पुष्पकच्या सुरक्षित लँडिंगमध्ये इस्रोची हॅटट्रिक

0
इस्रो
इस्रोच्या एक्स अकाउंटवरून साभार

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज एका प्रयोगादरम्यान मानवरहित, स्वतंत्र पंखांच्या पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहनाच्या सुरक्षित लँडिंगची हॅटट्रिक साध्य केली. कोणत्याही अंतराळ संस्थेसाठी शतकातील एक अत्यंत दुर्मिळ आणि अभिमानास्पद अशी ही कामगिरी आहे.

पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहनाच्या (आरएलव्ही) लँडिंग प्रयोगात (एलईएक्स) आज अभिमानास्पद असे सलग तिसरे यश मिळवले आहे, असे इस्रोने एका निवेदनात म्हटले आहे. LEX (03) मालिकेतील तिसरी आणि अंतिम चाचणी आज कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंज (ATR) येथे सकाळी 07 वाजून 10 मिनीटांनी घेण्यात आली.

यापूर्वी, इस्रोने पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहनाच्या दोन यशस्वी चाचण्या केल्या आहेत. आजच्या या तिसऱ्या चाचणीत, ‘पुष्पक’ हे प्रक्षेपण वाहन अधिक उंचावरून सोडण्यात आले. यावेळी जोरदार वारेही वाहत होते. या विपरीत परिस्थितीतही  संपूर्ण अचूकतेसह ‘पुष्पक’ने धावपट्टीवर सुरक्षित लँडिंग केले.

चाचणीदरम्यान, भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) चिनूक हेलिकॉप्टरद्वारे पुष्पक हे प्रक्षेपण वाहन 4.5 किमी उंचीवरून सोडण्यात आले. त्यानंतर पुष्पक या प्रक्षेपण वाहनाचे धावपट्टीवर स्वतंत्र पद्धतीने यशस्वी लँडिंग झाले. लँडिंगच्या वेळी वाहनाचा वेग सुमारे 320 किमी प्रतितास होता. खरंतर लँडिंगच्या वेळी व्यावसायिक विमानाचा वेग ताशी 260 किलोमीटर तर लढाऊ विमानाचा वेग ताशी सुमारे 280 किलोमीटर असतो. लँडिंगच्या वेळी, ब्रेक पॅराशूटच्या मदतीने प्रक्षेपण वाहनाचा वेग प्रथम ताशी 100 किमीपर्यंत कमी करण्यात आला आणि नंतर लँडिंग गियर ब्रेकच्या मदतीने विमान धावपट्टीवर थांबवण्यात आले.

चाचणीदरम्यान वाहनाच्या रडर आणि नोज व्हील स्टीयरिंग सिस्टिमच्या कामगिरीचीदेखील चाचणी घेण्यात आली. भविष्यातील अशा वाहनाच्या प्रक्षेपणासाठी आणि अंतराळात सुरक्षितपणे पुन्हा प्रवेश करण्यासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण आहे. या तंत्रज्ञानामुळे इस्रोची खर्चात लक्षणीयरीत्या घट होईल कारण कोणत्याही अंतराळ मोहिमेत प्रक्षेपण वाहनाची किंमत खूप जास्त असते आणि एकदा वापरल्यानंतर वाहनाचा पुन्हा वापर केला जात नाही. मात्र आता पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या मदतीने अंतराळात वाढणाऱ्या कचऱ्याची समस्याही सोडवली जाईल.

पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहनाच्या लँडिंग चाचणीदरम्यान, वाहनात मल्टी-सेंसर फ्यूजन वापरले, ज्यात इनर्शियल सेंसर, रडार अल्टीमीटर, फ्लश एयर डेटा सिस्टम, स्यूडोलाइट सिस्टम आणि एनएवीआईसी यासारख्या सेंसर्सचा समावेश होता. इस्रोचे म्हणणे आहे की या चाचणीमध्ये मागील चाचण्यांमध्ये वापरल्या गेलेल्या वाहनाच्या मुख्य भागाचा आणि उड्डाण प्रणालींचा पुन्हा वापर करण्यात आला ज्यात इस्रोची रचना क्षमता दिसून येते.

विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या (व्हीएसएससी) नेतृत्वाखालील या मोहिमेत, इस्रोचे स्पेस ऍप्लिकेशन्स सेंटर (एसएसी), इसरो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (आयएसटीआरएसी) आणि सतीश धवन स्पेस सेंटर (एसडीएससी) श्रीहरिकोटा यांचा देखील समावेश होता. हवाई दलाच्या तांत्रिक विभागाबरोबरच आयआयटी कानपूर, नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरी, इंडियन एरोस्पेस इंडस्ट्रियल पार्टनर्स, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाचेही महत्त्वपूर्ण योगदान होते.

आराधना जोशी
(इस्रो एक्स पोस्टच्या इनपुट्सह)


Spread the love
Previous articleIndia and Qatar Discuss Sale Of A Dozen Mirage 2000s For IAF
Next articleISRO Validates Key Landing Criteria For India’s Own Space Shuttle

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here