फ्लाइट लेफ्टनंट शाश्वत राणा यांना सर्वोत्कृष्ट अष्टपैलू करंडक
दि. २० मे: भारतीय हवाईदलातील ‘स्पेशल फोर्सेस’ म्हणविल्या जाणाऱ्या ‘गरुड कमांडोज’चे दीक्षांत संचलन चंदीनगर येथील हवाईदलाच्या गरुड रेजिमेंटल प्रशिक्षण केंद्रात (जीआरटीसी) पार पडले. या वेळी फ्लाइट लेफ्टनंट शाश्वत राणा यांना सर्वोत्कृष्ट अष्टपैलू करंडक प्रदान करण्यात आला. हवाईदलाच्या पश्चिम विभाग मुख्यालयाचे ‘सिनीअर स्टाफ ऑफिसर’ एअरमार्शल पी.के. वोहरा यांनी या संचलनाची मानवंदना स्वीकारली.
हवाईदलाच्या विशेष पथकाच्या ‘गरुड कमांडोज’चे प्रशिक्षण यशस्वी पूर्ण झाल्याबद्दल हवाईदलाच्या चंदीनगर तळावरील गरुड रेजिमेंटल प्रशिक्षण केंद्रात हे संचलन आयोजित करण्यात आले होते. या वेळी हे खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘स्पेशल फोर्सेस’ची ओळख असलेली किरमिजी रंगाची टोपी (मरून बेरेट) प्रदान करण्यात आली. ही टोपी ‘स्पेशल फोर्सेस’ची औपचरिक ओळख मानली जाते.
त्याचबरोबर या प्रशिक्षणार्थी कमांडोना गरुड प्राविण्य चिन्ह आणि ‘स्पेशल फोर्सेस टॅब’ देखील प्रदान करण्यात आले. तसेच, गुणवंत प्रशिक्षणार्थींना करंडक आणि चषक देखील प्रदान करण्यात आले. फ्लाइट लेफ्टनंट शाश्वत राणा यांना सर्वोत्कृष्ट अष्टपैलू करंडक प्रदान करण्यात आला. संचलनाचा एक भाग म्हणून या वेळी गरुड प्रशिक्षणार्थींनी लढाऊ गोळीबार कौशल्य, ओलिस ठेवलेल्या लोकांची सुटका, फायरिंग ड्रिल, स्फोटक हल्ला, अडथळ्यांची कसरत, भिंतीवर चढाई, स्लिदरिंग, रॅपलिंग आणि लष्करी मार्शल आर्ट्सची प्रात्यक्षिके सादर केली.
एअरमार्शल पी.के. वोहरा यांनी या संचलनानंतर ‘गरुड कमांडोज’शी संवाद साधला. गरुड कमांडो होण्यासाठी गरजेचे असलेले कठोर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल त्यांनी सर्व यशस्वी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. बदलत्या सुरक्षा विषयक वातावरणात देशाच्या सुरक्षेसाठी स्पेशल फोर्सेसची मोठी गरज आहे. अत्यंत अवघड आणि अशक्य वाटणारी आव्हाने गरुड कमांडोनी यशस्वी केली आहेत. अश्या आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी कठोर प्रशिक्षणाची गरज असते. या पुढील काळात देशाच्या सुरक्षेसाठी तुम्ही या प्रशिक्षणाचा उपयोग करावा,’ असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
गरुड प्रशिक्षणार्थ्यांनी आपले प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल हवाईदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ‘मरून बेरेट’ संचलन ही एक औपचारिक आणि महत्त्वपूर्ण मानली जाते. गरुड कमांडोनी हे अत्यंत कठीण असलेले प्रशिक्षण पूर्ण केल्याचे ते निदर्शक मानले जाते. दीक्षांत संचलन पार पडलेले हे कमांडो आता हवाईदलाच्या ‘एलिट’ गरुडदलात प्रवेश करतील.
विनय चाटी
(पीआयबी ‘इनपुट्स’सह)