‘अग्निकुल’चा अग्निबाण अवकाशात झेपावला: पंतप्रधान मोदींकडून प्रशंसा

0
India-Space Research:

‘स्पेस स्टार्ट-अप’: खासगी क्षेत्राकडून विकसित करण्यात आलेले दुसरे ‘रॉकेट’

दि. ३० मे: अवकाश संशोधन क्षेत्रातील ‘स्टार्ट-अप’ असलेल्या अग्निकुल कॉसमॉस या खासगी संस्थेने गुरुवारी आपला पहिला अग्निबाण (रॉकेट) अवकाशात प्रक्षेपित केला. अग्निकुल कॉसमॉसचा हा अग्निबाण भारतातून खासगी संस्थेकडून प्रक्षेपित करण्यात आलेला दुसरा खासगी अग्निबाण ठरला आहे. स्कायरूट नावाच्या संस्थेने २०२२मध्ये भारतातील पहिला खासगी अग्निबाण प्रक्षेपित केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल प्रशंसा करणारे ‘ट्विट’ केले आहे.

अवकाश संशोधन क्षेत्रातील भारताची आघाडीची संस्था असलेल्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) ‘एक्स’ या संकेतस्थळावर या विषयीची माहिती दिली आहे. ‘द्रवरूप सेमी-क्रायोजेनिक इंजिनाच्या सहायाने या अग्निबाणाचे प्रक्षेपण करण्यात आले. अशा प्रकारची ही पहिलीच नियंत्रित चाचणी होती. त्यामुळे देशाच्या अवकाश संशोधन क्षेत्रात ही चाचणी एक मैलाचा दगड ठरली आहे,’ असे ‘इस्रो’ने म्हटले आहे. अग्निकुलचे हे रॉकेट वायू आणि द्रवरूप अशा दोन्ही प्रकारच्या इंधनाचा वापर करून प्रक्षेपित करण्यात आले आहे. या पूर्वी चार वेळा अग्निबाणचे प्रक्षेपण काही तांत्रिक कारणांमुळे रद्द करण्यात आले होते. मंगळवारीही या रॉकेटचे प्रक्षेपण ते हवेत झेपावण्यापूर्वी पाच सेकंद आधी रद्द करण्यात आले होते. सेमी-क्रायोजेनिक इंजिनात काही अडचणी आल्याने हे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले होते. अग्निबाण हे सानुकूल (कस्टमाइजेबल) आणि दोन  टप्प्यात प्रज्वलीत होणारे प्रक्षेपक वाहन आहे. ते ३०० किलो इतके वजनाचे उपग्रह अवकाशात ७०० किलोमीटरच्या कक्षेत प्रक्षेपित करू शकते. गुरुवारी घेण्यात आलेली या रॉकेचे चाचणी ही त्याचे इंजिन आणि थ्रीडी प्रिंटेड भागाची क्षमता पाहण्यासाठी घेण्यात आली होती. चाचणी यशस्वी झाली असली, तरी ही चाचणी किती वेळ चालली आणि अग्निबाण अवकाशात किती उंचीवर पोहोचले होते, याचा तपशील अद्याप ‘अग्निकुल’कडून जारी करण्यात आलेला नाही.

अग्निबाणच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल भारताची अवकाश नियंत्रक संस्था असलेल्या ‘इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायझेशन सेंटर’ (इन-स्पेस) या संस्थेचे अध्यक्ष पावन के. गोयंका यांनी ‘ऐतिहासिक क्षण’ अशा शब्दांत या घटनेचे स्वागत केला आहे. तर, या घटनेमुळे भारताच्या अवकाश संशोधनाबाबत जागतिक विश्वास वाढीला लागेल,’ असे ‘इंडिअन स्पेस असोसिएशन’ने (आयएसपीए) म्हटले आहे. गेल्या काही वर्षांपासून अवकाश संशोधन क्षेत्रात खासगी उद्योगांना बळ देण्याचे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवलंबिले आहे, या मुळे त्याला गती मिळण्याची चिन्हे आहेत. अग्निकुल या संस्थेची अवकाश संशोधन करण्याच्या उद्देशाने २०१७मध्ये स्थापना करण्यात आली  होती. त्यांनी भारतातील पहिले खासगी प्रक्षेपण केंद्र आणि नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. भारतातील इतर सर्व प्रक्षेपण आणि नियंत्रण केंद्र ‘इस्त्रो’च्या मालकीची आहेत.

विनय चाटी

(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

 


Spread the love
Previous articleउत्तर कोरियाने पूर्वेकडे क्षेपणास्त्रे सोडल्याचा दक्षिण कोरियाचा दावा
Next articleदेशांतर्गत निर्मित सहाव्या बार्जचे नौदलाकडे हस्तांतर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here