इंडोनेशियाच्या रुआंग पर्वतावर बुधवारपासून (17 एप्रिल) सातत्याने ज्वालामुखीचा उद्रेक होत असून 24 तासांत पाच स्फोट झाले आहेत. स्फोटामुळे लाव्हा हजारो फूट उंच उडाला आणि राख पसरली. यातील काहींची उंची दीड किलोमीटर इतकी नोंदवली गेली.
आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी लाव्हा आणि राखेपासून त्सुनामीचा इशारा दिला आहे. यासोबतच तेथे राहणाऱ्या 11 हजारहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. पर्यटकांना रुआंग पर्वतापासून किमान 6 किमी लांब अंतरावर राहण्यास सांगण्यात आले आहे.
इंडोनेशियाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेने सांगितले की, रहिवाशांना सुलावेसी बेटावरील मनाडो या जवळच्या शहरात स्थलांतरित केले जाईल. बोटीतून हा 6 तासांचा प्रवास आहे.
रुआंग पर्वतापासून 100 किमी अंतरावर असलेला मनाडो येथील सॅम रतुलंगी विमानतळ गुरुवारी संध्याकाळपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. ज्वालामुखीच्या राखामुळे उड्डाणांना धोका निर्माण होऊ शकतो म्हणून हा एक खबरदारीचा उपाय आहे.
माउंट रुआंग हा उत्तर सुलावेसी प्रांतात असून त्यातून नियमितपणे ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी रात्री 9.45 वाजता तिथे पहिला स्फोट झाला आणि नंतर बुधवारी 17 एप्रिलपर्यंत चार वेळा स्फोट ऐकू आले.
इंडोनेशियातील ज्वालामुखी एजन्सीने दिलेल्या निवेदनात स्थानिकांना “ज्वालामुखीचे ढीग समुद्रात कोसळल्यामुळे खडक, गरम ढग आणि त्सुनामीच्या संभाव्य धोक्याबाबत सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.”
ज्वालामुखीचा काही भाग समुद्रात कोसळू शकतो आणि 1871च्या उद्रेकाप्रमाणे त्सुनामी येऊ शकते अशी चिंता अधिकाऱ्यांना आहे. ज्वालामुखीच्या ईशान्येकडील टागुलांडांग बेटाला धोका निर्माण झाला असून तेथील रहिवाशांना बाहेर पडण्यास सांगितले जात आहे.
2018 मध्ये, इंडोनेशियाच्या क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे पर्वताचे काही भाग समुद्रात पडल्यानंतर सुमात्रा आणि जावाच्या किनारपट्टीवर त्सुनामी आली आणि 430 लोकांचा मृत्यू झाला.
आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की रुआंग पर्वतावर नुकत्याच झालेल्या दोन भूकंपांमुळे ज्वालामुखीचा उद्रेक झाला, ज्यामुळे टेक्टोनिक प्लेट्समध्ये अस्थिरता निर्माण झाली.
इंडोनेशियामध्ये 120 सक्रिय ज्वालामुखी आहेत. पॅसिफिक महासागराभोवती भूकंप रेषांच्या ‘रिंग ऑफ फायर’ या घोड्याच्या नाल्याच्या आकारामध्ये असल्यामुळे तिथे ज्वालामुखीच्या उद्रेकांची शक्यता आहे.
केतकी आंग्रे
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)