‘शक्ती-२०२४’: संयुक्त रणनीतिक मोहिमा आणि आंतरपरिचालनाचा सराव
दि. २६ मे: द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणि संयुक्त आंतरपरिचालन (इंटर-ऑपरेटीबीलीटी) वृद्धिंगत करण्यासाठी भारत आणि फ्रान्सच्या लष्करादरम्यान सुरु असलेल्या ‘शक्ती-२०२४’ या संयुक्त लष्करी सरावाचा रविवारी समारोप झाला. उभय देशांदरम्यान संयुक्त लष्करी सरावाची ही सातवी आवृत्ती होती. सराव सुरु करण्यापूर्वी ठरविण्यात आलेल्या उद्दिष्टांची पूर्ती झाल्याची खातरजमा दोन्ही देशांच्या संयुक्त लष्करी निरीक्षक गटाने केल्यानंतर हा सराव संपल्याचे जाहीर करण्यात आले.
भारत आणि फ्रान्सच्या लष्करादरम्यान मेघालयातील उमरोई येथे १३ मे पासून शक्ती-२०२४ या संयुक्त लष्करी सरावाला सुरुवात झाली होती. अपारंपरिक संघर्ष आणि युद्धाच्या काळात बहुक्षेत्रीय मोहिमा राबविण्याची उभय लष्कराची क्षमता वाढविणे, हे या सरावाचे प्राथमिक उद्दिष्ट होते. या बाबत संयुक्त राष्ट्रांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या सरावाचे आयोजन करण्यात आले होते. या संयुक्त सरावाचे उद्घाटन फ्रान्सचे भारतातील राजदूत थिएरी मथाऊ आणि भारतीय लष्कराच्या ५१ व्या सबएरियाचे प्रमुख मेजर जनरल प्रसन्न सुधाकर जोशी यांच्या उपस्थितीत झाले होते. शक्ती हा भारत आणि फ्रान्सच्या लष्करादरम्यान आयोजित केला जाणारा द्वैवार्षिक सराव आहे. हा सराव २०२१ मध्ये फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आला होता. या सरावात भारतीय लष्कराच्या राजपूत रेजिमेंटचे ९० जवान सहभागी झाले होते. त्याचबरोबर नौदल आणि हवाईदलाचे अधिकारी निरीक्षक म्हणून सरावाला उपस्थित होते. तर, फ्रान्सच्या ९० जणांच्या तुकडीत फ्रेंच लष्कराच्या १३ व्या फॉरीन लिजन हाफ ब्रिगेडच्या जवानांचा समावेश होता.
Exercise #Shakti 2024
The 7th edition of Joint Military Exercise #Shakti between #India🇮🇳 & #France🇫🇷 concluded at #Umroi in #Meghalaya, today. The closing ceremony witnessed final validation by Tri Service observer delegation group of both nations. The exercise facilitated… pic.twitter.com/5CFvFak2EX
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) May 26, 2024
शक्ती-२०२४ दरम्यान उभय लष्कराच्या जवानांनी निमशहरी आणि डोंगराळ भागातील मोहिमा, विशिष्ट भागातील दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम राबवून त्यांना ताब्यात घेणे, संयुक्त कमांड पोस्ट स्थापन करणे, संयुक्त टेहेळणी आणि गुप्तचर माहिती संकलन केंद्र स्थापन करणे, हेलिपॅडचे रक्षण करणे, संघर्षग्रस्त क्षेत्रात विशेष पथकाची तुकडी पाठविणे आणि पुन्हा सुरक्षित बाहेर काढणे, हेलिकॉप्टरच्या सहायाने करण्यात येणारी कारवाई, बंदोबस्त आणि शोधमोहीम, ड्रोन वापर आदी बाबींचा सराव केला. त्यातही प्रामुख्याने डोंगराळ आणि जंगली भागात मोहिमा राबविण्याचा व जंगली युद्धाचा विशेष सराव करण्यात करण्यात आल्याची माहिती गुवाहाटी येथील लष्कराच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली आहे.
भारत आणि फ्रान्सदरम्यान गेल्या काही वर्षांपासून संरक्षण सहकार्य वृद्धिंगत होत आहे. त्याचाच परिपाक म्हणून संरक्षणदलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी या वर्षीच्या एप्रिल महिन्यात फ्रान्सला भेट देऊन तेथील संरक्षणदलप्रमुख आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. या भेटीत दोन्ही देशांतील संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्यावर एकमत झाले होते. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन या वर्षीच्या प्रजासत्ताकदिन सोहळ्याचे मुख्य अतिथी होते. त्यांच्या दौऱ्यातही संरक्षण सहकार्याबाबत चर्चा झाली होती. फ्रान्सच्या लष्कराचे पथकही प्रजासत्ताकदिन संचलनात सहभागी झाले होते. फ्रान्सच्या राष्ट्रीयदिन सोहळ्यात भारतीय लष्कराचे पथक सहभागी झाले होते. उभय देशांतील वाढत्या लष्करी संबंधातील हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
विनय चाटी