पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त
दि. २० मे: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्याची माहिती इराणची अधिकृत वृत्तसंस्था ‘इर्ना’ने (आयआरएनए) आपल्या ‘एक्स’ या संकेतस्थळावरील ‘हँडल’वर दिली आहे. इराणच्या उत्तर भागात अझरबैजानच्या सीमेजवळ हा अपघात झाल्याचे म्हटले आहे. या अपघातात रईसी यांच्यासह इराणचे परराष्ट्रमंत्री, इराणच्या ताब्यातील पूर्व अझरबैजानचे राज्यपाल आणि इमाम यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. रईसी २०२१मध्ये इराणच्या अध्यक्षपदी निवडून आले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रईसी यांच्या निधनाबद्दल शोक प्रकट केला असून, या संकटकाळात भारताचे नागरिक इराणबरोबर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
इराणच्या वायव्येकडील खोदा आफरीन या भागात अझरबैजानच्या संयुक्त सीमेला लागून असलेल्या एका धरण प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी रईसी आणि इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अमीर अब्दुल्लाहियान, पूर्व अझरबैजानचे राज्यपाल मलेक राहमती, पूर्व अझरबैजानचे इमाम मोहंमद आली आले-हशेम यांच्यासह गेले होते. अझरबैजानचे अध्यक्ष इलहाम अलीयेव यांचीही त्यांनी भेट घेतली होती. हा समारंभ आटोपून ते राजधानी तेहरानकडे निघाले होते. खोदा आफरीन येथून उड्डाण केल्यानंतर ३० मिनिटांनी त्यांच्या हेलिकॉप्टरचा नियंत्रणकक्षाशी असलेला संपर्क तुटला आणि ते घनदाट जंगलात बेपत्ता झाले. पावसामुळे या भागात पोहोचण्यासही मदतपथकाला अडचणी येत होत्या. या मदत व बचावपथकाने ड्रोनच्या मदतीने रईसी यांच्या हेलिकॉप्टरचा शोध सुरु केला होता. अखेर, सोमवारी सकाळी त्यांना अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष मिळाले. ‘इर्ना’ने या अवशेषांचे चित्रणही दाखविले. ‘आम्हाला अध्यक्षांच्या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष मिळाले असून, परिस्थिती चागली वाटत नाही,’ असे इराणच्या ‘रेड क्रीसेंट’ या संघटनेच्या प्रमुखांनी सरकारी दूरचित्रवाणीला सांगितले. इराणच्या सरकारी माध्यमांनी या मागे घातपात असल्याची शक्यता फेटाळली असून, हा एक अपघात असल्याचे म्हटले आहे.
Deeply saddened and shocked by the tragic demise of Dr. Seyed Ebrahim Raisi, President of the Islamic Republic of Iran. His contribution to strengthening India-Iran bilateral relationship will always be remembered. My heartfelt condolences to his family and the people of Iran.…
— Narendra Modi (@narendramodi) May 20, 2024
रईसी हे बेल-२१२ जातीच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करीत होते. रविवारी संध्याकाळी हे हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या शोधासाठी मोठी मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, अंधार आणि मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या. त्यात दाट धुके आणि थंडीचीही भर पडली होती. रात्रीपासूनच हेलिकॉप्टरच्या शोधासाठी मदत व बचावपथकाने जंगजंग पछाडले होते. त्यांना या ठिकाणी पोहोचण्यास बर्फाच्या वादळाचाही सामना करावा लागला. या भागातील तापमान शून्याच्याही खाली गेल्यामुळे कोणत्याही जखमीचे जिवंत असणे दुरापास्त असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली होती. अझरबैजानचे अध्यक्ष अलीयेव यांनी रईसी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. रविवारी संध्याकाळीच मी त्यांना निरोप दिला होता. त्यावेळी असे काही घडेल याची पुसटशीही कल्पना आली नाही, असे ते म्हणाले.
विनय चाटी
(वृत्तसंस्था ‘इनपुट्स’सह)