भारत आणि अमेरिकेने प्रमुख संरक्षण भागीदारीला दिली गती

0

भारत आणि अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, भारत-अमेरिका 2+2 आंतरसत्रीय संवादाच्या निमित्ताने, व्हर्च्युअल माध्यमातून एक बैठक घेतली, ज्यात धोरणात्मक आणि संरक्षण भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या सामायिक वचनबद्धतेची पुनःपुष्टी करण्यात आली.

अलीकडच्या उच्च-स्तरीय भेटींच्या पार्श्वभूमीवर, द्विपक्षीय संरक्षण भागीदारीला प्राधान्य देण्यावर चर्चा झाली. आगामी “इंडिया-यु.एस. मेजर डिफेन्स पार्टनरशिप” या नवीन दहा वर्षांच्या करारावर स्वाक्षरी करणे, हा या चर्चेतील प्रमुख विषय होता. या कराराचा उद्देश: संरक्षण उत्पादन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, प्रादेशिक सुरक्षा समन्वय, आंतरिक-कार्यक्षमता आणि रिअल-टाइम माहितीची देवाणघेवाण, या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवणे हा आहे.

भारताकडून, या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले- परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव (अमेरिका) नागराज नायडू ककनूर आणि संयुक्त सचिव (आंतरराष्ट्रीय सहकार्य) विश्वेश नेगी यांनी. तर, अमेरिकेकडून दक्षिण आणि मध्य आशियाई व्यवहार विभागाच्या वरिष्ठ अधिकारी- बेथनी पी. मॉरिसन आणि इंडो-पॅसिफिक सुरक्षा व्यवहार विभागाचे कार्यवाहक सहाय्यक सचिव जेडिडिया पी. रॉयल, यांनी ही जबाबदारी सांभाळली.

दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी, “इंडिया-यु.एस. कॉम्पॅक्ट” उपक्रमांतर्गत संरक्षण भागीदारीला गती देण्यावर सहमती दर्शवली. ‘कॅटालायझिंग ऑपर्च्युनिटीज फॉर मिलिटरी पार्टनरशिप, अक्सिलरेटेड कॉमर्स अँड टेक्नॉलॉजी’ (Catalyzing Opportunities for Military Partnership, Accelerated Commerce & Technology) या उपक्रमाचे उद्दिष्ट- 21 व्या शतकातील सामरिक सहकार्याला योग्य दिशा देणे आहे. सहभागींनी या यंत्रणेचा उपयोग प्रमुख संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये नवकल्पना, संयुक्त विकास आणि सह-उत्पादन वाढवण्यासाठी करण्याचे मान्य केले.

संरक्षणाव्यतिरिक्त, भारत-अमेरिका संवादात प्रादेशिक स्थिरता, नागरी-अणुऊर्जा सहकार्य, गंभीर खनिजांचा विकास, तसेच अंमली पदार्थ आणि दहशतवादाचा सामना करणे यांसारख्या अनेक सामरिक प्राधान्यक्रमांवर चर्चा झाली. दोन्ही बाजूंनी मुक्त, खुले आणि समृद्ध इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी आपली सामायिक दृष्टी पुन्हा एकदा व्यक्त केली आणि QUAD माध्यमातून सहकार्य पुढे नेण्याची वचनबद्धता दर्शवली.

या महिन्याच्या सुरुवातीला, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) नवी दिल्लीला भेट देणाऱ्या अमेरिकेच्या उच्च-स्तरीय संरक्षण धोरण प्रतिनिधी मंडळाच्या दौऱ्याची पुष्टी केली होती. “पोषक करारांवर आधारित भारत-अमेरिका संरक्षण भागीदारी, आमच्या सामरिक संबंधांचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे,” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले.

या सहकार्याचा भाग म्हणून, दोन्ही देशांचे सैन्यदल लवकरच अलास्का येथे, ‘युद्ध अभ्यास 2025’ (Yudh Abhyas) हा आतापर्यंतचा सर्वात मोठा संयुक्त लष्करी सराव करणार आहे. हा द्विपक्षीय सराव 1 ते 14 सप्टेंबर दरम्यान होणार असून,  मद्रास रेजिमेंटच्या नेतृत्वाखाली 400 हून अधिक भारतीय लष्करी जवान या सरावात भाग घेतील, यातून द्विपक्षीय संरक्षण सहकार्याची वाढती व्याप्ती अधोरेखित होते.

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांना ठोस लाभ देतील, अशाप्रकारच्या संरक्षण आणि सामरिक संबंधांचा विस्तार सुरू ठेवण्याचा निर्धार, या संवादारम्यान दोन्ही बाजूंनी करण्यात आला.

– हुमा सिद्दकी

+ posts
Previous articleट्रम्प यांच्या टॅरिफ समस्येवर मोदी आणि इशिबा यांचा मात करण्याचा प्रयत्न
Next articleदक्षिण कोरियाची AI-केंद्रित आर्थिक वाढीला चालना देण्याची योजना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here