शेख हसीना यांना पदच्युत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि आता अंतरिम सरकारमध्ये सहभागी असलेल्या एका बांगलादेशी विद्यार्थी नेत्याने सांगितले की, हसीना बांगलादेशला परतल्या तर त्यांच्या कार्यकाळात झालेल्या हत्यांसाठी त्यांच्यावर खटला दाखल करण्यात येणार आहे.
गेल्या 30 वर्षांपैकी 20 वर्षे बांगलादेशवर राज्य केलेल्या हसीना यांना पदच्युत करण्यासाठी करण्यात आलेल्या निदर्शनांनानंतर हिंसक वळण लागले. त्याआधी आरक्षणाच्या विरोधात जुलैमध्ये सुरू झालेल्या निदर्शनांमध्ये सुमारे 300जण मारले गेले. त्यामध्ये अनेक विद्यापीठ आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश होता.
“त्या देश सोडून का पळून गेल्या याबद्दल मला उत्सुकता आहे,” असे अंतरिम सरकारमध्ये मंत्रीपद मिळालेला विद्यार्थी नेता नाहिद इस्लाम यानी आपल्या पहिल्या मुलाखतीत शुक्रवारी रात्री उशिरा रॉयटर्सला सांगितले. “त्यांच्या काळात झालेल्या सर्व हत्यांसाठी आम्ही न्याय मागू, जी आमच्या क्रांतीच्या मुख्य मागण्यांपैकी एक होती. जरी त्या परत आल्या नाही तरी आम्ही त्या दिशेने काम करू.”
बांगलादेशच्या मुख्य विरोधकांनी तीन महिन्यांत पुन्हा निवडणुका व्हाव्यात अशी मागणी केली आहे. देशात निवडणुका जाहीर झाल्यावर हसीना भारतातून – जिथे त्या सध्या आश्रयाला आहेत – बांगलादेशात परततील, असे हसीना यांचा मुलगा सजीब वझेद जॉय याने म्हटले आहे.
टपाल, दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री 26 वर्षीय इस्लाम म्हणाला, “आम्हाला त्यांना अटक करायची आहे – त्यानंतर मग नियमित न्याय प्रणालीद्वारे काम करायचे की त्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करायची की नाही, आम्ही या विषयावर कसे पुढे जायचे यावर चर्चा करीत आहोत.”
अमेरिकेत राहणाऱ्या जॉय यांनी यावर प्रतिक्रिया देण्याच्या विनंतीला कोणताही प्रतिसाद दिला नाही. सध्या भारत सरकारच्या आश्रयाला आलेल्या हसीना यांच्याशीही संपर्क होऊ शकला नाही.
आणखी एक विद्यार्थी नेता अबू बेकर मोजुमदार याने रॉयटर्सला स्वतंत्रपणे सांगितले की “हसीना परत याव्यात आणि त्यांच्यावर खटला चालवावा अशी आमची इच्छा आहे.”
गेल्या निवडणुकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकल्यानंतर मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेणे तसेच मागील सरकारमधील संशयास्पद भ्रष्टाचाराची चौकशी करणे हे काळजीवाहू सरकारच्या मुख्य प्राधान्यांपैकी एक असल्याचे इस्लामने सांगितले.
निवडणुकीपूर्वी बांगलादेशला निवडणूक आणि घटनाविषयक सुधारणांची आवश्यकता आहे. यामुळे पुढील मतदान नक्की कधी होईल हे स्पष्ट नसल्याचे इस्लामने सांगितले. त्याने निवडणूकीची नेमकी तारीख सांगण्यास नकार दिला.
एक दिवस तुम्हाला पंतप्रधान व्हायचे आहे का असे विचारले असता मी पुढे काय बनणार आहे, माझी महत्त्वाकांक्षा काय असेल हे पूर्णत: बांगलादेशच्या लोकांवर अवलंबून आहे,” असे इस्लाम म्हणाला.
भारताने हसीना यांच्या अवामी लीग पक्षाशी संबंध वाढवले आहेत, परंतु संपूर्ण बांगलादेशच्या लोकांशी नाही, असे तो म्हणाला. “आम्हालाही भारताशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत,” असे तो म्हणाला. “भारतानेसुद्धा आपल्या परराष्ट्र धोरणाचा फेरआढावा घेण्याची गरज आहे. अन्यथा ते संपूर्ण दक्षिण आशियासाठी एक समस्या बनेल.”
रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)