दोन्ही बाजूंच्या सीमेपलीकडील रॉकेट हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेत पूर्ण युद्ध सुरू होण्याची भीती वाढली आहे. मंगळवारी बैरूतमधील इस्रायली हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा एक वरिष्ठ कमांडर ठार झाला.
लेबनॉनच्या राजधानीवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाच्या क्षेपणास्त्र आणि रॉकेट दलाचा कमांडर इब्राहिम कुबैसी ठार झाल्याचे इस्रायलच्या सैन्याने सांगितले. लेबनॉनमधील दोन सुरक्षा स्त्रोतांच्या मते इराण समर्थित गटाच्या (हिजबुल्ला) रॉकेट विभागातील एक प्रमुख व्यक्ती म्हणून कुबैसी ओळखला जायचा. सहा जणांचा बळी घेणाऱ्या या हल्ल्यामुळे हिजबुल्लाला आणखी एक धक्का बसला आहे. गेल्याच आठवड्यात इस्रायलकडून हिजबुल्लावर अनेक प्रकारांनी हल्ले करण्यात आले.
इस्रायलच्या लष्कराने नंतर सांगितले की त्यांच्या हवाई दलाने दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या लक्ष्यांवरही “मोठे हल्ले” केले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र साठवून ठेवण्यात आली होती. याशिवाय इस्रायलला लक्ष्य करणाऱ्या डझनभर प्रक्षेपकांचा समावेश होता.
🚨 Breaking: Israeli Air Force successfully eliminates Ibrahim Mohammad Qubaisi, Hezbollah’s head of rocket and missile command, in a precise strike in Beirut today. Qubaisi was a key figure behind the rocket attacks on Israel and a central player in Hezbollah’s military… pic.twitter.com/mxN7k8x0ze
— Asaf Givoli (@AsafGivoli) September 24, 2024
“आजचा हिजबुल्ला तो हिजबुल्ला नाही जो आपल्याला आठवडाभरापूर्वी माहीत होता. (याला) त्याच्या कमांड आणि कंट्रोल, त्याचे लढवय्ये आणि लढण्याची साधने यांच्यावर मोठ्या प्रमाणात आक्रमणांचा मारा सहन करावा लागला आहे,” असे इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट म्हणाले. “हल्ले यानंतरही सुरूच राहतील. “हे सर्व जोरदार वार आहेत,” असेही ते इस्रायली सैन्याला म्हणाले.
इस्त्रायलने सोमवारी सकाळपासून जोरदार हल्ले सुरू केल्यापासून लेबनॉनमध्ये आतापर्यंत 569 लोक मारले गेले आणि 1हजार 835 जखमी झाल्याची नोंद झाली आहे. यात 50 मुलांचाही समावेश असल्याचे आरोग्य मंत्री फिरास अबियाद यांनी अल जझीरा मुबाशर टीव्हीला सांगितले.
हिजबुल्लाहने सांगितले की त्यांनी मंगळवारी उत्तर इस्रायलमधील दाडो लष्करी तळावर रॉकेट हल्ला केला तर हैफाच्या दक्षिणेकडील अटलिट नौदल तळासह इतर लक्ष्यांवर रॉकेट हल्ला केला. इस्त्रायली सैन्याने सांगितले की, उत्तरेकडील सफेद शहरात, जेथे दाडो तळ आहे आणि जवळपासच्या भागात सायरन वाजले.
मात्र या हल्ल्यात तळाचे नुकसान झाले की नाही याची कोणतीही माहिती इस्रायलने दिलेली नाही.
इस्रायलच्या हिजबुल्लाविरुद्धच्या नव्या हल्ल्यांमुळे इस्रायल आणि गाझामधील दहशतवादी पॅलेस्टिनी गट हमास यांच्यातील सुमारे एक वर्षाचा संघर्ष यामुळे मध्यपूर्वेत अस्थिरता निर्माण होईल अशी भीती निर्माण झाली आहे.
यूएनमध्ये, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी मध्यपूर्व तणाव शांत करण्याचा प्रयत्न केला. “संपूर्ण युद्ध हे कोणाच्याही हिताचे नाही, जरी संघर्षपूर्ण परिस्थिती वाढली असली तरीही त्यावर राजनैतिक तोडगा काढणे शक्य आहे,” असे त्यांनी 193 सदस्यीय यूएन जनरल असेंब्लीला सांगितले.
इस्रायलने सध्या आपले लक्ष गाझापासून उत्तरेकडील सीमेकडे वळवले आहे. या ठिकाणी हिजबुल्लाह इराणचा पाठिंबा असलेल्या हमासच्या समर्थनार्थ इस्रायलवर रॉकेट हल्ले करत आहे.
इस्रायलला आपली उत्तरेकडील सीमा सुरक्षित करायची असून विस्थापित रहिवाशांना परत येऊ द्यायचे आहे. यामुळे तिथे प्रदीर्घ संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे, तर हिजबुल्लाहने गाझामध्ये युद्धविराम होईपर्यंत मागे हटणार नाही असे जाहीर केले आहे.
दरम्यान, इस्रायलचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत डॅनी डॅनन म्हणाले की, इस्रायल लेबनॉनमधील संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही तयार आहोत. “आम्ही कुठेही जमिनीवर आक्रमण करण्यास उत्सुक नाही… आम्ही डिप्लोमॅटिक तोडगा पसंत करतो,” असे ते पत्रकारांना म्हणाले.
इस्त्रायली सैन्याने सांगितले की त्यांना लेबनीज लोकांच्या घरात दारूगोळा सापडला आहे. इस्रायलने हिजबुल्लावर लेबनॉनमधील घरे आणि गावांमध्ये शस्त्रे लपवल्याचा आरोप केला आहे, लेबनीज गटाने हे आरोप नाकारले आहेत.
Several airstrikes near Beirut tonight. #Lebanon pic.twitter.com/8AbCi3cdwP
— FJ (@Natsecjeff) September 24, 2024
एक अतिशय कठीण युद्ध
इस्रायलने सलग दुस-या दिवशी बैरुतमधील हिजबुल्लाहच्या ताब्यातील भागांवर हल्ले केले. लेबनीज आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, बैरुतच्या घोबेरी परिसरातील एका इमारतीवर झालेल्या रॉकेट हल्ल्यात किमान सहा जण ठार आणि 15 जखमी झाले.
लेबनॉनचे पर्यावरण मंत्री नासेर यासिन यांनी सांगितले की, इस्रायलने सोमवारपासून सुरू केलेल्या बॉम्बहल्ल्यांंमुळे 27 हजार नागरिक विस्थापित झाले आहेत.
बैरुत येथील महाविद्यालयात विस्थापित लोकांसाठी तात्पुरत्या उभारलेल्या निवाऱ्यात बोलताना 50 वर्षीय रिमा अली चाहिन म्हणाल्या, “आम्हाला असे वाटले की आपण एखाद्या युद्धात आहोत, एक अतिशय कठीण युद्ध आहे.”
मध्यपूर्वेतील सर्वात शक्तिशाली आणि प्रगत सैन्याने केलेल्या हल्ल्यांमध्ये झालेली जीवितहानी आणि हल्ल्यांची तीव्रता यामुळे लेबनॉनमध्ये घबराट पसरली आहे, परंतु 2006 मधील विनाशकारी इस्रायल-हिजबुल्ला युद्धाचे स्मरण करणाऱ्या लोकांमध्ये आता उघड विरोधदेखील पसरायला लागला आहे.
देवाची इच्छा असेल तर आम्ही विजयाची वाट पाहत जिवंत राहू कारण जोपर्यंत आम्हाला इस्रायलसारखा शेजारी आहे, तोपर्यंत आम्ही सुरक्षितपणे झोपू शकत नाही,” असे बैरुतचा रहिवासी हसन ओमर म्हणाला.
व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी एमएसएनबीसीशी बोलताना सांगितले की, त्यांचा असा विश्वास आहे की तणाव कमी करण्यासाठी आणि राजनैतिक तोडगा काढण्यासाठी अजूनही “पुढाकार घेण्यासाठी मार्ग” शोधला जाऊ शकतो.
या हल्ल्यांमुळे अमेरिका हा इस्रायलचा जवळचा सहकारी, आणि इराण हा मोठा शत्रू या व्यापक युद्धात सहभागी होतील अशी भीती आता निर्माण झाली आहे.
रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)