तालिबानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा उच्चस्तरीय भारत दौरा; वास्तवाशी होणार सामना

0

येत्या 10 ऑक्टोबर रोजी, तालिबान सरकारचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी भारताचा उच्चस्तरीय दौरा करणार असल्याची शक्यत आहे. आंतरराष्ट्रीय निर्बंध असूनही, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) अमीर मुत्ताकी यांना  प्रवासाची परवानगी दिल्यामुळे, या दौऱ्याची संभाव्यता अधिक वाढली आहे. नियोजनानुसार, दिल्लीत येण्यापूर्वी मुत्ताकी 6 ऑक्टोबर रोजी मॉस्कोला भेट देतील.

मुत्ताकी यांचा भारत दौरा निश्चित झाल्यास, ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्याच्यानंतर, तालिबानच्या वरिष्ठ नेतृत्वाताचा हा पहिला अधिकृत भारत दौरा ठरेल. याआधी अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी, त्यांचे सरकार पडण्यापूर्वी  भारतात आले होते.

दरम्यान, अफगाणी वृत्तपत्र हश्त-ए-सुब्ह डेलीच्या अहवालानुसार: तालिबानच्या शासकीय नेतृत्वात, विशेषतः सुरक्षा विभागात लवकरच मोठे बदल केले जाऊ शकतात. ज्यामध्ये, सध्याच्या गृहमंत्र्यांना पदावरुन हटवले जाऊ शकते, अशी अफवाही पसरली आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

भारतीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, “तालिबानी प्रतिनिधींशी होत असलेला कुठल्याही प्रकारचा संपर्क, हा टप्प्याटप्प्याने आणि सावधगिरीने केल्या जाणाऱ्या चर्चेचा एक भाग आहे. भारताने अद्याप तालिबान सरकारला औपचारिक मान्यता दिलेली नाही, मात्र काबूलमधील आपले तांत्रिक मिशन तसेच सुरु ठेवले आहे, तसेच विविध ठिकाणी तालिबानी प्रतिनिधींशी झालेल्या चर्चांच्या फेऱ्यांमध्ये भारताने आपली उपस्थिती दर्शवली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुबईमध्ये, अमीर मुत्ताकी आणि अन्य तालिबानी नेत्यांची भेट घेतली होती.

भारताने अफगाणिस्तान मधील मानवतावादी मदतकार्य सुरु ठेवले असून, त्यामध्ये अन्नधान्य, निर्वासितांसाठी सहाय्य आणि आरोग्य क्षेत्राला पाठिंबा यांचा समावेश आहे. याच वर्षी राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर, भारत आणि अफगाण संबंधांत एक महत्त्वाचे वळण आले होते, जेव्हा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मुत्ताकी यांच्यासोबत फोनवर चर्चा केली होती. या संवादात जयशंकर यांनी, अफगाणी जनतेशी असलेले ऐतिहासिक संबंध अधोरेखित करत, भारत पुढेही कायम संपर्कात राहील, असे आश्वासन दिले होते.

याव्यतिरिक्त, अफगाणिस्तानमध्ये 48 तासांसाठी बंद करण्यात आलेल्या इंटरनेट आणि मोबाईल सेवा, बुधवारी पुन्हा सुरु करण्यात आल्या. तालिबान प्रशासनाने तडकाफडकी दिलेल्या आदेशानुसार या सेवा बंद करण्यात आल्या होत्या, ज्यामुळे ऑनलाईन आर्थिक व्यवहार, बँकिंग सेवा, शेजारी देशांशी व्यापर आणि हवाई वाहतूक यासारख्या महत्वाच्या घटकांवर गंभीर परिणाम झाला. 

तालिबानकडून या बंदीमागचे कारण किंवा एकाकी ही बदी उठवण्यामागची भूमिका स्पष्ट करण्यात आली नसून, यामागे काही तांत्रिक कारणे असावीत, असे प्राथमिक वृत्तांमधून समोर आले आहे. अचानक उद्भवलेली ही समस्या, राजकीय अस्थैर्य आणि आर्थिक संकटाशी झुंजणाऱ्या सामान्य अफगाण नागरिकांसाठी अधिकच त्रासदायक ठरली.

अमीर खान मुत्ताकी, यांच्या संभाव्य भारत दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे, सर्व स्तरातून या भेटीचे निरीक्षण केले जाईल, कारण भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील परस्पर संबंध सध्या एका गुंतागुंतीच्या टप्प्यातून जात आहेत.

मूळ लेखिका- ऐश्वर्या पारिख

+ posts
Previous article“दहशतवादाला पाठिंबा देण्यापूर्वी विचार करा” भारताचा पाकिस्तानला इशारा
Next articleIAF प्रमुखांची आता LCA तेजस Mk1A ऐवजी Mk2 ला पसंती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here