दक्षिण आफ्रिकेत वापरात नसलेल्या खाणीत अडकलेल्या शेकडो बेकायदेशीर खाण कामगारांचे हतबल नातेवाईक त्यांचे प्रियजन सुरक्षितपणे बाहेर येतील या आशेने शुक्रवारी दुर्घटनास्थळी जमले होते.
आत अडकलेल्या खाण कामगारांचा पोलिसांबरोबर संघर्ष सुरू आहे. सोन्याच्या शोधात या खाणीत बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल त्यांना अटक करण्यासाठी तसेच या कामगारांनी बाहेर यावे यासाठी पोलिसांनी त्यांचा अन्न, पाण्याचा पुरवठा रोखला आहे. खरंतर ही दक्षिण आफ्रिकेतील एक सर्वसामान्य समस्या आहे.
खाण कामगार अडकले
गेल्या काही आठवड्यांमध्ये पोलिसांच्या कारवाईमुळे हजारांहून अधिक बेकायदेशीर खाण कामगार या खाणीतून बाहेर पडले आहेत. याशिवाय एका कामगाराचा मृतदेह खाणीतून बाहेर काढण्यात आला आहे. शेकडो कामगार अजूनही खाणीत असल्याचा अंदाज आहे.
वायव्य प्रांतातील स्टिलफोंटेन येथील खाणीत उतरलेले उर्वरित कामगार जमिनीखाली 2 किमीपेक्षा (1.2 मैल) जास्त खोल जाणाऱ्या शाफ्टच्या मदतीने बाहेर पडण्यास तयार नव्हते किंवा असमर्थ होते याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही.
या कामगारांना बाहेर काढण्यासाठी पोलीस अधिकारी एकत्रितपणे काम करतील असे शुक्रवारी घटनास्थळी भेट देणाऱ्या पोलीस मंत्री सेन्झो मकुनू यांनी सांगितले. त्याआधी एका कॅबिनेट मंत्र्यांनी जाहीर केले होते की सरकार कामगारांच्या सुटकेसाठी कोणतीही मदत पाठवणार नाही कारण ते “गुन्हेगार” आहेत.
“आम्हाला अधिक वेगाने काम करण्याची गरज आहे कारण ते जिथे आहेत तिथेच राहणे त्यांच्यासाठी जोखमीचे आणि धोकादायक आहे,” असे मकुनू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
बचावकार्य सुरू
पोलिस आणि कम्युनिटीचे सदस्य शुक्रवारी खडकाळ प्रवेशद्वाराभोवती उभे होते, जिथे पुरुषांना बाहेर काढण्यासाठी एक पुली उभारण्यात आली होती. कम्युनिटीच्या एका नेत्याने गुरुवारी स्थानिक वृत्तवाहिनी न्यूज 24 ला सांगितले की हे लोक प्रचंड अशक्तपणामुळे खाणीतून बाहेर पडू शकत नाहीत.
झिम्बाब्वेची नागरिक रोझेलिना न्युझेया हिने खाणीचा रस्ता अडवणाऱ्या पोलिस बॅरिकेडच्या मागून रॉयटर्सला सांगितले की, “मी इथे खाणीत उतरलेल्या तरुणांची वाट पाहत आहे, जे आतमध्ये मृत्यू पंथाला लागले आहेत.
जवळच रडणारी एक स्त्री तिच्या पतीची वाट पाहत होती, जो एप्रिलमध्ये या खाणीत उतरला आहे, असे न्युझेयाने सांगितले.
सरकारी मदत
छोट्या-मोठ्या चोऱ्या आणि संघटित गुन्हेगारी याबरोबरच बेकायदेशीर खाणकामामुळे दक्षिण आफ्रिका अनेक दशकांपासून त्रस्त आहे. जुन्या औद्योगिक खाणींमध्ये घुसण्याचे जोखमीचे काम करणाऱ्यांपैकी बरेच जण शेजारील देशांमधून आलेले स्थलांतरित आहेत.
त्यांना झामा-झामा म्हणून संबोधले जाते. ही एक स्थानिक संज्ञा असून “संधी घेणे” असा त्याचा झुलु भाषेतील अर्थ आहे.
मंत्री खुम्बुद्झो न्टशावेनी यांनी बुधवारी सांगितले की सरकार गुन्हेगारांसाठी कोणतीही मदत पाठवणार नाही तर त्याऐवजी त्यांना तिथून हुसकावून बाहेर काढेल.
काही कम्युनिटी सदस्यांनी सत्ताधारी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांच्या या वक्तव्याचा संदर्भ देत, प्रतिसादात ‘स्मोक एएनसी आउट’ अशी चिन्हे हातात धरली होती.
“आम्ही आमची मुलं खाणीतून बाहेर पडावीत यासाठी आम्हाला मदत करण्यासंदर्भात सरकारकडे मागणी करत आहोत. आम्ही फक्त ते सुखरूपपणे बाहेर येण्यासाठी विचारत आहोत,” असे स्टिलफॉन्टेनचे 41 वर्षीय रहिवासी मत्सिदिसो रामोल्ला म्हणाले.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)