‘आत्मनिर्भर भारत अभियान’ अंतर्गत संरक्षण सामुग्री उत्पादनात आत्मनिर्भरता आणण्यासाठी आणि संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपन्यांद्वारे केली जाणारी आयात कमी करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या तिसऱ्या ‘सकारात्मक स्वदेशीकरण सूची’ला (Positive Indigenisation List’ – PIL) मंजुरी दिली आहे. यासाठी मुदत निश्चित करण्यात आली असून त्यानंतर 780 लाइन रिप्लेसमेंट युनिट्स, उप-प्रणाली, सुटे भाग देशांतर्गत उद्योगाकडून खरेदी केले जातील. या सामग्रीचे तपशील सृजन पोर्टलवर (www.srijandefence.gov.in ) उपलब्ध आहेत. सूचीमध्ये दर्शविलेल्या मुदतीनंतर ते भारतीय उद्योगांकडून खरेदी केले जातील.
ही सूची डिसेंबर 2021 आणि मार्च 2022 मध्ये प्रकाशित झालेल्या एलआरयू, सब-सिस्टम्स, असेंबलीज, सब-असेंबली, घटकांच्या दोन सकारात्मक स्वदेशीकरण सूचीचा भाग आहे. या सूचींमध्ये अशा 2,500 वस्तू आहेत, ज्यांची आधीच देशात निर्मिती झाली आहे आणि 458 (351+107) वस्तू अशा आहेत की, ज्यांची लवकरच देशात निर्मिती केली जाईल. 458 पैकी 167 वस्तू (पहिली सूची – 163, दुसरी सूची – 4) आतापर्यंत देशात बनवण्यात आल्या आहेत. ‘मेक’ श्रेणी अंतर्गत विविध मार्गांनी या वस्तूंची देशात निर्मिती केली जाईल.
भारतीय उद्योगाला अधिकाधिक सहभागी करत स्वयंपूर्णता साधणे हे ‘मेक’ श्रेणीचे उद्दिष्ट आहे. उपकरणे, प्रणाली, प्रमुख प्लॅटफॉर्मची रचना आणि विकास किंवा उद्योगाद्वारे त्यांच्यात सुधारणा आदींचा समावेश असलेले प्रकल्प या श्रेणी अंतर्गत घेतले जाऊ शकतात.
एलआरयू, उप-प्रणाली, सुटे भाग यांच्या देशातील निर्मितीमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपन्यांचे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. याशिवाय, देशांतर्गत संरक्षण उद्योगाच्या डिझाइन क्षमतांचा उपयोग करून तंत्रज्ञानामध्ये भारताला डिझाईनमधील अग्रेसर देश म्हणून स्थान निर्माण करण्यात मदत करेल.
संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपन्या लवकरच स्वारस्य पत्रे (EoIs), विनंती प्रस्ताव (RFPs) आणतील आणि उद्योग मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी पुढे येतील. यासाठी तयार केलेल्या सृजन डॅशबोर्डवर (https://srijandefence.gov.in / DashboardForPublic ) उद्योगांना स्वारस्य पत्रे (EoIs)/विनंती प्रस्ताव (RFPs) पाहता येतील.
(संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकावर आधारित हा लेख आहे)