भारतीय सैन्याने ‘आसाम रायफल्स’ सोबतच्या सामायिक ऑपरेशन्स मालिकेअंतर्गत, मणिपूरच्या डोंगराळ आणि खोऱ्यातील विविध जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि युद्धसाठा जप्त केला. मणिपूर पोलिस आणि इतर सुरक्षा दलांच्या सहकार्याने हे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती, सोमवारी भारतीय लष्कराने दिली.
या ऑपरेशन मालिकेअंतर्गत, गेल्या काही दिवसांपासून चुराचंदपूर, चंदेल, कांगपोकपी आणि इम्फाळ सारख्या पूर्व जिल्ह्यांमध्ये विशेष मोहिमा पार पडल्या. जप्त केलेल्या साठ्यामध्ये अत्याधुनिक बंदुका, स्थानिक पातळीवर तयार केलेली विविध शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा समावेश आहे, असे एका संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितले.
या ऑपरेशबाबत, ‘PRO Defence, Manipur, Nagaland & South Arunachal’ यांनी, ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर जारी केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सने, मणिपूर पोलिस आणि इतर सुरक्षा दलांच्या समन्वयाने आणि सहकाऱ्याने मणिपूरच्या टेकडी आणि डोंगराळ प्रदेशातून तसेच खोऱ्याच्या प्रदेशांतून 29 शस्त्रे, दारूगोळा आणि इतर युद्धसाठा (WLS) जप्त केला आहे. मणिपूरच्या चुराचंदपूर, चंदेल, कांगपोकपी आणि इंफाळ इत्यादी जिल्ह्यांमधून हा सर्व साठा ताब्यात घेण्यात आला आहे.
#IndianArmy & #AssamRifles, in coordination with @manipur_police & other security forces, recovered 29 weapons, ammunition & other war-like stores (WLS) from both hill & valley from Churachandpur, Chandel, Kangpokpi & Imphal(E) districts of #Manipur.@SpokespersonMoD @adgpi pic.twitter.com/Rr7cTedLjA
— PRO Defence, Manipur, Nagaland & South Arunachal (@prodefkohima) December 16, 2024
जप्त केलेल्या शस्त्रागारातील सामाविष्ट सामग्री:
Firearms (विविध प्रकारच्या बंदुका): एक AK-47 रायफल, १ स्नायपर रायफल, एक बर्मी बनावटीची 0.22 पिस्तूल, पाच बर्मी बनावटीची 9 मिमी पिस्तूल, एक बर्मी बनावटीची 7.65 मिमी पिस्तूल, एक .303 बोल्ट-ॲक्शन रायफल, दोन .303 एकेरी बोल्ट रायफल, एक 9 मिमी कार्बाइन मशीन गन (CMG), कारखान्यात तयार केलेल्या 12 मिमीच्या सिंगल-बॅरल रायफल, एक .22 रायफल आणि 12 मिमीची शॉटगन.
असॉल्ट रायफल्स: एक 5.56 मिमीची MA-4 असॉल्ट रायफल आणि एक MA-1 (MK-I) असॉल्ट रायफल.
स्थानिक पातळीवर बनवलेली शस्त्रे: तीन मोर्टार आणि सिंगल-बॅरल बंदूक.
अन्य वस्तू: एअर गन, ग्रेनेड्स, विविध दारुगोळ्यांचा मोठा साठा आणि इतर युद्धजन्य सामान.
या ऑपरेशनविषयी बोलताना एका संबंधित प्रवक्त्याने हे अधोरेखित केले की, ‘भारतीय लष्कर, आसाम रायफल्स, मणिपूर पोलिस आणि इतर सुरक्षा दलांनी कायद्याची अंमलबजावणी करत हे सामायिक ऑपरेशन योग्य समन्वय साधत यशस्वीरित्या पूर्ण केले’. ‘असे प्रयत्न या प्रदेशात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य राखण्यासाठी खूप आवश्यक असून, या ऑपरेशनच्या निमित्ताने सर्व दलातील अतूट बांधिलकीचे दर्शन घडते’, असेही ते पुढे म्हणाले.
दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, मोहिमेमध्ये जप्त केलेली सर्व शस्त्रे आणि दारूगोळा पुढील तपासासाठी मणिपूर पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.
टीम भारतशक्ती