परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी 10 जून रोजी दुसऱ्यांदा परराष्ट्र मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या स्वतंत्र अशा दुसऱ्या परदेश दौऱ्यासाठी रविवारी संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) अबुधाबी येथे दाखल झाले. त्यांचा पहिला दौरा श्रीलंकेचा होता, जिथे त्यांनी 20 जून रोजी पंतप्रधान दिनेश गुणवर्धने यांची भेट घेतली.
अबुधाबी विमानतळावर यूएईचे परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाहयान यांनी डॉ. जयशंकर यांचे स्वागत केले.
संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्रालयाने जयशंकर यांच्या भेटीबाबत निवेदन जारी केले. दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांनी अबुधाबीमध्ये एकत्र रात्रीचे जेवण घेतले, असे त्यात म्हटले आहे. त्यांनी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांतील प्रगतीचा आढावा घेतला. शेख अब्दुल्ला आणि डॉ. जयशंकर यांनी सर्व क्षेत्रांमध्ये संयुक्त सहकार्य बळकट करण्यासाठी दोन्ही देशांच्या सुरू असणाऱ्या प्रयत्नांचा आढावा घेतला. या क्षेत्रांमध्ये अर्थव्यवस्था आणि व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, संस्कृती, आरोग्य, अन्न सुरक्षा, अक्षय ऊर्जा आणि हवामान बदल यांचा समावेश आहे. शेख अब्दुल्ला यांनी भर दिला की संयुक्त अरब अमिराती आणि भारत यांच्यात मजबूत तशीच धोरणात्मक भागीदारी आहे. हे द्विपक्षीय सहकार्य कसे वाढत आहे याची गती दर्शवते. ते पुढे म्हणाले की, आमच्या सहकार्याचा उद्देश सर्वसमावेशक विकास साध्य करणे हा असून दोन्ही देशांसाठी आणि त्यांच्या नागरिकांसाठी शाश्वत आर्थिक समृद्धी सुनिश्चित करायची आहे.
2017 मध्ये दोन्ही देशांमधील संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीपर्यंत उंचावले गेले. या महत्त्वपूर्ण घडामोडींमुळे परस्पर सामंजस्य, विश्वास, आदर आणि सामायिक हितसंबंधांच्या भक्कम पायावर आधारित आधीच मजबूत असलेले संबंध आणखी दृढ आणि मजबूत झाले,” असे शेख अब्दुल्ला यांनी नमूद केले. मे 2022 मध्ये सुरू झालेल्या संयुक्त अरब अमिराती-भारत सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारामुळे (सी. ई. पी. ए.) दोन्ही देशांच्या राष्ट्रीय विकास उद्दिष्टांना आधार देणाऱ्या आर्थिक आणि व्यापारी सहकार्याला लक्षणीय चालना मिळाली आहे “, असे ते पुढे म्हणाले.
”या संदर्भात, महामहिम शेख अब्दुल्ला आणि डॉ. जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय संघटनांमधील सहकार्याच्या क्षेत्रांचा शोध घेतला, तसेच मध्यपूर्वेतील परिस्थितीसह सध्याच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण केली,” असेही त्यात नमूद केले आहे.
बैठकीनंतर परराष्ट्रमंत्र्यांनी ट्विट केले की, “आमच्या सतत वाढणाऱ्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीवर फलदायी आणि सखोल चर्चा झाली. प्रादेशिक आणि जागतिक समस्या आणि इनसाइट्स यावरही चर्चा केली.”
त्याआधी या दौऱ्याबाबत, परराष्ट्र मंत्रालयाने तीन वाक्यांच्या संक्षिप्त प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते की, “या भेटीमुळे भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी तसेच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींचा आढावा घेण्याची संधी मिळेल”. सूत्रांनी सांगितले की यात युक्रेन आणि गाझामधील संघर्षांचा समावेश असेल.
संयुक्त अरब अमिरातीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकांव्यतिरिक्त, डॉ. जयशंकर अबुधाबी येथे झालेल्या 10 व्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या समारंभात सहभागी झाले तसेच त्यांनी बीएपीएस मंदिरालाही भेट दिली. या भेटीबाबत एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी ‘भारत-संयुक्त अरब अमिराती मैत्रीचे दृश्यमान प्रतीक’ म्हणून वर्णन केले, ज्यामुळे जगाला सकारात्मक संदेश जातो आणि तो आपल्या दोन्ही देशांमधील खरा सांस्कृतिक पूल आहे, असे नमूद केले आहे.
Blessed to visit the BAPS Hindu Mandir in Abu Dhabi today.
A visible symbol of India-UAE friendship, it radiates a positive message to the world and is a true cultural bridge between our two countries.
🇮🇳 🇦🇪 @AbuDhabiMandir pic.twitter.com/6YO7gj3geZ
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) June 23, 2024
ऑगस्ट 2015 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या संयुक्त अरब अमिराती दौऱ्यादरम्यान उभय देशांमधील दृढ आणि मैत्रीपूर्ण द्विपक्षीय संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीत परावर्तित झाले.
त्यानंतर, दोन्ही देशांनी फेब्रुवारी 2022 मध्ये सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार (सीईपीए) आणि जुलै 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी भारतीय रुपया आणि एईडीच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक चलन सेटलमेंट (एलसीएस) प्रणालीवर स्वाक्षऱ्या केल्या.
हे संबंध किती मजबूत झाले आहेत याचा अंदाज या वस्तुस्थितीवरून लावता येतो की मागील 10 महिन्यांत पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीला तीन भेटी दिल्या आहेत तर शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाहयान दोनदा भारत भेटीवर आले आहेत.
फेब्रुवारी 2024 मध्ये अबुधाबी येथे बीएपीएस स्वामिनारायण मंदिराच्या उद्घाटनाने हे संबंध आणखी मजबूत झाले. अबुधाबीचे तत्कालीन युवराज आणि यूएई सशस्त्र दलाचे उप-सर्वोच्च कमांडर शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी ऑगस्ट 2015 मध्ये भेट दिलेल्या 27 एकर विस्तीर्ण जागेवर बांधण्यात आलेले देशातील पहिले मंदिर आहे.
मे 2022 मध्ये आपल्या भावाच्या मृत्यूनंतर संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष आणि अबुधाबीचे शासक बनलेले शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान (किंवा एमबीझेड या संक्षिप्त नावाने ज्यांना अनेकदा संबोधले जाते) यांनी मंदिराचे उद्घाटन करण्यासाठी आलेल्या पंतप्रधानांना मिठी मारून त्यांचे स्वागत केले होते. याप्रसंगी मोदींनी एमबीझेड या़ंचे वर्णन ‘माझा भाऊ’ असे केले होते.
इजिप्त, इथिओपिया, इराण आणि सौदी अरेबियासह, ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या उदयोन्मुख बाजारपेठ राष्ट्रांच्या समूहाचे संक्षिप्त रूप असलेल्या ‘ब्रिक्स’चा 2023 मध्ये, संयुक्त अरब अमिराती पूर्ण सदस्य बनला.
“अबुधाबीमध्ये साधने आणि दुबईमध्ये एक प्रमुख आर्थिक केंद्र असल्याने यूएई हा ब्रिक्समधील एक महत्त्वाचा भागीदार असेल,” असे ओटावा येथील फोरम ऑफ फेडरेशनचे वरिष्ठ सल्लागार अमित गुप्ता यांनी स्ट्रॅटन्यूज ग्लोबलला सांगितले.
भारतासाठी, “तो शस्त्रास्त्रांच्या विकासातील एक महत्त्वाचा भागीदारही ठरू शकतो,” याशिवाय स्वतःचे शस्त्रास्त्र उत्पादन आणि अंतराळ कार्यक्रम सुरू करण्यासाठी संयुक्त अरब अमिराती प्रयत्नशील आहे, असे सांगत त्यांनी भारताकडे सहकार्य मागितले होते.
यापूर्वीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात असे नमूद करण्यात आले होते की, “दोन्ही देश एकमेकांच्या सर्वोच्च व्यापारी भागीदारांपैकी एक आहेत, ज्यांचा सुमारे 85 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा 2022-23 मध्ये द्विपक्षीय व्यापार आहे.”
“2022-23 मध्ये थेट परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत यूएई देखील भारतातील पहिल्या 4 गुंतवणूकदारांपैकी एक आहे,” आणि “यूएईमध्ये राहणाऱ्या सुमारे 3.5 दशलक्ष प्रभावी आणि उत्साही भारतीयांचा समुदाय हा सर्वात मोठा परदेशस्थ समुदाय आहे,” असे त्यात नमूद करण्यात आले आहे.