भारतीय नौदलाच्या युद्धनौकेद्वारे 2500 किलो अंमली पदार्थ जप्त

0

आयएनएस तर्कष या भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडअंतर्गत कार्यरत आघाडीच्या युद्धनौकेने हिंद महासागराच्या पश्चिम क्षेत्रातील गस्तीदरम्यान 2500 किलो अंमली पदार्थ जप्त केले. या कारवाईतून भारतीय नौदलाची सागरी गुन्हेगारीविरुद्ध लढण्याची व क्षेत्रीय सुरक्षा बळकट करण्याची अतूट वचनबद्धता अधोरेखित होते, असे नौदलाने म्हटले आहे.

जानेवारी 2025 मध्ये सागरी सुरक्षेसाठी हिंद महासागराच्या पश्चिम क्षेत्रात तैनात करण्यात आलेली आयएनएस तर्कष ही युद्धनौका संयुक्त कृती दल (CTF) 150 या पथकाला सक्रिय मदत करते. CTF हा संयुक्त सागरी सुरक्षा दलाचा एक भाग असून त्याचा तळ बहारिनमध्ये आहे. ही युद्धनौका ऍन्झॅक टायगर या बहुराष्ट्रीय संयुक्त उद्देश लष्करी मोहीमेत सहभागी झाली आहे.

31 मार्च 25 रोजी गस्तीवर असताना आयएनएस तर्कष युद्धनौकेला P8I या भारतीय नौदलाच्या विमानाकडून त्या भागातील संशयास्पद नौकांची माहिती मिळाली. या नौका अमली पदार्थांच्या तस्करीसह अन्य बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असल्याची माहिती मिळाल्यानंतर तर्कष युद्धनौकेने आपला मार्ग बदलून संशयास्पद नौकांच्या मार्गात हस्तक्षेप केला. आसपासच्या सर्व संशयित नौकांची कायदेशीर चौकशी केल्यानंतर मुंबईतील सागरी कारवाई केंद्र आणि P8I  विमानाच्या समन्वयाने तर्कषवरील अधिकाऱ्यांनी एका संशयित नौकेवर प्रवेश केला.

सागरी कमांडोंसह विशेष पथकाने संशयास्पद नौकेवर दाखल होऊन शोधमोहीम राबवली. यामध्ये विविध बंद पाकिटे आढळली. पुढील तपासात या नौकांमधील वेगवेगळ्या भागांमध्ये, वेगवेगळ्या कप्प्यांत 2500 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ  ज्यात 2386 किलो हशीश व 121 किलो हेरोइन सापडले. या नौकेवर आयएनएस तर्कष युद्धनौकेने यशस्वीरित्या ताबा मिळविला आणि नौकेवरील कर्मचाऱ्यांची त्यांच्या कार्यपद्धतीबाबत तसेच त्या भागात असलेल्या अन्य नौकांबाबत सखोल चौकशी केली.


या कारवाईतून समुद्रातील अंमली पदार्थ तस्करीसह इतर बेकायदेशीर कृत्यांचा बीमोड व प्रतिबंध करण्यातील भारतीय नौदलाचे सामर्थ्य आणि व्यावसायिकता अधोरेखित होते. हिंद महासागर क्षेत्रातील (IOR) आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत सुरक्षा, स्थैर्य आणि समृद्धी यांना चालना देणे हे बहुराष्ट्रीय सरावांमधील सहभागाचे उद्दीष्ट असल्याचे भारतीय नौदलाने म्हटले आहे.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleForce Motors Secures Major Defence Contract for 2,978 Gurkha LSVs
Next articleफोर्स मोटर्सला मिळाले 2,978 गोरखा एलएसव्हीसाठीचे कंत्राट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here