गाझापट्टीतून इस्त्राईलच्या संपूर्ण सैन्य माघारीची अट
दि. १३ जून: गाझापट्टीतील इस्त्राईल आणि हमासदरम्यानच्या संघर्षातून मार्ग काढण्यासाठी अमेरिकेने दिलेल्या युद्धबंदीच्या प्रस्तावाला आहे त्या परिस्थितीत मान्यता देण्यास हमासने नकार दिला असून, या प्रस्तावात हमासकडून दुरुस्ती सुचविण्यात आली आहे. युद्धबंदी घडवून आणण्यासाठी इस्त्राईलने आपल्या फौजा गाझातून माघारी घ्याव्यात, अशी अट हमासकडून ठेवण्यात आली आहे.
अमेरिकेकडून देण्यात आलेल्या युद्धबंदीच्या प्रस्तावात हमासकडून काही बदल सुचविण्यात आले आहेत. आमच्याकडून सुचविण्यात आलेले बदल हे फार महत्त्वाचे नाहीत, किरकोळच आहेत. मात्र, हा प्रस्ताव पुढे घेऊन जाण्यासाठी गाझापट्टीतून इस्त्राईलच्या फौजांनी संपूर्ण माघार घेणे गरजेचे आहे, असे हमासच्या वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे. इस्त्राईल आणि हमास या दहशतवादी संघटनेदरम्यान गाझापट्टीत सुरु असलेला रक्तरंजित संघर्ष थांबविण्यासाठी संयुक्त राष्ट्राने (युनायटेड नेशन्स) केलेल्या युद्धबंदीच्या ठरावाला हमासने मंगळवारी होकार दिला होता. मात्र, इस्त्राईलकडून ही युद्धबंदी पाळली जाईल, याची जबाबदारी अमेरिकेने घ्यावी, असे आवाहन हमासचा प्रवक्ता अबू झुहरी याने केले होते. इस्त्राईल आणि हमासच्या संघर्षात पोळून निघालेल्या गाझापट्टीत युद्धबंदी घडवून आणण्यासाठी अमेरिकेने जोराचे प्रयत्न सरू केले होते. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकेन यांनी यासाठी सोमवारी इजिप्तला भेट दिली होती. गाझामधील संघर्ष शेजारील लेबनॉनमध्ये पोहोचू नये, यासाठीही अमेरिकेचे प्रयत्न सुरु आहेत.
अमेरिकेकडून देण्यात आलेल्या युद्धबंदीच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी हमास आणि अमेरिकी अधिकाऱ्यांत झालेल्या बैठकीत या प्रस्तावात हमासकडून मोठ्या प्रमाणात बदल सुचविण्यात आले आहेत. त्यातील काही बदल प्रत्यक्षात येण्यायोग्य नाहीत. तरीही, हमासकडून हा प्रस्ताव स्वीकारण्यात यावा, यासाठी मध्यस्थांकडून प्रयत्न सुरु आहेत, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकेन यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर आम्ही सुचविलेले बदल फार मोठे नाहीत, अशी प्रतिक्रिया हमासकडून देण्यात आली आहे. इस्त्राईलच्या तुरुंगात दीर्घकालीन शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या १०० पॅलेस्टिनी बंधकांची तत्काळ सुटका करण्यात यावी, ही नावे आम्ही ठरवू, असे हमासने म्हटले आहे. त्याचबरोबर इस्त्राईलकडून करण्यात आलेली गाझाची नाकाबंदी तातडीने उठविण्यात यावी आणि नागरिक आणि इतर बाबीची मुक्त हालचाल सुरु करावी, त्याचबरोबर युद्धबंदीच्या तिन्ही टप्प्यांची एकत्रित अंमलबजावणी करावी, अशा मागण्या हमासकडून सुचविण्यात आल्या आहेत.
हमासच्या दहशतवाद्यांनी गेल्या वर्षी सात ऑक्टोबर रोजी इस्त्राईलवर हल्ला करून १२०० ज्यू नागरिकांची कत्तल आणि २५० अपहरण केल्यानंतर इस्त्राईलने हमासविरोधात गाझापट्टीत आघाडी उघडली होती. या संघर्षात आत्तापर्यंत ३७ हजार पॅलेस्टिनी नागरिकांचा बळी गेला असून, काही लाख नागरिक जखमी आणि विस्थापित झाले आहेत.
विनय चाटी
(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’सह)