सी-डिफेंडर्स-२०२४: उभय देशांच्या तटरक्षक दलांचा समावेश
दि. ०९ मार्च: हिंदी महासागर,तसेच इंडो-पॅसिफिक क्षेत्रात परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने भारत आणि अमेरिका यांच्या तटरक्षक दलात आजपासून, शनिवार ‘सी-डिफेंडर्स-२०२४’ या संयुक्त नौदल कवायतींना सुरुवात होणार आहे. या कवायतीत सहभागी होण्यासाठी अमेरिकी तटरक्षक दलाची बर्थऑल्फ ही अत्याधुनिक नौका अंदमान-निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे दाखल झाली आहे. ही संयुक्त कवायत नऊ आणि दहा मार्च, असे दोन दिवस आयोजित करण्यात आली आहे.
हिंदी महासागर क्षेत्रात सोमाली चाचांच्या हल्ल्यांमुळे व्यापारी वाहतूक धोक्यात आली आहे. त्याचबरोबर या जहाजाच्या व त्यावरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. त्यामुळे उभय देशांच्या तटरक्षक दलांतील ही कवायत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. भारत आणि अमेरिका यांच्या तटरक्षक दलांतील परस्पर सहकार्य व कारवाईसाठीची त्यांची तयारी वाढविण्याचे या कवायतींचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर समुद्री चाचेगिरी, अपारंपरिक सागरी धोके, व्यापारी जहाजांवर ड्रोणच्या माध्यमातून होणारे हल्ले, महासागरातील शोध व बचावकार्य, अग्निशमन, सागरी प्रदूषण, अमली पदार्थांची तस्करी, अशा वेगवेगळ्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे, याचे प्रात्यक्षिक या कवायतीदरम्यान करण्यात येणार आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्यावतीने देण्यात आली आहे.
विविध प्रकारच्या सागरी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारत आणि अमेरिकेतील परस्पर सहकार्य अतिशय महत्त्वाचे आहे, हे या संयुक्त कवयातीमुळे स्पष्ट होते. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सागरी वाहतुकीचे नियम व कायदे पाळले जावेत, यासाठी प्रयत्न करण्याची उभय देशांची वचनबद्धता या कवयातींच्या माध्यमातून सिद्ध होते. बर्थऑल्फ या नौकेची भारताला भेट हे त्या वचनबद्धतेचे प्रतिक आहे. उभय देशांत सामरिक भागीदारी तर वाढत आहेच, पण तटरक्षक दलांच्या संयुक्त कवायतींमुळे व्यावसायिक संबंधही वृद्धिंगत होतील, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
सशक्त तटरक्षक दल
भारताच्या सागरी सीमेचे व विशेष आर्थिक क्षेत्रातील आर्थिक हितांचे रक्षण करण्यासाठी तटरक्षक दलाला अधिक मजबूत करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. त्याला अनुसरून तटरक्षक दल सशक्त करण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी यंदा तटरक्षक दलासाठी ७,६५१ .८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, वेगवेगळ्या सागरी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व मदत कार्यासाठी दल सक्षम व्हावे या उद्देशाने तटरक्षक दलाच्या भांडवली खर्चासाठी साडेतीन हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे.
नितीन चव्हाण