युक्रेनमधील युद्धाच्या विरोधात आवाज उठवल्याबद्दल रशियन पत्रकार मारिया पोनोमारेन्कोला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आता तिचे प्रकाशन आणि समर्थक यांच्या म्हणण्यानुसार, तिने उपोषणाला सुरूवात केली आहे.
2022 मध्ये युक्रेनवर झालेल्या आक्रमणानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या आत या 46 वर्षीय रशियन पत्रकाराला ताब्यात घेण्यात आले होते. युक्रेनच्या मारीपोल शहरातील एका नाट्यगृहावर रशियन हवाई दलाने बॉम्बहल्ला केल्याचा आरोप तिने आपल्या बातमीतून केला होता.
गेल्या फेब्रुवारीमध्ये तिला पश्चिम सायबेरियातील तिच्या मूळ गावी असलेल्या बर्नौल येथील न्यायालयाने रशियन सैन्याबद्दल खोटी माहिती पसरवल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवले.
मानवाधिकार निरीक्षक ओ.व्ही.डी.-इन्फोच्या म्हणण्यानुसार, युद्धाच्या विरोधात बोलल्याबद्दल संपूर्ण रशियामध्ये आतापर्यंत 20 हजारांहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या बहुतेकांना दंड ठोठावला जातो आणि लवकरच त्यांची सुटका केली जाते. मात्र स्वतंत्रपणे काम करणाऱ्या पत्रकारांना अनेकदा न्यायालयांकडून कठोर वागणूक दिली जाते.
पोनोमारेन्कोसह, फक्त रशियन भाषेत प्रकाशित होणारे आणि परदेशात कमी प्रेक्षक असलेले ऑनलाइन आउटलेट रुसन्यूजचे एकूण चार पत्रकार तुरुंगात आहेत. बहुसंख्य स्वतंत्र माध्यमे आता दुसऱ्या देशांमधून काम करतात.
रशन्यूजच्या म्हणण्यानुसार, पोनोमारेन्कोला आता ज्या तुरुंगात आहे त्या तुरुंगातील रक्षकांवर तिने हल्ला केल्याचे सांगत तिच्यावर नवे गुन्हेगारी आरोप दाखल करण्यात आले आहे.
मॉस्को शहराच्या माजी नगरसेविका युलिया गाल्यामिना यांच्या मते, तुरुंग अधिकाऱ्यांनी तिच्या विरोधात करण्यात आलेले तपासणी अहवाल खोटे ठरवल्यामुळे पोनोमारेन्कोला इतर कैद्यांपेक्षा दूर एका वेगळ्या कक्षात ठेवण्यात आले होते. त्यामुळे तिने सोमवारी न्यायालयाच्या सुनावणीत उपोषण करायला सुरुवात केली.
“माशा खूप वाईट स्थितीत आहे”, गॅल्यामिना यांनी रॉयटर्सशी बर्नौल येथून फोनवर बोलताना सांगितले. त्यांनी पोनोमारेन्कोच्या पहिल्या नावाचा उल्लेख केल्यामुळे त्या दोघींमध्ये किती घनिष्ठ नाते आहे ते दिसून आले. गॅल्यामिना न्यायालयीन सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी बर्नौल येथे गेल्या होत्या.
“असहाय्यतेच्या भावनेमुळे ती (न्यायालयात) खूप रडली. तिला आत्महत्यादेखील करावीशी वाटत आहे.” गॅल्यामिना म्हणाल्या.
रशन्यूजने सांगितले की पोनोमारेन्को यांनी उपोषण जाहीर केले होते परंतु रॉयटर्सला याबाबत अधिक काही भाष्य करण्यास नकार दिला.
खटल्यापूर्वीच्या स्थानबद्धतेच्या केंद्रातील अटींच्या निषेधार्थ आपण मनगट कापून घेऊ असे गेल्या महिन्यात सुनावणीदरम्यान पोनोमारेन्कोने सांगितल्याचे रशन्यूजच्या वृत्तात म्हटले आहे.
रशियाच्या तुरुंग सेवेने या संपूर्ण प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
गेल्या वर्षी कोमर्संट वृत्तपत्राने म्हटले होते की, तुरुंगात असताना पोनोमारेन्कोला ‘हिस्टेरिकल पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ झाल्याचे निदान झाले होते आणि तिने तिचे मनगट कापून घेतले होते. तिच्या वकिलाचा हवाला देत कोमर्संटने बातमीत पुढे म्हटले आहे की तिला क्लॉस्ट्रोफोबियाचा त्रास होता आणि तिने तुरुंगातील एकही खिडकी फोडली होती.
पोनोमरेन्कोसोबत पत्रांची देवाणघेवाण करणाऱ्या गॅल्यामिना हिला स्वतःला चार वर्षांपूर्वी क्रेमलिनविरोधी निदर्शने आयोजित केल्याबद्दल दोन वर्षांची निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आली होती. नंतर तिला ‘परदेशी एजंट’ म्हणून घोषित करण्यात आले आणि ती आता राजकारणात काम करू शकत नाही.
सूर्या गंगाधरन
(रॉयटर्स)