भारत – व्हिएतनाम द्विपक्षीय लष्करी सराव “विनबॅक्स 2024” ची 5 वी आवृत्ती आज हरियाणामधील अंबाला येथे सुरू झाली. हा सराव 4 ते 23 नोव्हेंबर 2024 या कालावधीत अंबाला आणि चंडीमंदिर येथे होणार आहे. हा सराव यापूर्वी 2023 मध्ये व्हिएतनाममध्ये आयोजित केलेल्या द्विपक्षीय सरावाचा एक भाग आहे तसेच भारत आणि व्हिएतनाममधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे.
भारतीय लष्कराच्या प्रसिद्धी पत्रकानुसार,ही आवृत्ती प्रथमच दोन्ही देशांतील लष्कर आणि हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांच्या द्विसेवा स्तरावरील सहभागासह कार्यक्षेत्रात लक्षणीय वाढ दर्शवते. 47 जवानांचा समावेश असलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीचे प्रतिनिधित्व कॉर्प्स ऑफ इंजिनियर्सच्या रेजिमेंटकडे असून इतर सशस्त्र दले आणि सेवांमधील जवानांचाही या दलात समावेश आहे. समान ताकद असलेल्या व्हिएतनामी सैन्य दलाच्या तुकडीचे प्रतिनिधित्व व्हिएतनाम पीपल्स आर्मी या तुकडीने केले आहे.
Vietnam-India Bilateral Exercise : #VINBAX 2024
The fifth edition of #VINBAX 2024, is scheduled to take place at Ambala from 04 to 23 November 24.
This year’s exercise features a first time integration of both countries’ Air Forces apart from Engineer Units from both Nations.… pic.twitter.com/ebUqrEmhHJ
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) November 2, 2024
संयुक्त राष्ट्रांच्या चार्टर VII अंतर्गत शांतता कायम राखण्याच्या मोहिमेत, संयुक्त राष्ट्र संघाचा भाग म्हणून अभियांत्रिकी कार्ये हाती घेण्यासाठी अभियंता तुकडी आणि वैद्यकीय पथकांची निवड आणि तैनातीमध्ये दोन्ही बाजूंची संयुक्त लष्करी क्षमता वाढवणे, हे विनबॅक्स-2024 चे उद्दिष्ट आहे.
द्विपक्षीय सरावाच्या मागील आवृत्त्यांमधून वर्धित व्याप्तीसह क्षेत्रीय प्रशिक्षण सराव म्हणून विनबॅक्स-2024 च्या आयोजनामुळे परस्पर विश्वास, आंतरकार्यक्षमता मजबूत होईल तसेच भारतीय लष्कर आणि व्हिएतनाम पीपल्स आर्मी यांच्यात सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण अधिक सक्षम होईल. मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण प्रात्यक्षिकांसह 48 तासांचा प्रमाणीकरण सराव आणि उपकरणांचे प्रदर्शन देखील आयोजित केले जाणार आहे. हे प्रदर्शन संयुक्त राष्ट्र मोहिमांमधील समान परिस्थितींमध्ये तांत्रिक लष्करी मोहिम राबवताना दोन्ही दलांनी साध्य केलेल्या मानकांचे मूल्यांकन करण्यासाठी असेल. या संयुक्त सरावामुळे दोन्ही देशांच्या सैन्याला एकमेकांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाबद्दल जाणून घेण्याची संधी मिळेल.
टीम भारतशक्ती