भारत-इंडोनेशिया ब्रह्मोस क्षेपणास्त्र करार अंतिम टप्प्यात

0
ब्रह्मोस
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी ब्रह्मोसचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयतीर्थ आर. जोशी यांच्याशी संवाद साधला

ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांच्या निर्यातीसाठी 450 दशलक्ष डॉलर्सचा करार निश्चित करण्यासाठी भारत आणि इंडोनेशिया यांच्यात अंतिम टप्प्यातील चर्चा सुरू आहे. रविवारी, इंडोनेशियाच्या एका उच्चस्तरीय संरक्षण शिष्टमंडळाला या अचूक हल्ला करणाऱ्या शस्त्राच्या क्षमतेची माहिती देण्यात आली. सध्या ब्रह्मोस भारताच्या सशस्त्र दलांची आधारशिला बनले आहे.इंडोनेशियन नौदल प्रमुख मुहम्मद अली यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भारतातील ब्रह्मोस एरोस्पेस मुख्यालयाला भेट दिली. ब्रह्मोसच्या भारत-रशिया संयुक्त उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयतीर्थ आर. जोशी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या शिष्टमंडळाशी संवाद साधला.

“सुपरसॉनिक ब्रह्मोस शस्त्रप्रणाली आणि तिच्या क्षमतांची माहिती शिष्टमंडळाला देण्यात आली. त्यांच्या संवादादरम्यान, दोन्ही देशांनी संरक्षण आणि धोरण क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य आणखी मजबूत करण्याबाबतच्या कल्पना आणि मर्मज्ञता यांची देवाणघेवाण केली,” असे ब्रह्मोस एरोस्पेसने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

ब्रह्मोसच्या निर्यातीसाठी प्रस्तावित 450 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा हा करार झाला तर फिलिपिन्सनंतर 290 किलोमीटरच्या पल्ल्याचे क्षेपणास्त्र खरेदी करणारा इंडोनेशिया हा दुसरा आसियान देश ठरेल.

भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीतही प्रस्तावित विक्री हा चर्चेचा एक महत्त्वाचा मुद्दा होता.

“दोन्ही नेत्यांनी संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रासह भारत-इंडोनेशिया द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारीवर चर्चा करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मान्यवरांशी संवाद साधला. ब्रह्मोसचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयतीर्थ आर. जोशी उपस्थित होते आणि त्यांनी भविष्यातील संभाव्य सहकार्याबाबत इंडोनेशियातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला,” असे कंपनीने म्हटले आहे.


भारत आणि इंडोनेशियाने शनिवारी संरक्षण संबंध दृढ करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. एका संयुक्त निवेदनात इंडोनेशियाच्या देशांतर्गत संरक्षण उत्पादन क्षमता वाढवण्यातील स्वारस्य अधोरेखित करण्यात आले असून अध्यक्ष सुबियांतो यांनी या क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचे कौतुक केले.

“देशांतर्गत उत्पादन क्षमता निर्माण करण्याचे महत्त्व ओळखून, राष्ट्रपती प्रबोवो यांनी भारताच्या प्रगतीचे कौतुक केले आणि या क्षेत्रातील सहकार्य बळकट करण्यात स्वारस्य व्यक्त केले,” असे संयुक्त निवेदनात म्हटले आहे. याशिवाय अनुभव आणि कौशल्य सामायिकरणाद्वारे इंडोनेशियात सुरू असणाऱ्या संरक्षण आधुनिकीकरण कार्यक्रमांना पाठिंबा देण्यास भारताने सहमती दर्शवली आहे.

इंडोनेशियन नौदल आणि तटरक्षक दलाला लागणाऱ्या युद्धनौका तयार करण्याच्या दृष्टीने भारतीय शिपयार्डसाठी कोणत्या संधी आहेत याचाही इंडोनेशियन शिष्टमंडळ शोध घेत आहे.

ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे दोन प्रकार भारत देऊ करतोः समुद्रातील जहाजे किंवा जमिनीवरील लक्ष्य टिपू शकणारी किनाऱ्यावरील प्रणाली आणि जमीन तसेच समुद्र या दोन्ही ठिकाणच्या लक्ष्यांवर हल्ला करण्यास सक्षम जहाजातून प्रक्षेपित केलेली प्रणाली. भारतीय नौदल सक्रियपणे या दोन्ही आवृत्त्या वापरते.

भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेले ब्रह्मोस क्षेपणास्त्र त्याच्या अतुलनीय मॅक 3 गतीसाठी ओळखले जाते, ज्यामुळे त्याचा शोध घेणे किंवा प्रतिकार करणे अत्यंत कठीण होते. त्याची अचूकता आणि अष्टपैलूत्व या गुणांमुळे या क्षेपणास्त्राने याआधीच आंतरराष्ट्रीय ग्राहकांना आकर्षित केले असून फिलिपिन्स हा त्याचा पहिला खरेदीदार आहे. फिलिपिन्सने समुद्रातील जहाजांना लक्ष्य करण्यास सक्षम असलेली जमीन-आधारित आवृत्तीची मागणी केली होती, जी दक्षिण चीन समुद्रावरून चीनशी असलेल्या सागरी वादाच्या दरम्यान एक धोरणात्मक पाऊल आहे.

दक्षिण चीन समुद्राच्या वादात इंडोनेशिया थेट दावेदार नसला तरी, त्याने या प्रदेशावरील बीजिंगचे एकतर्फी दावे ठामपणे नाकारले आहेत.

यासंदर्भात चर्चेत प्रगती होत असताना, संभाव्य ब्रह्मोस करार भारत-इंडोनेशिया संरक्षण सहकार्य वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असणार आहे आणि प्रादेशिक संरक्षण निर्यातदार म्हणून भारताची वाढती भूमिका अधोरेखित करणार आहे.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleभारत आणि इंडोनेशियातील संरक्षण संबंध अधिक मजबूत करण्याची शपथ
Next articleहमासने गाझा युद्धबंदीचा भंग केल्याचा इस्रायलचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here