अत्यंत कठीण काळात, नोबेल शांतता पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकाराच्या शिफारसी स्वीकारण्यासाठी बांगलादेश सज्ज झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतरिम सरकारचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल मोहम्मद युनूस यांचे अभिनंदन केले आहे.
बांगलादेशसमोर सध्या कठीण आर्थिक आव्हाने असली तरी, प्रत्येक बांगलादेशी नागरिकाने या 84 वर्षीय अर्थतज्ज्ञाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे.
निवडणुका होऊन नवीन प्रशासन सत्तेवर येईपर्यंत दक्षिण आशियातील बांगलादेशचे नेतृत्व स्वीकारत असल्याने युनूस यांच्या अर्थविषयक कल्पना समजून घेणे योग्य ठरेल.
सामाजिक व्यवसाय
केवळ संपत्ती निर्माण करण्याऐवजी समस्या सोडवणाऱ्या “सामाजिक व्यवसायांचे” युनूस समर्थन करतात.
त्यांनी स्थापन केलेली मायक्रोफायनान्स करणारी ग्रामीण बँक याच कल्पनेवर आधारित होती. बांगलादेशातील विकासाला चालना दिल्याबद्दल आणि गरिबी दूर केल्याबद्दल या कल्पनेचे बरेच कौतुक झाले होते.
नोबेल शांतता पुरस्कार
मायक्रोफायनान्समधील त्यांच्या अग्रगण्य कार्यासाठी युनूस यांना 2006चा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. इतर विकसनशील देशांमध्येही या ग्रामीण बॅंकेची संकल्पना उचलली गेली.
त्यामुळे ‘गरिबांचे बँकर’ म्हणून त्यांची ओळख बनली.
गरिबी
या प्रख्यात अर्थतज्ज्ञाच्या मते 2022 मध्ये बांगलादेशमधील 18 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या गरिबीने ग्रासलेली होती. देशासाठी हा एक मोठा ‘धोका’ आहे असे ते मानतात.
त्या़ंच्या मते, गरिबीमुळे दहशतवादापासून ते तस्करीपर्यंत अनेक समस्या उद्भवतात.
“तुम्ही लोकांना गरीबीत जगण्यासाठी असंच सोडू शकत नाही आणि त्यातही त्यांनी आनंदात रहावं अशी अपेक्षा करू शकत नाही. आणि हताश स्थितीत ते जगू शकत नाही. जेव्हा तुम्ही हताश असता, तेव्हा तुम्ही देशाची शांतता भंग करता,” असे युनुसन यांनी 2006 मध्ये Nobelprize.org शी बोलताना सांगितले होते.
या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्यांनी त्यांच्या मायक्रोफायनान्सद्वारे गरीबांमध्ये ‘ठोस आर्थिक तत्त्वे’ रुजवण्याचा प्रयत्न केला.
जागतिकीकरण
युनूस यांनी “बहु-राष्ट्रीय सामाजिक व्यवसाय” करण्यावर भर दिला आहे. जे एकतर गरीबांना मालकी हक्क देतात किंवा झालेला नफा गरीब देशांमध्ये ठेवतात.
2007 मध्ये जेव्हा त्यांनी राजकारणात प्रवेश केला, तेव्हा त्यांनी चितगांव बंदराला महाद्वीपीय (continental) बंदरात रूपांतरीत करण्याची सूचना केली होती.
एका भारतीय वृत्तपत्राला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘जागतिक संस्कृती’ बद्दलही भाष्य केले आहे.
बांगलादेशातील उलथापालथ ही त्यांची अंतर्गत बाब आहे असे भाष्य करणाऱ्या भारतावर त्यांनी टीका केली आणि हा गोंधळ बांगलादेशच्या शेजाऱ्यांपर्यंतही पोहोचू शकतो असा इशारा दिला.
“ही त्यांची अंतर्गत बाब आहे असे म्हणण्यापेक्षा मुत्सद्देगिरीत असणाऱ्या अधिक समृद्ध शब्दसंग्रहाचा वापर करता आला असता,” असे ते म्हणाले.
महिला वर्ग
देशाचे भविष्य घडवण्यात महिलांचा मोठा हातभार असतो यावर युनूस भर देतात.
बांगलादेशात सध्या पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त असून आणि 97 टक्के महिला ग्रामीण बँकेच्या सदस्य आहेत.
तृप्ती नाथ
(रॉयटर्स)