भारतासह, थायलंड, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया अशा इतर देशांमध्ये राहणाऱ्या असंतुष्टांचा चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचे सरकार कसा मागोवा घेते आणि कसे त्यांचे अपहरण करते याचा एका माजी चिनी गुप्तहेराने खुलासा केला आहे. व्हॉईस ऑफ अमेरिकेने (व्हीओए) याबाबतची बातमी दिली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या एका माजी चिनी गुप्तहेराने बीजिंगच्या रणनीतीबाबत अनेक धक्कादायक गोष्टी उघड केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या सार्वजनिक ब्रॉडकास्टरने यासंदर्भात केलेल्या शोध पत्रकारितेमधून चीनची गुप्त पोलिस सेवा परदेशात राहणाऱ्या असंतुष्टांचा मागोवा घेतल्याचा आरोप केला आहे.
आता ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झालेल्या एका माजी चिनी गुप्तहेराने ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या फोर कॉर्नर कार्यक्रमात बोलताना सांगितले की चिनी गुप्त सेवेचे एक युनिट गेल्या वर्षीपासून सिडनीमध्ये कार्यरत झाले आहे.
केवळ “एरिक” असेच नाव सांगणाऱ्या या गुप्तहेराने फसवणूक आणि अपहरणाच्या संदिग्ध जगाचे वर्णन या कार्यक्रमात केले आहे. या माजी चिनी एजंटने एबीसीला सांगितले की बीजिंगमधील गुप्त पोलिसांनी त्याला भारत, थायलंड, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासह परदेशात असंतुष्टांना लक्ष्य करण्याचे आदेश दिले होते.
“एरिक”ने सांगितले की तो त्या असंतुष्टांचा विश्वास संपादन करून त्यांना अशा देशांमध्ये नेण्याचे आमिष दाखवत असे जिथून त्यांचे अपहरण करून त्यांना चीनला पाठवले जाऊ शकते. ‘फोर कॉर्नर’ या संशोधनात्मक कार्यक्रमातील पत्रकारांना त्याने सांगितले की तो गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाला पळून आला.
ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत गुप्तहेर संस्थेने कथित चिनी गुप्तहेर गटाच्या कोणत्याही तपशीलाबाबत दुजोरा दिलेला नाही.
‘एरिक’ ने सांगितले की त्याने 2008 ते 2023 च्या सुरुवातीपर्यंतच्या काळात चीनच्या फेडरल पोलिस तसेच सुरक्षा एजन्सी, सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयातील एका युनिटसाठी गुप्त एजंट म्हणून काम केले.
या विशेष विभागाला राजकीय सुरक्षा संरक्षण विभाग किंवा पहिला विभाग म्हणतात आणि तो चिनी राज्याच्या तथाकथित शत्रूंना लक्ष्य करतो. गेल्या वर्षीप्रमाणेच तो आताही सिडनीमध्ये हे काम करत असल्याचा आरोप आहे.
‘एरिक’ ने एबीसीला सांगितले की,सत्य जगासमोर येण्यासाठी तो या गोष्टी उघड करत आहे.
“मला वाटते की जनतेला हे गुप्त जग जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी चीनच्या राजकीय सुरक्षा विभागात 15 वर्षे काम केले “, असे तो म्हणाला. “आजही चीन सरकारची काळी बाजू असणारा हा विभाग आहे.”
चीनच्या गुप्त पोलिसांपैकी कोणीही सार्वजनिकरित्या बोलण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे एबीसीने म्हटले आहे. त्याची ओळख लपवण्यासाठी ते टोपणनावाचा वापर करत आहे.
पीटर मॅटिस हे अमेरिकेतील जेम्सटाउन फाउंडेशन या पुराणमतवादी संरक्षण धोरण संशोधन संस्थेत चीनचे विश्लेषक आहेत. त्यांनी एबीसीच्या फोर कॉर्नर कार्यक्रमाला सांगितले की बीजिंगला चिनी डायस्पोरामधील मतभेदांना आळा घालायचा आहे.
“असंतुष्टांना गप्प करण्याचा प्रयत्न करणे तसेच त्यांच्या नेटवर्कचा नकाशा तयार करण्यातही राजकीय संरक्षण ब्युरोची भूमिका आहे.”
‘एरिक’ च्या आरोपांचे समर्थन करणारी शेकडो गुप्त कागदपत्रे आणि पत्रव्यवहार आपण पाहिले असल्याचा दावा एबीसीने केला आहे.
ब्रॉडकास्टरच्या मते, चिनी अधिकाऱ्यांनी गेल्या दशकात 12 हजारहून अधिक कथित फरारी लोकांना चीनला परत करण्यासाठी भ्रष्टाचारविरोधी मोहिमांचा वापर केला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या या माहितीपटात केलेल्या आरोपांवर चिनी अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
ऑस्ट्रेलियन सिक्युरिटी इंटेलिजेंस ऑर्गनायझेशन, (एएसआयओ) कडूनही या दाव्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
आराधना जोशी
(वृत्तसंस्थांच्या इनपुट्सह)