कैरोः इस्रायलने गाझामधील रफाह येथे रविवारी केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 30 पॅलेस्टिनी ठार तर 100हून अधिक जखमी झाले. हे हल्ले तेल अल-सुलतान शेजारील निर्वासितांच्या रहिवासी भागात करण्यात आले.
पॅलेस्टिनी आरोग्य आणि नागरी आपत्कालीन अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या हल्ल्यांमध्ये डझनभर लोक मारले गेले असून तितकेच गंभीर जखमी झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वेकडील रफाह भागातून पळून गेल्यानंतर हजारो निर्वासितांनी तेल अल-सुलतानमध्ये आश्रय घेतला आहे. इस्रायली सैन्याने दोन आठवड्यांपासून या भागात आक्रमण सुरू केले.
पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले की 100 हून अधिक लोक मारले गेले आणि तितकेच जखमी झाले. हमासच्या माध्यम कार्यालयाचे संचालक इस्माईल अल-थावाब्ता यांनी 30 मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे.
रफाहमधील रेड क्रॉसच्या फिरत्या रुग्णालयात जीवितहानी झाल्यानंतर मोठी गर्दी झाली होती. इतर रुग्णालयांमध्येही मोठ्या संख्येने जखमी रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.
इस्रायलने या हल्ल्याबाबत तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांच्या अंतिम संख्येबाबत अजूनही अस्पष्टता असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
हमासचे वरिष्ठ अधिकारी सामी अबू जुहरी यांनी या हल्ल्याचे वर्णन ‘हत्याकांड’ असे केले. इस्रायलला शस्त्रे आणि निधी पुरवणारी अमेरिका यासाठी जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कुवेतच्या रुग्णालयात पळून गेलेल्या एका रहिवाशाने सांगितले, “हवाई हल्ल्यांमुळे काही तंबू जळले, तर इतर काही तंबू आणि नागरिकांचे मृतदेह वितळले.”
त्याआधी रविवारी इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी रफाह भागातून 8 क्षेपणास्त्रे डागली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यायालयाने शुक्रवारी रफाहवरील हल्ले थांबवण्याचे आदेश दिल्यानंतरही इस्रायलने ही कारवाई सुरूच ठेवली.
इस्रायलने सांगितले की त्यांनी हमासची काही क्षेपणास्त्रे अडवली. गाझामधून आलेल्या क्षेपणास्रांमुळे इस्रायलमध्ये कोणत्याही जीवितहानीची नोंद झालेली नाही.
हमासच्या अल-कसम ब्रिगेड्सने दावा केला आहे की ही क्षेपणास्त्रे “इस्रायलच्या झायोनिस्ट हत्याकांडांना” प्रत्युत्तर म्हणून डागण्यात आली. स्थानिक वैद्यकीय सेवांनुसार, आधीच्या रविवारी, इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये रफाह येथे किमान 5 पॅलेस्टिनी मारले गेले. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने ते सर्व नागरिक असल्याचे सांगितले.
रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)