भारतीय नौदलाच्या प्रगत पाणबुड्यांच्या चाचण्यांसाठी 60 हजार कोटी रुपयांच्या निविदेत परदेशी विक्रेत्यांशी भागीदारी, अधिक सक्षम आणि मोठ्या जहाजांसाठी स्वदेशी सामग्री आणि एआयपी प्रणालींवर भर देणे यांचा समावेश आहे.
भारतीय नौदलाने 60 हजार कोटी रुपयांच्या निविदेअंतर्गत देशात सहा अत्यंत प्रगत पाणबुड्या तयार करण्यासाठी चाचण्या सुरू केल्या आहेत. यामुळे भारतीय नौदलाच्या पारंपरिक पाणबुडीच्या ताफ्याचे आधुनिकीकरण सुरू होणार आहे.भारतीय नौदलाने माझगाव डॉकयार्ड्स लिमिटेड आणि लार्सन अँड टुब्रो या भारतीय शिपयार्ड्सना परदेशी विक्रेत्यांबरोबर भागीदारी करून सहा पाणबुड्या तयार करण्यासाठी निविदा जारी केली आहे.
या वर्षी मार्चमध्ये भारतीय नौदलाच्या चमूने जर्मन पाणबुडी उत्पादक थायसेनक्रुप मरीन सिस्टीम्सची एअर इंडिपेंडंट प्रोपल्शन प्रणाली पाहण्यासाठी जर्मनीतील कीलला भेट दिली तेव्हाच या चाचण्या सुरू झाल्या, असे संरक्षण उद्योगाच्या अधिकाऱ्यांनी एएनआयला सांगितले.
ही जर्मन कंपनी पाणबुडी निर्मितीच्या या मोठ्या निविदेसाठी भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) सोबत भागीदारी करत आहे.
एमडीएल हा निविदेतील प्रमुख भागीदार आहे, या पाणबुडीसाठी 60 टक्क्यांपेक्षा जास्त स्वदेशी सामग्री वापरली जाणार आहे.
चाचणीचा दुसरा टप्पा जून अखेरीस स्पेनमध्ये होणार आहे, त्यावेळी स्पॅनिश कंपनी नवंतिया आणि लार्सन अँड टुब्रो त्यांच्या एआयपी प्रणालीचे काम दाखवतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एआयपी ही भारतीय नौदलाने निविदेत नमूद केलेली सर्वात महत्त्वाची आवश्यक गरज आहे, कारण त्यामुळे पाणबुडीलाअधिक जास्त काळ पाण्याखाली राहण्याची क्षमता प्राप्त होईल. याशिवाय, स्पॅनिश कंपनी भारतीय टीमसाठी स्पॅनिश नौदलाच्या सुविधांचाही वापर करेल, असे त्यांनी सांगितले.
भारतीय नौदलाच्या पी75 (भारत) पाणबुडी कार्यक्रमासाठी तांत्रिक-व्यावसायिक बोली सादर करण्याच्या उद्देशाने स्पेनच्या नवंतिया आणि लार्सन अँड टुब्रो यांनी संयुक्त करारावर (टीए) स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
याशिवाय, प्रोजेक्ट-75 चा (इंडिया) उद्देश भारतीय नौदलासाठी इंधन सेल आणि एअर-इंडिपेंडंट प्रोपल्शन सिस्टम (एआयपी) असलेल्या डिझेल-इलेक्ट्रिक अटॅक पाणबुड्या खरेदी करणे हा आहे.
एआयपीमुळे सध्याच्या पाबुड्यांपेक्षा या पाणबुड्या आकाराने मोठ्या आणि अधिक प्रगत क्षमतेच्या असतील.
आराधना जोशी
(एएनआयच्या इनपुट्सह)