नौदल दिनाच्या पूर्वसंध्येला भारतशक्तीचे मुख्य संपादक नितीन अ. गोखले यांच्यासोबत एका खास मुलाखतीत बोलताना, नौदल प्रमुख (CNS) ॲडमिरल डीके त्रिपाठी यांनी ‘भारतीय नौदल हे लक्षणीय वाढीसाठी आणि परिवर्तनासाठी सज्ज आहे’ असे सांगितले. दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदलाच्या युद्धकाळातील सर्वात उल्लेखनीय कामगिरींपैकी एक असलेल्या 1971 च्या युद्धातील कराची बंदर हल्ल्याच्या स्मरणार्थ, ‘भारतीय नौदल दिन’ साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर ही खास मुलाखत घेण्यात आली होती.
मुलाखती दरम्यान बोलताना, ॲडमिरल त्रिपाठी म्हणाले की, ‘’नौदलाची सध्याची ताफा क्षमता जहाजे आणि पाणबुड्यांसह 129 इतकी असून, भविष्यात नौदलाची लढाऊ क्षमता वाढवण्यावर सर्वतोपरी लक्ष केंद्रित केले जात आहे. तूर्तास युनिट संख्या अपेक्षित पातळीवर वाढली नसली तरी आमच्या सध्याच्या जहाजांचे टनेज आणि तांत्रिक अत्याधुनिकता यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.’’ आम्ही आता अधिक आधुनिक आणि लढाऊ नौदल म्हणून स्वत:ला सिद्ध केले असल्याचेही त्यांनी यावेळी अभिमानाने सांगितले. पुढच्या पाच वर्षांत नौदलाचे आधुनिकीकरण अधिक वेगवान होईल, असा आशावाद ॲडमिरल त्रिपाठी यांनी यावेळी व्यक्त केला. पुढील वर्षभरात दर महिन्याला सरासरी एक जहाज किंवा पाणबुडी नौदलात समाविष्ट करून घेण्याचे नौदलाचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
स्वदेशी प्रयत्नांवर अधिक भर
ॲडमिरल त्रिपाठी यांनी मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘नौदल आधुनिकीकरणाच्या या मोहिमेमध्ये स्वदेशी बांधकामांवर अधिक भर दिला जाणार आहे आणि ही भारतीय नौदलाची पाच दशकांहून अधिक काळातील विशेष ओळख ठरणार आहे. सध्या भारतीय शिपयार्डमध्ये 63 जहाजे आणि पाणबुड्यांचे बांधकाम सुरू असून दोन अतिरिक्त जहाजे रशियामध्ये तयार केली जात असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.’
“हिंद महासागर सुरक्षित आणि स्थिर राहावा हे सुनिश्चित करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे आणि भारताच्या सागरी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत’’, असे त्रिपाठी यांनी मुलाखती दरम्यान सांगितले. याशिवाय भारताचे मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या अन्य देशांना आम्ही आवश्यक असेल तेव्हा मदत करत राहू, असेही ते यावेळी म्हणाले.
प्रगत तंत्रज्ञानाचा वापर
नौदलाच्या आधुनिकीकरणाच्या योजनेमध्ये, त्यातही विशेषत: पाण्याखाली कार्यरत असलेल्या डोमेन्समध्ये आम्ही अत्याधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याची माहिती, त्रिपाठी यांनी यावेळी दिली. नौदलाकडे सध्या अनेक विकसनशील प्रकल्प आहेत, ज्यात पाण्याखालील प्रगत प्रणालींचा तसेच आणि मानवरहित प्रणालींचा समावेश आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
स्वदेशी क्षमतेची भूमिका अधोरेखित करताना, ते पुढे म्हणाले, की “आमचे शिकारी ड्रोन, विस्तारित सहनशक्ती आणि मानवविरहीत ऑपरेशनल रेंज क्षमतांना बळ देतील. मला खात्री आहे की आमची स्वदेशी तांत्रिक क्षमता आणखी वाढेल, ज्यामुळे आम्हाला देशांतर्गत स्रोतांकडून भविष्यातील गरजा पूर्ण करता येतील.”
प्रादेशिक नेतृत्वाची दृष्टी
ॲडमिरल त्रिपाठी यांनी केवळ भारतासाठीच नाही तर शेजारी देशांसाठीही सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्याच्या मुद्द्यांवर यावेळी भर दिला. “भारतीय नौदलाच्या विकासात आणि स्थिरतेत योगदान देताना हिंद महासागर सुरक्षित ठेवणे ही जशी आमची जबाबदारी आहे तसेच आपली सागरी भागीदारी बळकट करण्यासाठी आणि मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या अन्य राष्ट्रांना गरज भासेल तेव्हा मदत करण्यासाठीही आम्ही वचनबद्ध आहोत,” असं ते म्हणाले.
नौदलाचा आधुनिकीकरणाचा प्रवास अत्याधुनिक प्रणालीवर आधारलेला असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. स्वदेशी नवोन्मेष आणि प्रादेशिक नेतृत्वावर लक्ष केंद्रित करून, भारतीय नौदल भविष्यातील आपली महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करण्याच्या मार्गावर आहे आणि यामुळे भारताचे सागरी हित पुढील अनेक दशकांपर्यंत सुरक्षित राहील याची आम्हाला खात्री आहे, असेही ॲडमिरल त्रिपाठी यांनी यावेळी स्पष्ट केले.
टीम भारतशक्ती
(अनुवाद – वेद बर्वे)