आयएनएस सुरतच्या पहिल्या टप्प्यातील सागरी चाचण्यांना सुरूवात झाली आहे. त्यामुळे लवकरच कार्यान्वित होणारे विध्वंसक जहाज म्हणून भारतीय नौदलाला पुढील काळात मोठी बळकटी मिळणार आहे. प्रोजेक्ट-15 बी किंवा विशाखापट्टणम वर्गातील चौथे आणि शेवटचे स्टील्थ विध्वंसक जहाज आहे. नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने स्वतः त्याचे डिझाइन तयार केले असून माझगाव डॉक लिमिटेडद्वारे त्याची उभारणी केली गेली आहे. नौदलाने या जहाजाची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. जहाजाची पहिली सागरी चाचणी सुरू करण्यात आली आहे. या वर्षाच्या अखेरीस नौदलातील आघाडीच्या ताफ्यात त्याचा समावेश होण्याची अपेक्षा आहे. आयएनएस विशाखापट्टणम, आयएनएस मोर्मुगाओ आणि आयएनएस इंफाळ यांचा समावेश असलेल्या श्रेणीचे प्रमुख जहाज म्हणून आयएनएस सुरत इतर जहाजांसोबत काम करेल.
नौदलाने कोलकाता-श्रेणीच्या विध्वंसक जहाजांचे आधुनिकीकरण केले असून त्यांना विशाखापट्टणम-श्रेणी विध्वंसक असे नाव दिले आहे. हे जहाज मूळ वर्गातील जहाजांपेक्षा वेगळे आहे. जहाजांच्या नवीन वर्गात ब्रिज लेआउटचा वेगळा प्रकार आहे. नवीन ब्रिज लेआउटमुळे जहाजाचा रडार क्रॉस सेक्शन (RCS) कमी होतो. याची रचना अधिक मजबूत आहे. कोलकाता श्रेणीतील इतर युद्धनौकांमध्ये आतापर्यंत 59 टक्के स्वदेशी घटक वापरले गेले आहेत. त्याच्या तुलनेत नवीन जहाजांमध्ये स्वदेशी घटकांची टक्केवारी 72 टक्के इतकी आहे.
आयएनएस सुरत जेव्हा कार्यान्वित होईल, तेव्हा तिचे वजन 7 हजार 400 टन आणि लांबी 163 मीटर असेल आणि ती ताशी सुमारे 60 किमी वेगाने अंतर पार करू शकेल. हे जहाज कमाल 15 हजार किमीवरील लक्ष्याचा भेद करू शकेल. जहाजाच्या लढाऊ व्यवस्थापन प्रणालीमध्ये इस्रायलमध्ये बनवलेले बहुउद्देशीय एईएसए रडार, बीईएलने बनवलेली रडार आणि सोनार (पाण्यामध्ये बुडालेल्या वस्तूचा ठावठिकाणा ध्वनिलहरींकडून येणाऱ्या प्रतिध्वनींच्या साहाय्याने निश्चित करण्याचे साधन किंवा पद्धती) तर डॅनिश कंपनी टर्माच्या सहकार्याने टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेडने तयार केलेल्या रडारचा समावेश आहे. या जहाजावर बीईएलने बांधलेली देशांतर्गत सोनार प्रणाली तसेच इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर स्वीटदेखील (Suite) आहे.
जहाजावर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे बसवता येणार आहे. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यावर प्राणघातक सोळा ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे वाहून नेता येतील. याशिवाय यावर शक्तिशाली बराक-8 क्षेपणास्त्र देखील आहे जे 100 किमी अंतरावर असलेल्या शत्रू विमानांना लक्ष्य करू शकते. हे जहाज स्वसंरक्षणासाठी 76 मिमी ओटीओ मेलारा नेव्हल गन आणि चार एके -630 एम क्लोज-इन वेपन सिस्टमसह सुसज्ज आहे.
विध्वंसक टॉरपिडोंनी हे सुसज्ज असून शत्रूकडून येणाऱ्या टॉरपिडो आणि क्षेपणास्त्रे या दोन्हींचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना देखील यात समाविष्ट करण्यात आल्या आहे. याशिवाय, सी किंग्ज आणि एएलएच ध्रुव किंवा एमएच 60 रोमियोस यापैकी एक अशी दोन हेलिकॉप्टर्स जहाजावर तैनात असणार आहेत. या वर्गातील जहाजांमध्ये रेललेस हेलिकॉप्टर ट्रॅव्हर्सिंग प्रणाली आहे. ही यंत्रणा समुद्रात प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्यास हेलिकॉप्टर्सना सुरक्षित करते.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तत्कालीन नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरीकुमार यांच्या उपस्थितीत जहाजाचे अनावरण केले होते. आयएनएस सुरत हे गुजरातमधील एका शहराचे नाव दिलेले पहिलेच नौदल जहाज आहे. या शहराला एक प्रस्थापित सागरी वारसा असून ते जहाज बांधणीचे केंद्र आणि बंदराचे शहर म्हणून ओळखले जाते. सध्या व्यस्त कायम असणाऱ्या हजीरा बंदराचे शहर म्हणून सुरतची ओळख बनली आहे. या जहाजाच्या बोधचिन्हामध्ये हजीराच्या दीपगृहाचे चित्र असून त्यात आशियाई सिंहही बघायला मिळतात.
ध्रुव यादव