अफगाण निर्वासितांची पाकिस्तानातून हकालपट्टी – काबूलचा दावा

0

पाकिस्तानमधील अफगाण निर्वासितांना सामूहिक निष्कासन मोहिमेदरम्यान त्यांना अटक आणि छळाचा सामना करावा लागत असल्याचा दावा इस्लामाबादमधील काबूलच्या दूतावासाने केला आहे. पाकिस्तानच्या दोन शहरांमधून शेकडो निर्वासितांना हद्दपार केल्याचा अहवाल संयुक्त राष्ट्रसंघाने नुकताच दिला.

अफगाणिस्तानात 40 वर्षांच्या सशस्त्र संघर्षादरम्यान आणि 2021 मध्ये तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर सीमा ओलांडून पाकिस्तानात आलेल्या सुमारे 40 लाख अफगाण निर्वासितांना परत पाठवण्यासाठी पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात सामूहिक हकालपट्टी मोहिम राबवण्यास सुरूवात केली आहे.

अफगाणी नागरिक अटकेत

इस्लामाबादमधील अफगाण दूतावासाने सांगितले की, त्यांच्या नागरिकांना अलीकडेच अटक करण्यात आली आहे, त्यांना शोधून काढून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आणि रावळपिंडी सोडून देशाच्या इतर भागात स्थलांतरित होण्याचे पोलिसांकडून आदेश देण्यात आले आहेत.

“कोणत्याही औपचारिक घोषणेशिवाय सुरू झालेली अफगाणी लोकांना ताब्यात घेण्याची ही प्रक्रिया अधिकृतपणे अफगाणिस्तानच्या दूतावासाला कळवण्यात आलेली नाही,” असे दूतावासाने एका निवेदनात म्हटले आहे.

पाकिस्तानने आरोप फेटाळले

पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने अफगाण निर्वासितांना त्रास दिल्याच्या आरोपाचा इन्कार केला आणि म्हटले की ही हकालपट्टी ‘अवैध परदेशी परतावा योजना’ नावाच्या 2023 च्या मोहिमेचा एक भाग होती.

“आम्हाला आशा आहे की अंतरिम अफगाण अधिकारी अफगाणिस्तानमध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण करतील, जेणेकरून हे परतलेले लोक अफगाण समाजात पूर्णपणे मिसळून जातील,” असे त्यात म्हटले आहे.

मात्र अफगाण दूतावासाच्या दाव्यानुसार पाकिस्तानी अधिकारी  भविष्यात इस्लामाबाद नजीकच्या सर्व अफगाण नागरिकांना हद्दपार करण्याची योजना आखत आहे.

“इस्लामाबादमधील अफगाणिस्तानच्या दूतावासाने पाकिस्तानी अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांशी झालेल्या बैठकीत सामूहिक हकालपट्टीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.”

केवळ वैध व्हिसाधारकांनाच इस्लामाबाद आणि रावळपिंडीमध्ये राहण्याची परवानगी दिली जाईल, असे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

यूएनएचआरसीने निर्वासन वाढीचा अहवाल दिला

संयुक्त राष्ट्र शरणार्थी संस्था, यूएनएचसीआरने सांगितले की, 1 जानेवारीपासून इस्लामाबाद आणि रावळपिंडी येथून आलेल्या निर्वासितांच्या संख्येत वाढ झाली आहे.

“स्थलांतराच्या या ताज्या आदेशामुळे अफगाणी लोकांमध्ये निर्वासन होण्याची भीती वाढली आहे,” असे त्यात म्हटले आहे.

अमेरिकेतील अफगाणांच्या पुनर्वसनावर देखरेख ठेवणाऱ्या अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या कार्यालयाला एप्रिलपर्यंत बंद करण्याची योजना आखण्यास सांगण्यात आले होते, असे अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने, एका वकिलाने आणि आदेशाशी परिचित असलेल्या दोन स्रोतांनी सांगितले.

या निर्णयामुळे अंदाजे 2 लाख लोकांना अमेरिकेत नव्याने आयुष्य सुरू करणे नाकारले जाऊ शकते, ज्यापैकी बरेचजण सध्या पाकिस्तानात अडकले आहेत.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleभारत-इजिप्त विशेष सैन्यदलांचा संयुक्त सराव राजस्थानमध्ये सुरू
Next articleApple चा नवीन बजेट iPhone; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here