इस्रायलवर नाराज असलेल्या अरब अमेरिकन आणि मुस्लिम नेत्यांची उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी शुक्रवारी मिशिगनच्या फ्लिंट येथे भेट घेतली. हॅरिस यांची अध्यक्षपदाची मोहीम मतदारांना परत आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली. गाझा आणि लेबनॉनमधील इस्रायलच्या युद्धांना अमेरिकेचा पाठिंबा असल्याबद्दल हे मतदार संतप्त आहेत.
अलीकडच्या काळात मुस्लिम आणि अरब मतदारांशी संबंध सुधारण्याच्या अनेक प्रयत्नांपैकी एक प्रयत्न म्हणजे ही बैठक होती. या मतदारांनी 2020 मध्ये जो बायडेन यांना जोरदार पाठिंबा दिला होता.
अर्ध्या तासाच्या बैठकीदरम्यान, हॅरिस यांनी गाझामधील वेदना, जीवितहानी आणि लेबनॉनमधील विस्थापनाबद्दल चिंता व्यक्त केल्याचे सांगितले जाते. प्रचार मोहिमेतील एका अधिकाऱ्याने सांगितले की, या बैठकीत युद्ध संपवण्यासाठी सुरू असणाऱ्या प्रयत्नांबाबतही चर्चा करण्यात आली.
हॅरिस यांचे समर्थन करणाऱ्या एमगेज ऍक्शनचे मुख्य कार्यकारी अधिकारी वाइल अल्झायत म्हणाले की, अमेरिकेने हे संकट ज्या प्रकारे हाताळले त्याबद्दल या बैठकीत सहभागी झालेल्यांनी त्यांची झालेली तीव्र निराशा व्यक्त केली. हे युद्ध संपवण्यासाठी आणि या प्रदेशातील अमेरिकेच्या धोरणाचा पुनर्विचार करण्यासाठी हॅरिस यांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे आवाहनही उपस्थित सदस्यांनी केले.
“गाझा आणि लेबनॉनमधील हिंसाचार त्वरित थांबावा यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यावर त्वरित दबाव आणावा,” असेही ‘एम्गेज ऍक्शन’ ने उपराष्ट्रपती हॅरिस यांना सांगितले. लेबनॉनवरील अमेरिकन टास्क फोर्सचे अध्यक्ष एड गॅब्रिएल म्हणाले की, या बैठकीत अनेक मुद्द्यांवर ‘विचारांची देवाणघेवाण’ झाली. यामध्ये युद्धबंदीची गरज तसेच मानवनिर्मित संकटाचा सामना करण्यासाठी अमेरिका आणि त्याच्या मित्रराष्ट्रांकडून आवश्यक असलेल्या पाठिंब्याचा समावेश होता. लेबनॉनमधील राष्ट्रपतींचे नेतृत्वहीन असणे आणि लेबनॉनच्या सशस्त्र दलांच्या महत्त्वाच्या भूमिकेवरही चर्चा झाली.
“ही एक मौल्यवान द्विपक्षीय देवाणघेवाण होती. आम्ही यापुढेही भेटत राहू,” असे गॅब्रिएल म्हणाले.
या बैठकीसाठी सहभागी झालेल्यांमध्ये मिशिगनच्या सर्वाधिक लोकसंख्येच्या काउंटी, वेन काउंटीचे उप काउंटी कार्यकारी असद टर्फ यांचा समावेश होता.
अरब अमेरिकन इन्स्टिट्यूटचे संस्थापक आणि डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीचे दीर्घकालीन सदस्य जिम झोग्बी यांनी मात्र बैठकीचे हे आमंत्रण नाकारले.
‘अनकमिटेड नॅशनल मुव्हमेंट’ निषेध मोहिमेतील नेत्यांना या बैठकीला आमंत्रित करण्यात आलेले नव्हते. हॅरिस यांची जुनी मैत्रीण हाला हिजाझी ज्यांनी गाझामध्ये आपल्या कुटुंबातील डझनभर सदस्य गमावले त्या या बैठकीला उपस्थित राहू शकल्या नाहीत.
डेमोक्रॅट पक्षाच्या कमला हॅरिस यांचा सामना 5 नोव्हेंबर रोजी रिपब्लिकन पक्षाचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी होणार आहे. जनमत चाचण्यांमध्ये यंदा अध्यक्षपदासाठी चुरशीची लढत होणार असल्याचे दिसून येते.
अरब अमेरिकन इन्स्टिट्यूटने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार, दोन्ही उमेदवारांना अरब अमेरिकन उमेदवारांकडून साधारणपणे समान प्रमाणात पाठिंबा आहे.
गुरुवारी हॅरिस यांचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार, मिनेसोटाचे गव्हर्नर टिम वाल्झ यांनी मुस्लिम मतदारांना हॅरिस प्रशासनात समान भूमिका देण्याचे आश्वासन दिले. हॅरिस यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार फिल गॉर्डन यांनी बुधवारी अरब आणि मुस्लिम समुदायातील नेत्यांची आभासी भेट (virtually met) घेतली. गॉर्डन म्हणाले की, प्रशासन गाझामधील युद्धबंदी, लेबनॉनमधील मुत्सद्देगिरी आणि इस्रायलच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँकमधील स्थैर्याला पाठिंबा देते.
टीकाकारांचे म्हणण्यानुसार गाझामधील इस्रायलची लष्करी मोहीम रोखण्यासाठी बायडेन आणि हॅरिस यांनी फार कमी प्रयत्न केले आहे.
मध्यपूर्वेतील राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या धोरणांपासून स्वतःला दूर ठेवण्यास हॅरिस यांनी नकार दिल्यामुळे नोव्हेंबरमध्ये त्यांना किंमत मोजावी लागेल, असे काही अरब अमेरिकन लोकांचे मत आहे. लेबनॉनचे अमेरिकन वकील आणि समुदायाचे नेते अली डागर म्हणाले, “हॅरिस यांना मिशिगनमध्ये पराजयाचा सामना करावा लागणार आहे”.
‘मी कमला हॅरिस यांना मतदान करणार नाही. मला समाजात त्यांना पाठिंबा देणारी एकही व्यक्ती सापडत नाही.”
दिवसाच्या कामाची सुरुवात हॅरिस यांनी डेट्रॉईटच्या बाहेर मिशिगनच्या रेडफोर्ड टाउनशिपमध्ये बंदरातील संप संपुष्टात यावा यासाठी हॅरिस यांनी युनियन करार करत केली.
त्यानंतर त्यांनी अग्निशमन केंद्रातही एक भाषण दिले. हॅरिस यांना बंदरातील सामान्य कामगारांचाही पाठिंबा आहे हे दाखवणे हा या कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश होता.
अरब अमेरिकन नेत्यांच्या भेटीनंतर हॅरिस यांची फ्लिंटमध्ये युनायटेड ऑटो वर्कर्स युनियनचे अध्यक्ष शॉन फेन यांच्यासोबत बैठक झाली. मिशिगनच्या वाहन उद्योगाला पाठिंबा देण्याचे वचन हॅरिस यांनी यावेळी दिले.
तृप्ती नाथ
(रॉयटर्स)