Tuesday, March 24, 2026
Solar
Home Bharat Shakti Marathi होर्मुझ सामुद्रधुनीत सुरुंग पेरण्याच्या इराणच्या धमकीचे दूरगामी परिणाम

होर्मुझ सामुद्रधुनीत सुरुंग पेरण्याच्या इराणच्या धमकीचे दूरगामी परिणाम

0
होर्मुझ

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणने नवा इशारा दिला आहे की, जर जमिनीवरून त्यांच्यावर आक्रमण झाले, तर ते “संपूर्ण पर्शियन आखातात” सुरुंग पेरू शकतात, याशिवाय प्रादेशिक वीज प्रकल्पांवर देखील हल्ला करू शकतात. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यानंतर, इराणने जर खरोखरच अशी कृती केली तर जागतिक जहाज वाहतूक आणि ऊर्जा पुरवठ्यात दीर्घकाळ व्यत्यय निर्माण होऊ शकतो.

तीव्र शब्दांमध्ये जारी केलेल्या निवेदनात, तेहरानने सोमवारी म्हटले: “इराणच्या किनारपट्टीवर किंवा बेटांवर हल्ला करण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास, आखातातील सर्व प्रवेश मार्गांवर विविध प्रकारचे सागरी सुरुंग पेरले जातील.” इराणने पुढे म्हटले की, अशा परिस्थितीमुळे हा प्रदेश “दीर्घ काळासाठी” होर्मुझच्या सामुद्रधुनीसारखा बनेल.

मर्यादित क्षमता

नौदल तज्ज्ञांच्या मते, आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इराणला आपल्या धमकीची पूर्णपणे अंमलबजावणी करण्याची गरज भासणार नाही. व्हाईस ॲडमिरल ए. के. चावला (निवृत्त) यांनी स्ट्रॅटन्यूजग्लोबलला सांगितले, “इराणसाठी संपूर्ण पर्शियन आखातात सुरुंग पेरणे शक्य नाही. मात्र, ते होर्मुझच्या सामुद्रधुनीत प्रभावीपणे सुरुंग पेरू शकतात आणि पर्शियन आखातात ‘उपद्रवी सुरुंगक्षेत्र’ तयार करू शकतात.”

ते पुढे म्हणाले की, या मर्यादित निर्णयाचेही दूरगामी परिणाम होऊ शकतात: “जर इराणने या प्रदेशात सुरुंग पेरल्याचे जाहीर केले, तर त्यामुळे व्यापारी आणि लष्करी अशा सर्व प्रकारच्या जहाजांना धोका निर्माण होईल. याशिवाय व्यापारी जहाजे आणि युद्धनौकांसाठी तो परिसर सुरक्षित होण्यापूर्वी, सुरुंगांपासून सुटका व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.”

ज्या सामुद्रधुनीतून जागतिक तेलसाठ्यांपैकी जवळपास पाचव्या भागाची वाहतूक होते, ती सामुद्रधुनी सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे आधीच जल प्रवासासाठी अवघड झाली आहे, तिथल्या जहाजांना ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या धोक्यांचा सामना करावा लागत आहे.

सुरूंग स्वस्त तरीही प्रभावी

लष्करी विश्लेषकांचा यावर जोर आहे की सागरी युद्धात सुरुंग हे सर्वात जास्त व्यत्यय आणणाऱ्या साधनांपैकी एक आहेत. एका माजी ब्रिटिश नौदल सुरुंग शोधक कॅप्टनने या आव्हानाचे वर्णन केले: “हे सुरुंग नुकसान करण्यापूर्वी त्यांचा शोध घेऊन, ‘शिकार’ केल्याप्रमाणे नष्ट करावे लागतील… होर्मुझसारख्या लांब जलमार्गात यासाठी हाताशी वेळ आणि प्रचंड प्रयत्न लागतात.”

संरक्षण नसलेली जहाजे या सुरूंगांवरून गेली तर ते सक्रिय होतात आणि वरून जाणाऱ्या जहाजांनी जर त्यांची मोजणी केलीच तर पहिले 10 किंवा 20 सुरुंग फुटतच नाहीत आणि मग पुढचाच एखादा सुरूंग जहाजाखाली स्फोट घडवतो.

अशा डावपेचांमुळे अगदी कमी संख्येतील सुरुंगसुद्धा मोठ्या प्रमाणावरील सागरी वाहतूक थांबवू शकतात, ज्यामुळे नौदलांना दीर्घ आणि जोखमीच्या सुरुंग निर्मूलन मोहिमा पार पाडण्यास भाग पडते.

जर हे सुरुंग पेरले गेले, तर त्याचे परिणाम दूरगामी असू शकतात, कारण ऊर्जा बाजारपेठा आधीच तणावाखाली आहेत. अमेरिका जमिनीवरील संभाव्य कारवाईबद्दल बोलत आहे आणि इराणने, आपल्या बाजूने, महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांना लक्ष्य करून प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे, ज्यामध्ये आखाती प्रदेशातील क्षारविरहितीकरण प्रकल्प आणि वीज प्रकल्पांचा समावेश असू शकतो.

भारताची सज्जता

भारतासाठी हे एक सामरिक आव्हान आहे. ‘ऑपरेशन संकल्प’चा भाग म्हणून या प्रदेशात भारताची नौदल जहाजे तैनात असून, सामुद्रधुनीमध्ये अडकलेल्या भारताकडे येणाऱ्या मालवाहू जहाजांवर सतत पाळत ठेवत असली तरी, क्षमतेत उणीव कायम आहे.

व्हाइस ॲडमिरल चावला यांनी ही मर्यादा मान्य केली: “जोपर्यंत भारताचा संबंध आहे, दुर्दैवाने भारतीय नौदलाकडे सुरुंग साफ करण्याची कोणतीही क्षमता नाही… आणि म्हणूनच आम्ही कोणत्याही सुरुंग साफ करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देऊ शकणार नाही.” त्यांनी पुढे सांगितले की, अशा कोणत्याही मोहिमेसाठी “कामाच्या विशालतेमुळे बहुराष्ट्रीय प्रयत्नांची आवश्यकता असेल.”

होर्मुझची सामुद्रधुनी ही एक आंतरराष्ट्रीय सामुद्रधुनी म्हणून गणली जाते; त्यामुळे, सामान्यतः जहाजे आणि विमानांच्या मुक्त वाहतुकीला परवानगी असते.

मात्र, इराण आणि अमेरिकेसह प्रमुख पक्षांनी UNCLOS वर (संयुक्त राष्ट्र सागरी कायदा करार) स्वाक्षरी केलेली नाही, या वस्तुस्थितीमुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. इराणचा असा दावा आहे की केवळ अधिक कठोर असा “निर्दोष मार्ग” कायदा लागू होतो, ज्यामुळे त्याला हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचे अधिक अधिकार मिळतात.

कायदेतज्ज्ञांच्या मते, संघर्षाच्या काळातही, मोठ्या प्रमाणावर सुरुंग पेरून तटस्थ जहाजांसाठी आंतरराष्ट्रीय सामुद्रधुनी पूर्णपणे रोखणे, अत्यंत गंभीर परिस्थिती वगळता समर्थनीय ठरणार नाही.

होर्मुझची सामुद्रधुनी सुमारे 20 सागरी मैल रुंद आहे आणि तिच्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. जर मर्यादित प्रमाणातही सुरुंग पेरले गेले, तर त्यामुळे जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक बंद होऊ शकतो.

हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleIndian Army to Embed Drone Units With Tank Regiments, Rolls Out ‘Shaurya Squadrons’
Next articleकोलंबियात लष्करी विमान अपघातात 66 ठार; चार जण अद्यापही बेपत्ता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here