काही सरकारी नोकऱ्यांमधील पदवीची अट काढून टाकणार – हॅरिस

0
काही

काही सरकारी नोकऱ्यांसाठी गरजेच्या नसणाऱ्या पदवीची अट आपण अमेरिकेच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्यास काढून टाकू असे उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी शुक्रवारी सांगितले, हॅरिस डेमोक्रॅटिक पक्षाकडून अध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. त्यांचे रिपब्लिकन प्रतिस्पर्धी ट्रम्पदेखील मतदारांना आकर्षित करण्यासाठी आर्थिक आमिषे दाखवत आहेत.

5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी हॅरिस आणि ट्रम्प यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे. हॅरिस यांनी यापूर्वीच मध्यमवर्गासाठी असणाऱ्या करांमध्ये कपात करण्याचे आश्वासन दिले आहे, तर ट्रम्प यांनी ओव्हरटाइम केल्यानंतर मिळणाऱ्या वेतनावरील कर कमी करण्याचे समर्थन केले आहे. दोन्ही उमेदवारांनी टीप म्हणून मिळणाऱ्या पैशांवरील कर काढून टाकण्याचे समर्थन केले आहे.

जर मी अध्यक्ष म्हणून निवडून आले तर सरकारी नोकऱ्यांसाठी असणाऱ्या अनावश्यक पदवीच्या अटी मी रद्द करणार आहे. त्यामुळे चार वर्षांच्या शिक्षणानंतर मिळणारी पदवी ज्यांच्याकडे नाही अशाही नागरिकांना नोकऱ्या मिळण्याचे प्रमाण वाढेल, असे हॅरिस यांनी पेनसिल्व्हेनियामध्ये केलेल्या भाषणात सांगितले.

2023 च्या सुरुवातीला यूएस सेन्सेस ब्युरोने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 25 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या 62 टक्क्यांहून अधिक अमेरिकन नागरिकांकडे पदवी नव्हती.  2020 मध्ये पाचपैकी तीन अमेरिकन मतदारांकडे महाविद्यालयीन पदवीच नव्हती.

डेमोक्रॅटिक पक्षाकडून अध्यक्षपदाच्या उमेदवार हॅरिस शुक्रवारी म्हणाल्या की, प्रशिक्षणार्थी आणि तांत्रिक कार्यक्रमांमधून मिळणाऱ्या यशाचे मूल्य महाविद्यालयीन पदवीच्या पलीकडे जाऊन ओळखले पाहिजे.

पदवी हे एखाद्या व्यक्तीचे कौशल्य दर्शवतेच असे नाही, असे हॅरिस म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या “आणि मी खाजगी क्षेत्रालाही तसे करण्याचे आवाहन करीन.”

या वर्षाच्या सुरुवातीला गॅलप आणि लुमिना फाऊंडेशनने केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की अनेक अमेरिकन नागरिक महाविद्यालयाचे नाव आणि खर्च याबद्दल साशंक आहेत. महाविद्यालयीन शिक्षणासाठी कधीही नावनोंदणी न केलेल्या किंवा एकदाही महाविद्यालयाची पायरी न चढलेल्या अमेरिकेच्या अर्ध्यापेक्षा अधिक प्रौढांनी सांगितले की नावनोंदणी न करण्यामागे किंवा महाविद्यालयात परत न जाण्यामागे शिक्षणाचा खर्च हे एक “अतिशय महत्त्वाचे” कारण होते.

अमेरिका इस्रायलला देत असलेल्या पाठिंब्याचा विरोध करणाऱ्या निदर्शकांकडून हॅरिस यांच्या भाषणात काहीसा व्यत्यय आणला गेला.

गाझामधील इस्रायलच्या युद्धात हजारो लोक मारले गेले आहेत आणि मानवतावादी संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे अमेरिकेतील निदर्शकांनी गेले कित्येक महिने युद्ध संपवण्याची आणि इस्रायलला शस्त्रास्त्रांच्या पाठवण्यावर निर्बंध घालण्याची मागणी केली आहे.

हॅरिस यांनी युद्धविराम आणि ओलिसांचा बचाव करणाऱ्या कराराला आपले समर्थन असल्याचा पुनरुच्चार केला. निदर्शकांनी भाषणात अडथळा आणल्यावर हॅरिस म्हणाल्या, “आता ओलिसांबाबतचा करार आणि युद्धबंदी करण्याची वेळ आली आहे. “मी तुमच्या मतांचा आदर करते, पण सध्या मी बोलत आहे.”

ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleभारत चीन सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात- चिनी परराष्ट्र मंत्रालयाचा दावा
Next articleBiological Warfare: A Threat More Potent Than Nuclear Warfare: Part II

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here