परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी घोषणा केली की भारतीय नौदलाची दोन अतिरिक्त जहाजे लवकरच मदतकार्यात सामील होणार आहे, त्याऊ या संकटाच्या वेळी आपल्या शेजाऱ्याला मदत करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला बळकटी मिळेल.
मानवतावादी मदतीची व्याप्ती वाढवली
तातडीची मानवतावादी मदत पुरवण्यासाठी विशेष वैद्यकीय कृती दल तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत शत्रुजीत ब्रिगेड वैद्यकीय प्रतिसादकांच्या 118 सदस्यांच्या पथकाचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल जगनीत गिल करणार असून, ते अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे आणि जीवनावश्यक पुरवठ्यासह शनिवारी रात्री उशीरा आग्रा येथून म्यानमारकडे रवाना झाली आहेत. आपत्तीग्रस्त भागात तात्काळ आणि प्रगत वैद्यकीय सेवा देण्यासाठी ‘एअरबोर्न एंजल्स टास्क फोर्स’ हे प्रशिक्षित आणि सुसज्ज पथक आहे.
शोध आणि बचाव कार्य आणखी सुरळीत करण्यासाठी काँक्रीट कटर, ड्रिल मशीन, हातोडे आणि प्लाझ्मा कटिंग मशीनबरोबर भूकंप बचाव उपकरणांसह भारताच्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) विशेष पथके तैनात केली गेली आहेत.
भारतीय लष्कर या अभियानाअंतर्गत 60 खाटांचे अत्याधुनिक वैद्यकीय उपचार केंद्र स्थापन करणार आहे, जे जखमींना तातडीचा उपचार आणि जीवनरक्षक सेवा पुरवेल. या केंद्रात गंभीर जखमींवर उपचार, आपत्कालीन शस्त्रक्रिया आणि इतर आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध असतील, ज्यामुळे या आपत्तीमुळे कोलमडलेल्या स्थानिक आरोग्य यंत्रणेला मोठा आधार मिळणार आहे.
गाझियाबाद येथील 8व्या एनडीआरएफ बटालियनचे कमांडंट पी. के. तिवारी हे अर्बन सर्च अँड रेस्क्यू (यूएसएआर) पथकाचे नेतृत्व करतात. एनडीआरएफचे उप महानिरीक्षक (ऑपरेशन्स) मोहसेन शाहेदी यांनी पुढील 24-48 तासांच्या गंभीर समस्येवर भर दिला आणि सांगितले की हा कालावधी जमिनीवर प्रभावी बचावकार्यासाठी महत्त्वपूर्ण असेल.
एनडीआरएफची तुकडी म्यानमारला रवाना
गाझियाबादमधील हिंडन हवाई तळावरून भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) दोन विमानांमधून एनडीआरएफच्या 80 सदस्यांच्या तुकडीला म्यानमारला पाठवण्यात आले आहे. आपत्ती प्रतिसादात प्रशिक्षित असलेले हे कर्मचारी, कोसळलेल्या इमारतींमध्ये अडकलेल्या वाचलेल्यांच्या शोधकार्यात मदत करण्यासाठी बचाव कुत्र्यांसह असतात. हे अभियान आंतरराष्ट्रीय शोध आणि बचाव सल्लागार गटाच्या (आयएनएसएआरएजी) निकषांचे पालन करते.
म्यानमारला भारताचा सातत्याने पाठिंबा
शेजारच्या थायलंडमध्येही भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला असून इमारती, पूल आणि इतर अनेक पायाभूत सुविधा नष्ट झाल्या आहेत. म्यानमारमध्ये हजारांहून जास्त लोकांनी आपला जीव गमावला असल्याचे म्हटले जात आहे.
2015 च्या नेपाळ भूकंप आणि 2023 च्या तुर्किये भूकंपादरम्यान परदेशात जशी एनडीआरएफची पथके तैनात केली होती तशीच पथके आताही तैनात करण्यात आली असून, भारताने आता म्यानमारपर्यंत आपले आपत्ती निवारण प्रयत्नांची व्याप्ती वाढवली आहे. शनिवारी आयएएफच्या सी-130जे लष्करी वाहतूक विमानाने यांगूनला सुमारे 15 टन मदत साहित्य पुरवले.
भारताचा मदतीचा हात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमार आणि थायलंडला शक्य ती सर्व मदत पुरविण्याच्या भारताच्या तयारीला दुजोरा देत या आपत्तीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. म्यानमारसोबत भारताची 1 हजार 643 किलोमीटर लांबीची सीमा आहे, जी या मोहिमेचे धोरणात्मक आणि मानवतावादी महत्त्व अधोरेखित करते.
भारत आपले प्रतिसाद प्रयत्न वाढवत असताना, ऑपरेशन ब्रह्मा हे प्रादेशिक एकता आणि आपत्ती निवारणासाठीच्या त्याच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.
टीम भारतशक्ती