भारतीय नौदलाचे P8I प्रथमच युरोपियन सरावात सामील

0
भारतीय नौदलाचे P8I पोसेडॉन विमान

युरोपमधील ऐतिहासिक पदार्पण करताना, भारतीय नौदलाचे P8I पोसेडॉन विमान फ्रान्ससोबतच्या संयुक्त नौदल सराव वरुणात सहभागी होण्यासाठी एअर बेस 125 Istres-Le Tube येथे दाखल झाले आहे. युरोपमधील सरावात सहभागी होणे ही भारतीय नौदलाच्या दृष्टीने ऐतिहासिक घटना आहे.
“भारतीय नौदलाचे P8I विमान फ्रेंच नौदलासोबतच्या संयुक्त नौदल सरावात भाग घेण्यासाठी फ्रान्समध्ये दाखल झाले आहे,” असे नौदलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
भारत-फ्रान्स द्विपक्षीय नौदल सराव ‘वरूणा’ यंदा भूमध्य समुद्रात 2 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहे.
पूर्वीच्या आयएनएस विक्रांतवर कार्यरत असलेल्या अलिझे विमानाने हायरेस एअरबेसवर शेवटचे उड्डाण केल्यानंतर ६३ वर्षांनंतर ही घटना घडली आहे.
“वरुणा सरावात दोन्ही नौदलांमधील सखोल समन्वय आणि परस्पर कार्यक्षमता अधोरेखित करणाऱ्या प्रगत सामरिक सरावांचा समावेश असेल,” असे नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले.
P-8I पोसेडॉन हे सागरी गस्त आणि टेहळणीसाठी वापरले जाणारे विमान असून किनारपट्टीवरील गस्तीसाठी जबाबदार आहे. याशिवाय सागरी पाळत ठेवणे, पाणबुडीविरोधी आणि पृष्ठभागविरोधी युद्ध, शोध आणि बचाव, चाचेगिरीविरोधी कामगिऱ्या यांसारख्या इतर महत्त्वपूर्ण मोहिमांसाठी ते नौदलाव्यतिरिक्त लष्कर आणि हवाई दलासाठी देखील वापरले जाते.
भारतीय नौदलाचे फ्रंटलाइन फ्रिगेट, आयएनएस तबर, जे यापूर्वी टूलॉनमध्ये दाखल झाले होते, ते देखील या सरावात सहभागी होणार आहे.
वरुणा नौदल सराव हा भारतीय आणि फ्रेंच नौदलांमधील द्विपक्षीय सागरी कवायत आहे ज्यामध्ये मार्गदर्शित क्षेपणास्त्र फ्रिगेट्स, टँकर, सागरी गस्ती विमाने आणि दोन्ही बाजूंकडील इन्टिग्रल हेलिकॉप्टर्स यांचा समावेश आहे. 1993 मध्ये हा सराव सुरू करण्यात आला आणि 2001 मध्ये ‘वरुणा’ या नावाने तो ओळखला जाऊ लागला. तेव्हापासून भारत-फ्रान्स धोरणात्मक द्विपक्षीय संबंधांचे हा सराव वैशिष्ट्य बनले आहे. एकमेकांच्या सर्वोत्तम कार्यपद्धती शिकण्याची संधी या सरावातून मिळत असते.
संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हा सराव दोन्ही नौदलांदरम्यान सागरी व्यवस्थेसाठी परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी आवश्यक संवाद साधण्यास मदत करतो, जागतिक सागरी सुरक्षा आणि स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी सामायिक वचनबद्धतादेखील अधोरेखित करतो.
टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleचीनच्या सीमेजवळ भारतीय लष्कराकडून पर्यावरणपूरक प्रकल्पांची उभारणी
Next articleNetanyahu Insists Israeli Control On Philadelphi Corridor In Gaza

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here