भारत आणि चीनने त्यांच्या वादग्रस्त हिमालयीन सीमेवरील लष्करी स्टॅण्ड ऑफ दूर करण्यासाठी करण्यात आलेल्या कराराची अंमलबजावणी सुरू केल्याचे दोन्ही देशांनी शुक्रवारी सांगितले.
चार वर्षांपूर्वी उभय देशांच्या सैनिकामध्ये झालेल्या प्राणघातक संघर्षानंतर आशियाई दिग्गजांमधील तणाव हळूहळू कमी होत असल्याची ही चिन्हे आहेत.
पश्चिम हिमालयातील सीमेवर दोन पॉइंट्सवर आमनेसामने उभ्या ठाकलेल्या सैन्याने आता माघार घेण्यास सुरुवात केली असून ही कृती ‘स्टॅण्ड ऑफ संपला’ अशी घोषणा करणारी आहे असे एका भारतीय सरकारी सूत्राने सांगितले.
अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सीमेवर गस्त घालण्याच्या संदर्भात एक करार केला, ज्यामुळे रशियात पार पडलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात गेल्या पाच वर्षांतील पहिल्या औपचारिक चर्चेचा मार्ग मोकळा झाला.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी शुक्रवारी सांगितले की, “भारत आणि चीन यांच्यात नुकत्याच मान्य करण्यात आलेल्या करारानुसार … दोन्ही देशांनी त्यांचे सैन्य माघारी घेण्याचे काम आतापर्यंत सुरळीत सुरू असून संबंधित कामाची काटेकोर अंमलबजावणी करत आहेत.”
नवी दिल्लीत, या सगळ्या घडामोडींची माहिती असलेल्या एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही बाजूंच्या सैन्याने डेपसांग आणि डेमचोकच्या भागातून माघार घ्यायला सुरुवात केली होती, जिथे ते आमनेसामने उभे राहिले होते.
मात्र या अधिकाऱ्याला या विषयावर माध्यमांशी बोलण्याचा अधिकार नसल्याने त्याने आपले नाव गुप्त ठेवले.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणी प्रतिक्रिया द्यावी या रॉयटर्सच्या विनंतीला त्वरित प्रतिसाद मिळाला नाही.
20 भारतीय आणि चार चिनी सैनिक मरण पावले त्या गलवान संघर्षानंतर उभय देशांमधील ताणले गेलेले राजकीय आणि व्यावसायिक संबंध सुधारण्यास मदत होईल अशी अपेक्षा असलेल्या नवीन कराराचा कोणताही तपशील कोणत्याही देशाने अद्याप उघड केलेला नाही.
दोन्ही बाजूंनी याआधी इतर पाच फ्रिक्वेन्सी पॉइंट्सवरून सैन्य मागे घेतले होते, मात्र सैन्य माघारीची शेवटची फेरी दोन वर्षांपूर्वी पार पडली होती.
बुधवारी, शी आणि मोदी यांनी हा संघर्ष सोडवण्याच्या दृष्टीने मदत व्हावी या उद्देशाने संवाद आणि सहकार्य वाढविण्याचे मान्य केले.
असे असले तरी भारतातील अधिका-यांनी सांगितले की, आपण अजूनही सावध पवित्रा घेतला आहे. गेल्या चार वर्षांमध्ये विश्वासाला गेलेला तडा लक्षात घेता चीनशी आर्थिक संबंध निर्माण करण्याच्या दिशेने आपण अत्यंत लहान पावले उचलण्यास तयार आहोत.
या काळात भारताने चीनसाठीची थेट विमान उड्डाणे प्रतिबंधित केली, शेकडो चिनी मोबाईल ऍप्लिकेशन्सवर बंदी घातली आणि चिनी गुंतवणुकीची बारकाईने पडताळणी सुरू केली, बीवायडी आणि ग्रेट वॉल मोटर्ससारखे सर्व प्रमुख प्रस्ताव अक्षरशः रोखून धरले होते.
भारत सरकारच्या दोन सूत्रांनी सांगितले की, अलीकडील तणाव कमी करण्यासाठी भारत आता विमान सेवा सुरू करण्याचा आणि जलद ट्रॅकिंग व्हिसा मंजूरीचा विचार करण्याची शक्यता असली तरी नवी दिल्ली अजूनही बीजिंगविरुद्ध उचललेली सर्व पावले लवकर मागे घेण्यास अजिबात तयार नाही.
आशियातील या दोन मुख्य देशांमध्ये 1962 ला युद्ध झाले, तेव्हापासून त्यांच्यातील संबंधांमध्ये सातत्याने चढ उतार होत असतात.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)