गाझापट्टीत युद्धबंदीसाठी अमेरिकेकडून निकराचे प्रयत्न

0
Israel-HAMAS-Gaza Conflict:

परराष्ट्रमंत्री ब्लिंकेन इजिप्तच्या दौऱ्यावर

दि. १० जून: इस्त्राईल आणि हमासच्या संघर्षात पोळून निघालेल्या गाझापट्टीत युद्धबंदी घडवून आणण्यासाठी अमेरिकेने जोराचे प्रयत्न सरू केले असून, त्याचाच एक भाग म्हणून अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकेन हे आज, सोमवारी इजिप्तला पोहोचत आहेत. गाझामधील संघर्ष शेजारील लेबनॉनमध्ये पोहोचू नये, यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरु आहेत.

हमासच्या दहशतवाद्यांनी गेल्या वर्षी सात ऑक्टोबर रोजी इस्त्राईलवर हल्ला करून १२०० ज्यू नागरिकांची कत्तल आणि २५० अपहरण केल्यानंतर इस्त्राईलने हमासविरोधात गाझापट्टीत आघाडी उघडली होती. या संघर्षात आत्तापर्यंत ३७ हजार पॅलेस्टिनी नागरिकांचा बळी गेला असून, लाखो नागरिक जखमी आणि विस्थापित झाले आहे. अशा परिस्थितीतही या संघर्षाची धग  दिवसेंदिवस वाढतच आहे. लेबनॉनमधील हिजबुल्ला दहशतवाद्यांनी इस्त्राईलला धमकाविणे सुरु केल्यामुळे त्याचा फटका आता शेजारील लेबनॉनमध्येही बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ब्लिंकेन यांचा इजिप्त दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. हमास-इस्त्राईल संघर्ष सुरु झाल्यापासून ब्लिंकेन यांचा हा या भागातील आठवा दौरा आहे. इजिप्तमधून ते या आठवड्यात इस्त्राईल, जॉर्डन आणि कतारच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या संघर्षातून मार्ग काढण्यासाठी इस्त्राईलने दिलेला तीन टप्प्यातील युद्धबंदी प्रस्ताव ३१ मे रोजी मांडला होता. त्यानुसार या भागातील संघर्षातून कायमचा मार्ग काढणे, इस्त्राईली ओलिसांची तातडीने सुटका करणे व पॅलेस्टिनी कैद्यांना मुक्त करणे आणि गाझाची पुनर्बांधणी करणे, याचा त्यात समावेश होता. इस्त्राईलने शनिवारी गाझामध्ये कारवाई करून ऑक्टोबरपासून हमासच्या ताब्यात असलेल्या चार इस्त्राईली ओलिसांची सुटका केली होती. या कारवाईत २७४ पॅलेस्टिनी नागरिकांचा बळी गेल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यातच नेत्यानाहू यांच्या युद्धकालीन मंत्रिमंडळातील बेनी गान्त्झ या मंत्राने रविवारी राजीनामा दिला. अति-उजव्यांचा भरणा असलेल्या नेत्यानाहू मंत्रिमंडळात गान्त्झ हे एकमेव मध्यममार्गी मंत्री मानले जात होते. या पार्श्वभूमीवर ब्लिंकेन यांचा हा दौरा होत आहे.

हमास आणि इस्त्राईलच्या संघर्षात आता लेबनॉनमधील हिजबुल्ला दहशतवाद्यांनी उडी घेतली आहे. इस्त्राईलच्या संरक्षण दलांबरोबर त्यांच्या चकमकी उडत आहेत. त्यात सीमेच्या दोन्ही बाजूंनी बळींची संख्याही वाढत आहे. त्यामुळे उभय देशांत संघर्षाचा भडका उडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता अमेरिकेकडून युद्धबंदीसाठी निकराचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. या दौऱ्यात युद्धबंदीवर सर्व संघर्षरत बाजूंत समझोता घडवून आणण्यासाठी ब्लिंकेन बोलणी करणार आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी म्हटले आहे. हमासने हा प्रस्ताव स्वीकारावा, यासाठी ते प्रयत्न करतील. युद्धबंदीचा प्रस्ताव इस्त्राईलकडून आल्यामुळे त्यांना हा स्वीकारण्यात काही अडचण असेल, असे वाटत नाही, असेही मिलर म्हणाले. तर, इस्त्राईलच्या सरकारमधील सर्व पक्षांना मान्य असेल, असा युद्धबंदी प्रस्ताव इस्त्राईलने द्यावा, असे मत कतारने व्यक्त केले आहे. इस्त्राईल सरकारमधील काही पक्षांनी या प्रस्तावाचा विरोध केला होता. तर, युद्धबंदी प्रस्ताव आम्ही एक सकारात्मक पाऊल म्हणून पाहत आहोत, असे हमासने म्हटले आहे. बायडेन यांनी केलेल्या आवाहनानंतर आणि सीआयएचे संचालक विल्यम बर्न्स यांनी बुधवारी कतारची राजधानी दोहामध्ये कतार आणि इजिप्तच्या मध्यास्थांशी चर्चा केल्यानंतर युद्धबंदीबाबतच्या चर्चेने वेग घेतला आहे.

विनय चाटी

(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’सह)


Spread the love
Previous articleयुरोपियन महासंघातील पराभवामुळे बेल्जियमच्या पंतप्रधानांचा राजीनामा
Next articleItalian Voters Propel PM Meloni Ahead In EU Vote

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here