किर्गिझस्तानमधील हिंसाचारानंतर भारतीयांना सांभाळून राहण्याचा सल्ला

0
किर्गिझस्तानमधील
विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये करण्यात आलेली तोडफोड

किर्गिझस्तानमधील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. किर्गिझस्तानमधून आलेल्या वृत्तानुसार तेथील स्थानिकांनी तीन पाकिस्तानी विद्यार्थ्यांना मारहाण करून जीवे मारले आहे. स्थानिक लोक इतर पाकिस्तानी विद्यार्थ्यांनाचाही शोध घेत आहेत. भारतीय आणि पाकिस्तानी एकसारखे दिसत असल्याने भारतीय विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने किर्गिझस्तानमध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक संदेश जारी केला असून त्यांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे.

किर्गिझस्तानमधील पाकिस्तानी विद्यार्थ्यांसोबत होणाऱ्या हिंसाचाराचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. पण काही इजिप्शियन आणि अरब विद्यार्थ्यांचे स्थानिकांशी भांडण झाले. त्यानंतर अरब विद्यार्थ्यांनी स्थानिकांना मारहाण केल्याचा दावा सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओंमध्ये केला आहे. मात्र ही मारहाण पाकिस्तानी विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे स्थानिकांनी पाकिस्तानी विद्यार्थ्यांना लक्ष्य करायला सुरुवात केली. स्थानिकांनी केलेल्या हल्ल्यात तीन पाकिस्तानी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करून ठार मारण्यात आले. इतर अनेक विद्यार्थ्यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. स्थानिकांनी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर हल्ला केला आणि तेथे सापडलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण केली. माध्यमांच्या वृत्तानुसार, हल्ला झालेल्या वसतिगृहात अनेक भारतीय आणि बांगलादेशी विद्यार्थीही राहतात. अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांनाही धोका निर्माण झाला आहे.

सोशल मिडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने लिहिले की, “आम्ही भारतीय विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहोत”. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, परंतु विद्यार्थ्यांना घरातच राहण्याचा आणि काही समस्या असल्यास दूतावासाशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनीही किर्गिझस्तानमधील परिस्थितीवर सोशल मीडिया पोस्ट केली. “आम्ही भारतीय विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी बिश्केकमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. तथापि, भारतीय विद्यार्थ्यांना सध्या घरातच राहण्याचा आणि दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मध्य आशियाई प्रजासत्ताकांमध्ये किर्गिझ प्रजासत्ताकमध्ये मोठ्या संख्येने परदेशी विद्यार्थी, विशेषतः दक्षिण आणि पश्चिम आशियातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी किर्गिझमध्ये येतात. त्यांच्या वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी तिथल्या अनेक संस्था प्रसिद्ध असून गेल्या अनेक दशकांपासून परदेशी विद्यार्थी तिथे शिक्षण घेत आहेत.

आराधना जोशी
(वृत्तसंस्था आणि भारतीय दूतावासाची सोशल मीडिया पोस्ट)


Spread the love
Previous articleपीओजेके : ‘कुणाच्यातरी कमकुवतपणा आणि चुकांमुळे ही वेळ आली’ – जयशंकर यांची टीका
Next articleU.S. NSA Sullivan On A Two-Day Visit To Saudi Arabia and Israel; Rafah On Minds of All Parties

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here