कुवेत अग्निकांडातील मृतांचे पार्थिव भारतात पोहोचले

0
India-Kuwait Fire:
कामगारांना पुरविण्यात आलेल्या निवासव्यवस्थेच्या ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीय कामगारांची पार्थिव शरीरे शुक्रवारी भारतात आणण्यात आली. कुटुंबीय, सरकारी अधिकारी, राज्य सरकारमधील मंत्री आणि नागरिकांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. (रॉयटर्स)

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत ४५ भारतीय कामगारांचा मृत्यू

दि. १४ जून: कामगारांना पुरविण्यात आलेल्या निवासव्यवस्थेच्या ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीय कामगारांची पार्थिव शरीरे शुक्रवारी भारतात आणण्यात आली. कुवेतमधील या अग्निकांडात ३५ भारतीय कामगार जखमी झाले असून. त्यांच्यावर कुवेतमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर परदेशी काम करून देशासाठी परकी चलन मिळविणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची विनंती मृतांच्या कुटुंबियांकडून केद्र सरकारकडे करण्यात येत आहे.

कुवेतमधील मंगाफ येथे कार्यरत असलेल्या भारतीय कामगारांना पुरविण्यात आलेल्या निवासव्यवस्थेत बुधवारी शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. या आगीत ४५ भारतीय कामगारांचा जळून मृत्यू झाला होता. तर, भाजल्यामुळे ३५ कामगार जखमी झाले होते. या कामगारांची पार्थिव आज थिरूवनंतपुरम विमानतळावर आणण्यात आली. या वेळी मृतांचे कुटुंबीय उपस्थित होते. ओळख पटविता यावी यासाठी मृतांचे पार्थिव असलेल्या शवपेटीसमोर त्यांचे छायाचित्र लावण्यात आले होते. विमानतळाच्या ‘कार्गो’ क्षेत्रात कुटुंबीय, सरकारी अधिकारी, राज्य सरकारमधील मंत्री आणि नागरिकांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर पोलिसांकडून मृतांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आली. या ४५ मृतांपैकी २३ कामगार केरळमधील आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी ही राष्ट्रीय आपत्ती असल्याचे म्हटले आहे. ‘विस्थापितांशी संबंधित ही सगळ्यात मोठी दुर्घटना आहे. या विस्थापितांना आम्ही आमची जीवनरेखा समजतो. त्यामुळे ही केरळची मोठी हानी आहे,’ असे विजयन यांनी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कुवेतसह आखातामध्ये मोठ्याप्रमाणात परकी कर्मचारी काम करीत आहेत. ही संख्या लाखोंच्या घरात आहे. मात्र, त्यांना राहण्यासाठी अपुरी निवासस्थाने देण्यात येतात. एका घरात किती कामगारांनी निवास करावा यावर काहीही नियंत्रण नाही. त्यामुळे अशी घटना घडली के मृतांची संख्या वाढते. या घटनेची चौकशी करणाऱ्या कुवेती पोलिसांनी एका कुवेती नागरिकासह काही कामगारांना सुरक्षेत निष्काळजी दाखविल्याबद्दल सामुहिक हत्याकांडाच्या आरोपाखाली अटक केली आहे. या ठिकाणी एकूण १७६ भारतीय कामगार राहत होते, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

सुमारे १ कोटी ३० लाख भारतीय कामगार जगभरात काम करीत असून, त्यातील सुमारे ६० टक्के कामगार आखतात काम करतात. तर, कुवेतमध्ये भारतीय कामगारांची संख्या साडेआठ लाख आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने २०२३ मध्ये संसदेत दिली होती.

विनय चाटी

(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’सह)


Spread the love
Previous articleरशियाचे अध्यक्ष पुतीन उत्तर कोरियाला भेट का देणार?
Next articleChinese Curiosity About India Surges, Over 90% Want to Learn More: Global Times Survey

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here