इंडोनेशिया आणि रशियन नौदलांच्या पहिल्या संयुक्त सरावाला सुरूवात

0
इंडोनेशिया

इंडोनेशिया आणि रशियाच्या नौदलांनी सोमवारी जावा समुद्रात त्यांचा पहिल्या संयुक्त लष्करी सरावाला सुरूवात केली, असे इंडोनेशियाच्या नौदलाने सांगितले. विश्लेषकांच्या मते,  आग्नेय आशियाई भागातील इंडोनेशियाची कोणत्याही देशाशी मैत्री करण्याची असणारी इच्छा यातून दिसून येते.

इंडोनेशियाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांटो यांनी अलिकडेच संरक्षण क्षेत्रात रशियाशी घनिष्ठ संबंध ठेवण्याचे वचन दिलेले असतानाच हा संयुक्त सराव पार पडला आहे. आपल्या देशाच्या दीर्घकाळ चाललेल्या गटनिरपेक्षता (non-alignment) परराष्ट्र धोरणाचा भाग म्हणून कोणत्याही देशाशी संबंध प्रस्थापित करण्याचा हा त्यांचा एक प्रयत्न आहे.

संयुक्त सराव

रविवारी चार रशियन युद्धनौका इंडोनेशियाला पोहोचल्यानंतर 4 ते 8 नोव्हेंबर दरम्यान राजधानी जकार्ताच्या पूर्वेकडील सुराबाया शहराजवळ जावा समुद्रात सराव पार पडेल, असे नौदलाचे प्रवक्ते आय मेड वीरा हाडी अरसांता वर्धन यांनी सोमवारी सांगितले.

“हा संयुक्त सराव इंडोनेशिया आणि रशियाच्या नौदलांमधील आंतरराष्ट्रीय भागीदारीची वास्तविकता आहे, जी सातत्याने चांगली राहिली आहे,” असे वर्धन यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात रशियन प्रतिनिधीमंडळाच्या हवाल्याने म्हटले आहे की हा सराव दोन्ही नौदलांसाठी ज्ञानाची देवाणघेवाण व्हावी यासाठी तयार करण्यात आला होता.
जकार्ता येथील रशियन दूतावासाने या सरावाबाबत प्रतिक्रिया देण्याच्या विनंतीला त्वरित प्रतिसाद दिला नाही.

इंडोनेशियातील रशियाचे राजदूत सर्गेई टोल्चेनोव्ह यांनी गेल्या महिन्यात रशियन राज्य वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की हा सराव “रशिया आणि इंडोनेशियाचा पहिलाच मोठ्या प्रमाणावरील नौदल सराव” आहे.

रशियाचा मित्र

विश्लेषकांच्या मते हा सराव इंडोनेशियाची कोणत्याही देशाशी मैत्री करण्याची सक्रिय इच्छा दर्शवते.

आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्राध्यापक योहानेस सुलेमान म्हणाले, “याचा अर्थ असा होऊ शकतो की इंडोनेशियाला प्रत्येकाशी काम करायचे आहे,” ते पुढे म्हणाले की, प्राबोवोच्या परराष्ट्र धोरणातील रणनीतीबाबत अजूनही काही प्रश्न आहेत आणि हा सराव म्हणजे आपण रशियाचे अजूनही मित्र आहोत हे दाखवण्याचा मार्ग असू शकतो.

प्राबोवो जुलैमध्ये मॉस्को दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्यांनी रशियाला आपला ‘चांगला मित्र’ असे म्हटले होते.

इंडोनेशियाने इतर देशांसोबतही लष्करी सराव केले आहेत. 2006 पासून अमेरिकेबरोबर वार्षिक “सुपर गरुड शील्ड” सरावाचे तो आयोजित करत असतो आणि 2024 मध्ये झालेल्या या सरावात 4 हजार 500 हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते आणि हा सराव दोन आठवडे चालला.

ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleKyiv Assured Of German Support Ahead Of U.S. Vote
Next articleभारत – व्हिएतनाम संयुक्त लष्करी सराव अंबाला येथे सुरु

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here