इस्रायलवरील आपला क्षेपणास्त्र हल्ला आता थांबवला असल्याचे इराणने बुधवारी पहाटे जाहीर केले. मात्र इस्रायल आणि अमेरिकेने युद्ध अधिक व्यापक होण्याच्या भीतीने तेहरानला प्रत्युत्तर दिले जाईल असे म्हटले आहे.
मंगळवारी रात्री 180हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा समावेश असलेल्या या हल्ल्यासाठी इराणला “गंभीर परिणामांना” सामोरे जावे लागेल आणि हे करण्यासाठी आपण आपला दीर्घकालीन सहकारी इस्रायलसोबत काम करू, असे अमेरिकेने म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने बुधवारी मध्यपूर्वेबाबत बैठक बोलावली असून युरोपियन युनियनने त्वरित युद्धबंदीची मागणी केली आहे.
पुढील प्रत्युत्तर मिळेपर्यंत…
जोपर्यंत इस्रायली शासन या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत आमची कारवाई आम्ही संपवत आहोत. जर प्रत्युत्तर दिले गेले तर त्या परिस्थितीत, आमची प्रतिक्रिया अधिक तीव्र आणि अधिक शक्तिशाली असेल,” असे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी बुधवारी सकाळी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले.
इराण समर्थित सशस्त्र हिजबुल्लाह गटाचा बालेकिल्ला असलेल्या बैरुतच्या दक्षिणेकडील उपनगरांवर इस्रायलने बुधवारी पहाटे पुन्हा बॉम्बफेक सुरू केली. तसेच हा गट आपले लक्ष्य असल्याचे सांगून किमान डझनभर हवाई हल्ले केले.
हल्ला झालेल्या उपनगरांमधील काही भागातून धुराचे मोठे लोट उठताना दिसले. इस्रायलने या भागातून लोकांना बाहेर जाण्याचे नवीन आदेश जारी केले. या भागांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून झालेल्या जोरदार हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणात ते आधीच रिकामे झाले आहेत.
इराणचा इस्रायलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला
मंगळवारी रात्री इराणने केलेला हा हल्ला इस्रायलविरुद्धचा आतापर्यंतचा सर्वात मोठा लष्करी हल्ला ठरला.
संपूर्ण इस्रायलमध्ये सायरन वाजले आणि स्फोटांनी जेरुसलेम आणि जॉर्डन नदीच्या भागात खळबळ माजली. इस्रायलच्या सगळ्या रहिवाशांना बॉम्ब शेल्टरमध्ये जाण्यास सांगण्यात आले.
इस्रायलमध्ये कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नसले तरी वेस्ट बँकमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
इराणने या मोहिमेचे वर्णन बचावात्मक हल्ला असे केले आणि केवळ इस्रायली लष्करी सुविधांना लक्ष्य केल्याचे सांगितले. इस्रायलच्या तीन लष्करी तळांना यावेळी लक्ष्य करण्यात आल्याचे इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
इस्रायली हल्लांना प्रत्युत्तर
इस्रायलने दहशतवादी नेत्यांची केलेली हत्या तसेच लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह आणि गाझावर केलेल्या आक्रमणाला हे प्रत्युत्तर असल्याचे इराणने म्हटले आहे.
इस्रायलने इराणच्या बॉम्बफेकीविरुद्ध हवाई संरक्षण कवच सक्रिय केले आणि बहुतेक क्षेपणास्त्रे “इस्रायल आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील बचावात्मक युतीद्वारे” अडवल्याचे इस्रायलचे रिअर ॲडमिरल डॅनियल हागारी यांनी एक्सवरील एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे. ते पुढे म्हणालेः “इराणचा हा हल्ला एक गंभीर आणि धोकादायक प्रकार आहे.”
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाईल असे म्हटले आहे.
“इराणने आज रात्री मोठी चूक केली-आणि त्याची किंमत त्याला मोजावी लागेल”, असे नेतान्याहू यांनी मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या आपत्कालीन राजकीय सुरक्षा मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या सुरुवातीला सांगितल्याचे एका निवेदनात म्हटले आहे.
‘प्रचंड विनाश’
इराणच्या सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफने राज्य माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इस्रायलच्या कोणत्याही हालचालीला प्रतिसाद म्हणून इस्रायली पायाभूत सुविधांचा “मोठा विनाश” केला जाईल. या सुविधांमध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही इस्रायली मित्रांच्या प्रादेशिक मालमत्तेलाही लक्ष्य केले जाईल असेही ते म्हणाले.
इराण आणि अमेरिका या प्रादेशिक युद्धात ओढले जाण्याची भीती गेल्या दोन आठवड्यांपासून इस्रायलच्या लेबनॉनवरील सततच्या हल्ल्यांमुळे वाढली आहे, ज्यात सोमवारी तेथे ग्राउंड ऑपरेशन सुरू करणे आणि गाझा पट्टीतील वर्षभराचा संघर्ष यांचाही समावेश आहे.
इराणच्या सैन्याने मंगळवारी प्रथमच हायपरसॉनिक फताह क्षेपणास्त्रांचा वापर केला आणि त्यांच्या 90 टक्के क्षेपणास्त्रांनी इस्रायलमधील त्यांच्या लक्ष्यांवर यशस्वीरित्या मारा केल्याचा दावा रिव्होल्युशनरी गार्ड्सनी केला.
इस्रायलच्या हागारींनी सांगितले की मध्य आणि दक्षिण इस्रायल भागात मर्यादित हल्ले झाले. लष्कराने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये गडेरा शहरातील मध्यवर्ती भागातील शाळेला इराणच्या क्षेपणास्त्राने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे बघायला मिळाले.
अमेरिकेचा सहभाग?
अमेरिकन नौदलाच्या युद्धनौकांनी इस्रायलच्या दिशेने जाणाऱ्या इराणी क्षेपणास्त्रांवर सुमारे डझनभर इंटरसेप्टर्स डागल्याचे पेंटागॉनने म्हटले आहे. ब्रिटनने सांगितले की, त्यांच्या सैन्याने “मध्य पूर्वेतील युद्ध आणखी वाढू नये यासाठीच्या प्रतिबंधात्मक प्रयत्नांमध्ये” महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलला अमेरिकेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगत इराणचा हल्ला “अप्रभावी” होता असे म्हटले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या डेमोक्रॅटिक उमेदवार उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी बायडेन यांच्या भूमिकेचे समर्थन केले आणि म्हटले की इराणविरूद्ध आपल्या हिताचे रक्षण करण्यास अमेरिका मागेपुढे पाहणार नाही.
“आम्ही याला प्रत्युत्तर देऊ. त्यांच्या कृतीचे परिणाम इराणला लवकरच जाणवतील. प्रतिसाद वेदनादायक असेल,” असे इस्रायलचे संयुक्त राष्ट्र राजदूत डॅनी डॅनन यांनी पत्रकारांना सांगितले.
अमेरिकेकडून कोणताही अंकुश नाही
व्हाईट हाऊसनेही इराणला याचे “गंभीर परिणाम” भोगावे लागतील असे म्हटले आहे. प्रवक्ते जेक सुलिव्हन यांनी वॉशिंग्टन येथे सांगितले की “ते करण्यासाठी अमेरिका इस्रायलबरोबर काम करेल.”
त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे सुलिव्हन यांनी स्पष्ट केले नसले तरी इराणने इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला तेव्हा अमेरिकेने इस्रायलने संयम राखण्याचे एप्रिलमध्ये केलेले आवाहन यावेळी केलेले नाही. पेंटागॉनने म्हटले आहे की इराणने मंगळवारी केलेले हवाई हल्ले एप्रिलच्या हल्ल्यापेक्षा दुप्पट होते.
यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी “प्रत्युत्तराला प्रत्युत्तर” या वक्तव्याचा निषेध केला: “हे थांबले पाहिजे. आम्हाला युद्धबंदीची नितांत गरज आहे,” असे ते म्हणाले.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की ते इराणच्या इस्रायलवरील नवीन हल्ल्यांचा तीव्र निषेध करतात. इस्रायलच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध असल्यामुळे बुधवारी मध्य पूर्वेतील आपली लष्करी संसाधने एकत्रित केल्याचेही त्यांनी सांगितले.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)