न्यूयॉर्क येथील भारतीय दूतावासाने जाहीर केले आहे की, लोकांच्या “आपत्कालीन गरजा” पूर्ण करण्यासाठी आठवड्याचे शेवटचे दिवस आणि इतर सुट्ट्यांसह दूतावासाचे कामकाज वर्षभर सुरू राहणार आहे.
न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की 10 मेपासून सर्व सुट्ट्यांच्या दिवशी दुपारी 2 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत दूतावासाचे काम सुरू राहणार आहे.
“सामान्य लोकांच्या आपत्कालीन गरजा पूर्ण करण्यासाठी दूतावास सर्व सुट्ट्यांमध्ये (शनिवार/रविवार आणि इतर सार्वजनिक सुट्ट्यांसह) दुपारी 2 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहील. याची अंमलबजावणी 10 मे 2024पासून होईल,” असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
📣New announcement
Consulate General of India, New York to remain open 365 days for emergency services.@binaysrikant76 @MEAIndia @IndianEmbassyUS @IndianDiplomacy @ANI @PIB_India @ITVGold @tvasianetwork @CPVIndia @Newsweek pic.twitter.com/1FFvgOxiFC
— India in New York (@IndiainNewYork) May 10, 2024
“ही सुविधा फक्त आणि फक्त आपत्कालीन परिस्थितीत असलेल्या लोकांसाठी आहे आणि नियमित दूतावास सेवांसाठी नाही, याचा पुनरुच्चार केला जातो”, असेही प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे.
यासाठी भारतीय दूतावासाने आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांकही (1-917-815-7066) जारी केला आहे. अर्जदारांना कोणत्याही आपत्कालीन सेवेसाठी दूतावासात येण्यापूर्वी या हेल्पलाईन नंबरवर कॉल करावा असा सल्ला दिला आहे. जे काम दूतावासाच्या पुढील कामकाजाच्या दिवसापर्यंत पुढे ढकलले जाऊ शकत नाही अशा आपत्कालीन सेवांसाठी आवश्यक सहाय्यक कागदपत्रांचे आहेत की नाही याची खात्री करणे तसेच ते काम आपत्कालीन सेवांच्या श्रेणीत येते का याची खात्री करण्यासाठी हा नंबर दिला आहे.
विशेष म्हणजे, ही सुविधा केवळ आपत्कालीन व्हिसा, आपत्कालीन प्रमाणपत्र (त्याच दिवशी भारतात प्रवास करण्यासाठी) आणि त्याच दिवशी मृतदेह पाठवणे अशा गोष्टींसाठी लागणाऱ्या प्रवासी कागदपत्रांच्या आपत्कालीन गरजांसाठी आहे.
आपात्कालीन व्हिसासाठी अर्जदाराकडून आपत्कालीन सेवा शुल्क आकारले जाईल, असे दूतावासाने म्हटले आहे.
न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावास कनेक्टिकट, मेन, मॅसॅच्युसेट्स, न्यू हॅम्पशायर, न्यू जर्सी, न्यूयॉर्क, ओहायो, पेनसिल्व्हेनिया, र्होड आयलंड आणि व्हरमॉंट या राज्यांना सेवा देतो.
पूर्वी टांझानियात भारताचे उच्चायुक्त असलेले व्यावसायिक मुत्सद्दी बिनय श्रीकांत प्रधान यांनी या वर्षी जानेवारीत न्यूयॉर्कमध्ये महावाणिज्य दूत म्हणून पदभार स्वीकारला.
आराधना जोशी
(वृत्तसंस्था)