येमेनच्या हौतींनी केलेल्या हल्ल्यामुळे ग्रीक ध्वज असलेल्या कच्च्या तेलाचा टँकर सोनियनला लाल समुद्रात 23 ऑगस्टपासून आग लागली आहे. मात्र यामुळे तेल गळती सुरू झाल्याची कोणतीही स्पष्ट चिन्हे अजून तरी दिसली नसल्याचे ईयू लाल समुद्राच्या नौदल मोहिमेने सोमवारी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
ईयू मिशनने जहाजाच्या मुख्य डेकमधून आग आणि धूर येत असल्याची छायाचित्रे रविवारी प्रकाशित केली. त्यानंतर रॉयटर्सने जहाजावरील हल्ल्याच्या हौती व्हिडिओची सत्यता तपासून पाहिली.
1/The #Houthis set explosive charges on the deck of the abandoned tanker #Sounion last week after they attacked the vessel. We now have photographs and images of the ship provided by the @EUNAVFORASPIDES. https://t.co/NTZb9CawK8 pic.twitter.com/JXtMLIMeZf
— Sal Mercogliano (WGOW Shipping) 🚢⚓🐪🚒🏴☠️ (@mercoglianos) August 26, 2024
नौवहन अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोनियन 1लाख 50 हजार टन कच्चे तेल वाहून नेत आहे आणि त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की सॉनिऑनच्या वरच्या मजल्यावरील काही भागाला आग लागली आणि जहाजाच्या मुख्य डेकवर किमान पाच ठिकाणी आगीच्या ज्वाळा दिसल्या. जहाजाचे अधिक नुकसान होऊन जर त्यातून तेल गळती झाली तर इतिहासात नोंद झालेल्या सर्वात मोठ्या गळतींपैकी ती एक असण्याची शक्यता आहे.
येमेनच्या सर्वाधिक लोकसंख्येच्या प्रदेशांवर नियंत्रण ठेवणारे हुती बंडखोर गाझामधील इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात पॅलेस्टिनी समर्थनार्थ जहाजांवर हल्ले करत आहेत. इराण पुरस्कृत या बंडखोरांनी गेल्या 10 महिन्यांत केलेल्या हल्ल्यांमध्ये दोन जहाजे बुडवली असून कमीतकमी तीन जहाज कर्मचाऱ्यांना ठार केले आहे. यामुळे जहाज मालकांना सुएझ कालव्याचा शॉर्टकट टाळणे हाच पर्याय शिल्लक राहिला. मात्र त्यामुळे जागतिक स्तरावर होणाऱ्या सागरी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.
या महिन्यात हौती हल्ल्याला बळी पडलेले सॉनिऑन हे अथेन्स स्थित डेल्टा टँकरद्वारे चालवले जाणारे तिसरे जहाज आहे. डेल्टा टँकरने “पॅलेस्टाईन व्याप्त बंदरांमध्ये प्रवेश करण्याच्या” बंदीचे उल्लंघन केल्याचे दहशतवाद्यांनी सांगितले.
युरोपियन स्पेस एजन्सीच्या कोपरनिकस सॅटेलाईट 2 ने टिपलेल्या उपग्रह प्रतिमांमध्ये ज्या परिसरात सॉनिऑनवर हल्ला झाला त्या परिसरात समुद्रात धूर पसरलेला दिसत होता.
एलएसईजी शिप ट्रॅकरवरून दिसलेल्या सॉनिऑनच्या शेवटच्या ठिकाणाशी जुळणारी प्रतिमा रॉयटर्स शोधू शकले आहे.
ब्रिटीश आणि अमेरिकन सैन्य हौती ड्रोन आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थाने नष्ट करत आहेत, परंतु विश्लेषकांचे मते गाझामध्ये युद्धविराम होईपर्यंत हे हल्ले थांबण्याची शक्यता नाही.
रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)