अमेरिकी कंपनीबरोबरचा हाय-टेक ड्रोन करार आत्मनिर्भरतेसाठी महत्त्वपूर्ण

0
करार

अमेरिकेच्या शील्ड एआय या एआय आणि ड्रोन क्षेत्रातील कंपनीने भारताच्या जेएसडब्ल्यू समूहाशी भागीदारी करार केला आहे. यामुळे भारताच्या संरक्षण आणि उत्पादन क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण विकासाला गती मिळणार आहे. या करारामुळे अत्याधुनिक व्ही-बॅट व्हर्टिकल टेकऑफ आणि लँडिंग (व्हीटीओएल) ड्रोन भारतातच तयार करता येईल.
90 दशलक्ष डॉलर्सचा हा संयुक्त उपक्रम असून महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये स्वावलंबी होण्याच्या उद्देशाने, आत्मनिर्भरता उपक्रमांतर्गत स्वदेशी संरक्षण उत्पादनाला चालना देण्याच्या भारताच्या प्रयत्नांमधील एक मैलाचा दगड आहे, असे breakingdefense.com मधील एका बातमीत म्हटले आहे.

जेएसडब्ल्यू समूह भारतात व्ही-बॅट ड्रोनचे उत्पादन, एकत्रीकरण आणि चाचणी करण्यासाठी एक प्रगत सुविधा स्थापन करण्याची योजना आखत आहे. यासाठी आवश्यक तंत्रज्ञान सध्या अमेरिकन मरीनद्वारे चालवले जाते. या सहकार्यात स्थानिक पुरवठा साखळीचा विकास, बौद्धिक संपदा सुरक्षित करणे आणि भारतीय कामगारांना प्रशिक्षण देणे यांचा समावेश असेल.

शील्ड एआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ही भागीदारी भारताला सॅन डिएगो स्थित कंपनीसाठी जागतिक उत्पादन केंद्र म्हणून काम करण्यास सक्षम करेल, आंतरराष्ट्रीय विक्री आणि देखभाल प्रक्रिया सोपी करण्याबरोबरच देशांतर्गत मागणी पूर्ण करेल.

स्वावलंबनाच्या दिशेने एक पाऊल

जगातील सर्वात मोठ्या शस्त्रास्त्र आयातदारांपैकी एक असलेल्या भारताला यानंतरच्या काळात संरक्षण क्षेत्रातील प्रमुख उत्पादक म्हणून आपली ओळख प्रस्थापित करण्याच्या व्यापक धोरणाशी हा उपक्रम सुसंगत आहे. संरक्षण मंत्रालयाने अलीकडेच अधोरेखित केले की भारत, जो पूर्वी 65-70 टक्के संरक्षण उपकरणे  आयात करत असे तोच आता देशांतर्गत 65 टक्के उत्पादन करतो, ज्यापैकी 21 टक्के उत्पादने खाजगी क्षेत्रातून येतात.

व्ही-बॅट ड्रोन प्रकल्प या धोरणाशी सुसंगत असाच आहे. शील्ड एआयच्या प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन आणि भारताच्या देशांतर्गत संरक्षण परिसंस्थेत त्याचे एकत्रीकरण करून, हा संयुक्त उपक्रम उच्च-तंत्रज्ञान उत्पादन हाताळण्याची आणि अत्याधुनिक संरक्षण उपाय टिकवून ठेवण्याची देशाची वाढती क्षमता दर्शवणारा आहे.

भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या 24 ऑक्टोबरच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, देशांतर्गत बनवली जाणारी उत्पादने म्हणजे केवळ भारताच्या सुरक्षेच्या गरजा पूर्ण करणे नव्हे तर बाह्य स्रोतांवरील अवलंबित्व कमी करणे आणि राष्ट्रीय लवचिकता बळकट करणे याचा देखील यात समावेश होतो.

जागतिक महत्त्व आणि किफायतशीर खर्च

शील्ड एआयचे सह-संस्थापक आणि अमेरिकन नौदल सीलचे (SEAL) माजी सदस्य ब्रँडन त्सेंग यांनी विकसित होत असलेल्या जागतिक संरक्षण बाजारपेठेत व्ही-बॅट मंचाचे धोरणात्मक मूल्य अधोरेखित केले. “व्ही-बॅटसारखे ग्रुप 3 यूएएस ड्रोन्स अनेक हेलिकॉप्टर्स आणि मोठे ग्रुप 5 यूएएस ड्रोनसारख्या मोहिमा तुलनेत अतिशय कमी किंमतीत पूर्ण करू शकतात,” असे त्यांनी breakingdefense.com ला सांगितले.

ते पुढे म्हणाले की, जागतिक वितरण वाढवताना आणि कामकाजाचा विस्तार करताना अमेरिकेमधील शील्ड एआयच्या गुंतवणुकीवर आधारित हा सहकार्य करार आहे. व्ही-बॅटचे अष्टपैलूत्व आणि एआय-चालित क्षमता भारत आणि त्याच्या भागीदारांच्या संरक्षण धोरणांमध्ये परिवर्तनात्मक भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे.

ड्रोनची रचना पाळत ठेवणे, हेरगिरी करणे आणि सामरिक कार्यांसह विविध मोहिमा हाताळण्यासाठी केली गेली आहे, त्यामुळे असे ड्रोन्स पारंपरिक प्रणालींपेक्षा किफायतशीर पर्याय बनतात.

भारतीय उद्योगांना बळकटी देणे

शील्ड एआयचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक सरजन शाह यांनी जेएसडब्ल्यू. समूहाशी झालेली भागीदारी ही अनेक वर्षांच्या नियोजन आणि वाटाघाटींचे दृश्य परिणाम असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, या कराराचा उद्देश “लष्करी मानवरहित प्रणालींच्या क्षेत्रात भारताच्या स्वदेशी क्षमतांची खोली, व्याप्ती आणि विस्तार संधी बदलणे” हा आहे.

भारतात व्ही-बॅट उत्पादन लाइनची स्थापना देखील जागतिक संरक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचा भागिदार म्हणून देशाची वाढती भूमिका अधोरेखित करते. रोजगार निर्मिती, तंत्रज्ञानाचे हस्तांतरण आणि भारतीय पुरवठादारांना पुरवठा साखळीमध्ये समाकलित करण्याच्या वचनबद्धतेसह, हा संयुक्त उपक्रम संरक्षण नवोन्मेषाचे उदयोन्मुख केंद्र म्हणून भारताचे स्थान अधिक बळकट करतो.

भविष्यातील भागीदारीसाठी एक आदर्श

भारतासाठी, शील्ड एआय आणि  जेएसडब्ल्यू यांच्यातील ही भागीदारी व्यावसायिक करारापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. भविष्यातील सहकार्यासाठी हा एक उत्तम नमुना आहे. परदेशी कंपन्यांना आपल्या सीमेवर उत्पादन सुविधा उभारण्यासाठी प्रोत्साहित करून, भारताला केवळ प्रगत तंत्रज्ञानच मिळत नाही तर आपला औद्योगिक पाया देखील मजबूत होतो. तसेच आयातीवरील अवलंबित्व कमी होते.

देश संरक्षण उत्पादनातील एक महत्त्वाचे शक्तीस्थान म्हणून स्वत:ची ओळख प्रस्थापित करत असताना, अशा सहयोगांमुळे भविष्यात अशाच प्रकारच्या उपक्रमांचा मार्ग मोकळा होईल.

रामानंद सेनगुप्ता


Spread the love
Previous articleIndian And Sri Lankan Navies Successfully Undertake Anti-Narcotics Operation
Next articleCoast Guard Concludes 11th National Maritime Search and Rescue Exercise

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here