गाझामधील हमासविरुद्धचे युद्ध या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. इस्रायलच्या एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले की, पॅलेस्टिनी गटाचा नाश करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इतका कालावधी लागू शकतो.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार त्झाची हानेगबी म्हणाले, “आम्हाला पूर्णपणे यश मिळवण्यासाठी, हमासची शक्ती आणि लष्करी क्षमतांचा नाश करण्यासाठी म्हणून आम्ही जे ठरवले आहे ते साध्य करण्यासाठी आम्हाला कदाचित आणखी सात महिने लढाई करावी लागेल.”
“आमच्यासाठी विजय म्हणजे हमासच्या सर्व प्रकारच्या क्षमता नष्ट करणे, आमच्या ओलिस असलेल्या सर्व बांधवांना परत आणणे आणि युद्धाच्या शेवटी गाझामध्ये आणखी कोणताही धोका नाही याची खात्री करणे,” असे ते म्हणाले.
“दुसऱ्या शब्दांत सांगायचे म्हणजे आमच्या सीमेवर इराणी पुरस्कृत दहशतवादी सैन्य नाही याची खात्री करणे,” असे हानेग्बी यांनी सायप्रसमधून कान या पब्लिक ब्रॉडकास्टरशी बोलताना सांगितले.
गाझा युद्धानंतरचे भविष्य याबाबत चर्चा सुरू असल्याचे इस्रायली अधिकाऱ्याने सांगितले.
ते म्हणाले, “युद्धानंतर काय होईल याचे नियोजन करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत, जेणेकरून पॅलेस्टिनी लोक त्यांच्या स्वतःच्या आयुष्यासाठी जबाबदार असतील.”
“इस्रायलच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्यावर असेल, पण आम्हाला गाझावर राज्य करायचे नाही.”
सर्वात प्राणघातक म्हणून मानल्या गेलेल्या गाझा युद्धाच्या जवळपास आठ महिन्यांनंतर, इस्रायलला लढाई समाप्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय फोन कॉल्स तसेच नेदरलँडमधील दोन आंतरराष्ट्रीय न्यायालयांसमोरील खटल्यांचा सामना करावा लागत आहे.
आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयातील मुख्य अभियोक्ता यांधी अलीकडेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासह इस्रायली आणि हमास नेत्यांच्या अटकेसाठी वॉरंट मागितले. अभियोक्ता करीम खान यांनी सांगितले की, गाझा पट्टी आणि इस्रायलमधील युद्धासाठी नेतान्याहू, त्यांचे संरक्षण मंत्री योव गॅलंट आणि हमासचे तीन नेते-याह्या सिनवर, मोहम्मद डेफ आणि इस्माईल हनियेह जबाबदार आहेत.
7 ऑक्टोबर रोजी हमास कडून करण्यात आलेल्या अभूतपूर्व हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हमासला “नष्ट” करण्याच्या प्रतिज्ञेवर इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू ठाम राहिले आहेत. इस्रायलकडून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीवर आधारित एएफपीच्या आकडेवारीनुसार, यात जवळपास 1हजार 189 लोक ठार झाले, ज्यात बहुसंख्य नागरिक होते.
हमासने देखील 252 लोकांना ओलिस ठेवले, त्यापैकी 121जण गाझामध्ये आहेत. मात्र त्यातील 37जण ठार झाल्याचे लष्कराचे म्हणणे आहे. देशाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायलने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात गाझामध्ये किमान 36 हजार 171 लोक ठार झाले आहेत, ज्यात बहुतांश नागरिक आहेत.
आराधना जोशी
(वृत्तसंस्थांच्या इनपुट्सवरून)