हिमालयीन भागातील सीमेवर निर्माण झालेल्या तणावाला चार वर्षे पूर्ण होत असताना, चीन आणि भारत यांनी सीमा विवादाबाबतच्या वाटाघाटींना गती देण्याचे आणि सीमावर्ती भागात शांतता राखण्याचे मान्य केले आहे. बुधवारी नवी दिल्ली येथे झालेल्या सीमावादावरील चर्चेच्या 30व्या फेरीदरम्यान, दोन्ही बाजूंनी “चीन-भारत सीमेशी संबंधित विशिष्ट मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे, एकमेकांच्या योग्य त्या चिंतांवर विचार करणे आणि उभय देशांना योग्य वाटेल असा तोडगा लवकरच काढण्यावर” सहमती दर्शवली, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
या बैठकीनंतर भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, दोन्ही बाजूंनी “प्रलंबित समस्यांवर लवकर तोडगा काढण्याच्या दृष्टीने” वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
“शांतता आणि स्थैर्य पुनर्संचयित करणे आणि वास्तविक नियंत्रण रेषेचा आदर करणे हा द्विपक्षीय संबंध सामान्य परिस्थितीत आणण्यासाठी एक आवश्यक आधार आहे,” असे मंत्रालयाने सांगितले याशिवाय, बुधवारीची बैठक “सखोल, विधायक आणि दूरदर्शी” होती असेही म्हटले आहे.
दरम्यान, उभय देशांनी या बैठकीत “मुत्सद्दी आणि लष्करी मार्गांद्वारे संवाद राखणे, वाटाघाटी यंत्रणा अधिक बळकट करणे, वाटाघाटी प्रक्रियेला गती देणे, लवकरात लवकर सीमावरील परिस्थिती पूर्वपदावर आणणे तसेच चीन-भारत संबंधांच्या निरोगी आणि स्थिर विकासाला चालना देणे” यावर सहमती दर्शवली.
सीमेवरील विवादांनी द्विपक्षीय संबंधांवर वर्चस्व गाजवू नये किंवा त्यावर परिणाम करू नये, यावर बीजिंग बऱ्याच काळापासून ठाम आहे, तर भारताने असा आग्रह धरला आहे की संबंध पुन्हा रूळावर आणण्यासाठी सीमेबाबतचा मुद्दा मूलभूत आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या सीमा आणि सागरी विभागाचे महासंचालक होंग लियांग आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव गौरंगलाल दास यांच्या सहअध्यक्षतेखाली सीमा चर्चेवरील ही फेरी पार पडली. दोन्ही बाजूंच्या परराष्ट्र व्यवहार, राष्ट्रीय संरक्षण आणि स्थलांतर विभागाच्या प्रतिनिधींनीही या बैठकीत भाग घेतला.
गेल्या आठवड्यात भारत आणि चीनमधील सीमा विवादावर मंत्र्यांच्या पातळीवर चर्चा झाली. आसियन परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीच्या निमित्ताने चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी झालेल्या बैठकीत भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी द्विपक्षीय संबंधांच्या अपवादात्मक महत्त्वावर भर दिला. गेल्या चार वर्षांपासून सीमेवर विविध कारणांमुळे शांतता आणि सलोख्यात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होत असल्याबद्दलही परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. परस्पर आदर, परस्पर हितसंबंध आणि परस्पर संवेदनशीलतेच्या तत्त्वांवर हे संबंध आधारित असावेत, याचा जयशंकर यांनी पुनरुच्चार केला.
टीम भारतशक्ती