रेलिंग सक्शन हॉपर ड्रेजर तयार करण्यासाठी जागतिक पातळीवरील ऑर्डर मिळवून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली उपस्थिती लावली आहे.
याव्यतिरिक्त, जीईएस व्हर्टिकलने कंपनीच्या उलाढालीत लक्षणीय योगदान दिले आहे. भारतीय नौदलासाठी नुकसान नियंत्रण सिम्युलेटर, भारतीय लष्करासाठी विशेष नौका आणि केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपसाठी एलपीजी सिलिंडर वाहक त्यांनी सुपूर्द केले आहे.
सीएमडी उपाध्याय यांनी ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ यासारख्या विविध सरकारी उपक्रम आणि संरक्षण मंचांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे एकीकरण करण्यासाठी जीएसएल वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. स्वदेशीकरण आणि तांत्रिक नवकल्पना पुढे नेण्यावर तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संरक्षण बाजारपेठेत स्वतःला एक प्रमुख कंपनी म्हणून प्रस्थापित करण्याकडे कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे.
टीम भारतशक्ती