ऑस्ट्रेलियन लष्करप्रमुखांचा भारत दौरा; संरक्षण भागीदारीला चालना

0
संरक्षण

नवी दिल्ली आणि कॅनबेरा यांच्यातील वाढत्या लष्करी संबंधांचे प्रतीक म्हणून, ऑस्ट्रेलियाचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल सायमन स्टुअर्ट, पुढील आठवड्यात भारतात येणार आहेत.

10 ते 14 ऑगस्ट या कालावधीत होणारी ही भेट, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संरक्षण भागीदारीला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. दोन्ही देशातील ही भागीदारी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील धोरणात्मक संरचनेला आकार देण्यासाठी अधिकाधिक मध्यवर्ती बनत आहे.

या वर्षाअखेरीस होणाऱ्या, आगामी QUAD नेत्यांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर, या भेटीला केवळ प्रतीकात्मक महत्त्व नाही, तर कार्यान्वयन आणि धोरणात्मक परिणामही आहेत. जनरल स्टुअर्ट, भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि इतर वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेमध्ये संयुक्त प्रशिक्षण, आंतरकार्यक्षमता (interoperability) आणि प्रादेशिक सुरक्षा समन्वयाचा समावेश अपेक्षित आहे.

केवळ प्रतिकात्मक नाही, तर वास्तविक बदल

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध ऐतिहासिकदृष्ट्या सौहार्दपूर्ण असले, तरी गेल्या दशकात लष्करी सहकार्याकडे निर्णायक वळण घेतले आहे. एकेकाळी धोरणात्मक संवादावर आधारित असलेले संबंध आता तांत्रिक पातळीवरील समन्वय, संयुक्त अभ्यास आणि सामायिक धोरणात्मक नियोजनामध्ये परिपक्व झाले आहेत. हे सर्व प्रादेशिक स्थिरता, नौवहनाची (navigation) स्वातंत्र्य आणि इंडो-पॅसिफिकमधील जबरदस्तीच्या वर्तनाला तोंड देण्याच्या परस्पर चिंतेवर आधारित आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित, टॅलिस्मन साब्रे (Talisman Sabre) सारख्या बहुपक्षीय सरावांमध्ये भारताचा वाढता सहभाग, आणि भारताच्या नेतृत्वाखालील उपक्रमांमध्ये ऑस्ट्रेलियाची नियमित उपस्थिती, दोन्ही देशांच्या लष्करी सिद्धांतांमध्ये आणि तैनाती तयारीत वाढत्या समन्वयाचे संकेत देतात.

ऑस्ट्रा-हिंद (AustraHind) सारखे सराव, जे आता द्विपक्षीय लष्करी संबंधांचा मुख्य भाग आहेत, ते केवळ प्रतिकात्मक सौहार्दापलीकडे जाऊन दहशतवादविरोधी, जंगल युद्ध आणि आपत्ती प्रतिसाद यांसारख्या वास्तविक जगातील आव्हानांवर लक्ष केंद्रित करतात.

संस्थात्मक रचना सुदृढ

2016 पासून सुरू असलेले, वार्षिक ‘आर्मी-टू-आर्मी स्टाफ टॉक्स’ – लष्करी उद्दिष्टे जुळवण्यासाठी, एक महत्त्वाचा मंच म्हणून काम करतात. त्याचप्रमाणे, 2+2 मंत्रीस्तरीय संवाद (Ministerial Dialogue) आणि संरक्षण धोरण चर्चा (Defence Policy Talks) यासह व्यापक द्विपक्षीय रचना हे सुनिश्चित करते की, संरक्षण सहकार्य केवळ तात्कालिक नसून धोरणात्मक आणि दूरदृष्टीचे आहे.

नेतृत्व विकास आणि क्रॉस-ट्रेनिंगमध्ये केलेली गुंतवणूकही तितकीच महत्त्वाची आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांचे अधिकारी, एकमेकांच्या संस्थांमधील कमांड आणि स्टाफ कोर्समध्ये नियमितपणे सहभागी होतात. 2022 मध्ये सुरू झालेला ‘यंग ऑफिसर्स एक्सचेंज प्रोग्राम’ (Young Officers Exchange Programme), इंडो-पॅसिफिकमधील भावी लष्करी नेत्यांना तयार करण्यासाठी एक आदर्श म्हणून उदयास आला आहे.

प्रशिक्षण मैदानापासून – तंत्रज्ञान सहकार्यापर्यंत

संयुक्त सराव आणि संस्थात्मक संवाद माध्यमांमध्ये लक्ष वेधून घेत असले, तरी सहकार्याचे आणखी एक शांत, पण महत्त्वाचे क्षेत्र उदयास येत आहे: संरक्षण नवोपक्रम (defence innovation). भारतीय कंपन्यांनी ऑस्ट्रेलियाला तांत्रिक प्रणालींची निर्यात सुरू केली आहे, आणि भारतीय लष्कराच्या डिझाइन ब्युरो व ऑस्ट्रेलियाच्या डिगर वर्क्स (Digger Works) यांच्यातील सहयोगी प्रकल्प परवडणाऱ्या आणि जुळवून घेता येणाऱ्या युद्धभूमीसाठी तयार उपायांचा शोध घेत आहेत.

हे दोन्ही देशांच्या संरक्षण तयारीच्या दृष्टिकोनातील एक मुख्य बदल दर्शवते, जिथे ते केवळ खरेदीदार आणि विक्रेते नसून लष्करी क्षमतेचे सह-निर्माते बनत आहेत.

इंडो-पॅसिफिकमधील वाढते महत्व

इंडो-पॅसिफिकमध्ये मोठ्या प्रमाणावर धोरणात्मक बदल होत असताना, ही भेट होत आहे. बदलत्या सत्ता समीकरणांदरम्यान QUAD राष्ट्रे आपली संरक्षण भूमिका पुन्हा निश्चित करत असताना, भारत-ऑस्ट्रेलिया लष्करी भागीदारी या प्रदेशातील समविचारी लोकशाही राष्ट्रांपैकी सर्वात अधिक कार्यान्वित आणि चपळ म्हणून समोर येत आहे.

दोन्ही देशांना हे माहीत आहे की इंडो-पॅसिफिकमध्ये विश्वसनीय प्रतिबंधक शक्तीसाठी केवळ नौदल राजकारण किंवा हवाई सरावापेक्षा अधिकची गरज आहे; यासाठी जमिनीवरची समज, सामायिक मानक कार्यपद्धती आणि अखंड लॉजिस्टिक्सची आवश्यकता आहे. या सर्व गोष्टी भारत-ऑस्ट्रेलिया लष्करी सहकार्यात पद्धतशीरपणे तयार केल्या जात आहेत.

भागीदारी ते तयारी

हा प्रदेश अधिक आव्हानात्मक भविष्यासाठी सज्ज होत असताना, भारत आणि ऑस्ट्रेलिया एक स्पष्ट संदेश देत आहेत की: धोरणात्मक विश्वास कार्यान्वयन तयारीमध्ये बदलला जात आहे आणि लष्कर-ते-लष्कर (Army-to-Army) संबंध या बदलाचे नेतृत्व करत आहेत.

– टीम भारतशक्ती

+ posts
Previous article‘Scholar-Warriors’ and Seamless Integration Will Win Future Wars: CDS
Next articleझेन टेक्नॉलॉजीजचा पेटंट स्पर्धेत विजय, प्रतिस्पर्धकाचा दावा रद्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here