स्वदेशी मिनी मशीन गन मेकर ‘लोकेश मशीन्स’ कंपनी आता एरोस्पेस क्षेत्रातही

0

संरक्षण विभाग आणि एरोस्पेससाठी आवश्यक घटकांचे उत्पादन करण्यासाठी लोकेश मशिन्सने मेडचल, हैदराबाद येथे एक नवीन युनिट सुरू केले आहे. यापूर्वी लोकेश मशिन्सने ‘9mm मशीन पिस्तूल’ या भारतातील पहिल्या ‘स्वदेशी मिनी मशीन गन’चे उत्पादन केले आहे. या नवीन युनिटचे उद्घाटन करताना, जी. सतीश रेड्डी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’संदर्भात या कंपनीने दाखविलेल्या बांधिलकीचे तसेच वचनबद्धतेचे कौतुक केले. जी. सतीश रेड्डी हे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे वैज्ञानिक सल्लागार आणि डीआरडीओचे (DRDO) माजी अध्यक्ष आहेत. निर्यातीवर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच लहान शस्त्रास्त्रांच्या विकासासाठी जागतिक मापदंड प्रस्थापित करण्याचेही त्यांनी यावेळी आवाहन केले.

कॉम्प्युटर न्युमरिकल कंट्रोल (संगणक संख्यात्मक नियंत्रण, CNC) कंपनीचे उत्पादक – लोकेश मशिन्सने, डीआरडीओ आणि भारतीय सैन्याचा एआरडीई (ARDE) विभाग यांच्या सहयोगाने यशस्वीरित्या लहान शस्त्रास्त्रे विकसित केली आहेत. गृह मंत्रालय (MHA) आणि विविध सशस्त्र दलांनी मिनी मशीन गनची बारकाईने चाचणी केली आहे. यासंदर्भात घेतलेल्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे या शस्त्रास्त्रांच्या खरेदी आणि वापरासाठी त्यांची शिफारस करण्यात आली असल्याचे कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

संरक्षण आणि एरोस्पेस युनिट असण्याची गरज स्पष्ट करताना कंपनीचे संचालक एम. श्रीनिवास म्हणाले की, “सध्या सीमेवरील तणावांमुळे भू-राजकीय परिस्थितीत सतत बदल होत आहेत. त्यामुळे आताच्या या अत्यंत निर्णायक काळात, प्रत्येक राष्ट्र आत्मनिर्भर होत चालले आहे. त्याचबरोबर ते महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान आणि त्याचा पुरवठा यावरही नियंत्रण ठेवत आहे. म्हणूनच भारतासारख्या प्रगतीशील देशाने सर्व अंतर्गत आणि बाह्य धोक्यांना तोंड देण्यासाठी स्वयंपूर्ण असणे आवश्यक आहे.”

शस्त्रास्त्रे आणि त्यासाठी लागणारी साधनसामग्री तयार करण्यासाठी हैदराबाद येथे ग्रीनफिल्ड सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात कंपनीची 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची योजना आहे. निर्यात सुरू झाल्यानंतर ही गुंतवणूक आवश्यकतेनुसार आणखी वाढविण्यात येणार आहे. त्याचबरोबर ही कंपनी सभोवतालच्या परिसरात एक व्हेंडर पार्क देखील निर्माण करत आहे, ज्यामुळे विक्रेत्यांची इकोसिस्टम विकसित होण्याबरोबरच लहान शस्त्रांच्या दुरुस्तीसाठी सातत्याने लागणारे भाग उत्पादित करण्यासाठीही त्यांची मदत होईल. कंपनीने दिलेल्या निवेदनानुसार, व्यावसायिक उत्पादन लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.

टीम भारतशक्ती

(अनुवाद : चित्रा दिवेकर)


Spread the love
Previous article“Sink China Warships,”: US General On Breaking Blockade Of Taiwan- Report
Next articleRussian President Vladimir Putin May Attend G20 Summit In India In September

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here