एनडब्ल्यूडब्ल्यूएच्या (पश्चिम विभाग) अध्यक्ष चारू सिंग यांच्या हस्ते सोमवारी, दि. 12 सप्टेंबर 2022 रोजी, माझगाव डॉकयार्ड लिमिटेड या कंपनीतर्फे निर्मित पी17ए या मालिकेतील पाचव्या लढाऊ जहाजाचे जलावतरण करण्यात आले. चारू सिंग यांनी या जहाजाचे नामकरण ‘तारागिरी’ असे केले आहे.
एकात्मिक बांधणी पद्धतीने या युद्धनौकेची बांधणी करण्यात आली आहे. म्हणजे विविध भौगोलिक ठिकाणी नौकेच्या प्रमुख भागांचे बांधकाम करण्यात आले असून एमडीएल येथे हे भाग एकत्र आणून या युद्धनौकेची उभारणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला पश्चिमी नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हॉइस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. युद्धनौका निर्मिती आणि अधिग्रहण विभागाचे नियंत्रक व्हॉइस अॅडमिरल किरण देशमुख यांच्यासह भारतीय नौदल आणि केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या जलावतरण कार्यक्रमात सहभाग घेतला.
‘तारागिरी’ नौका मुंबई डॉकयार्डतर्फे निर्मित अशाच पद्धतीच्या दोन युद्धनौकांसोबत भारतीय नौदलाच्या माध्यमातून अपूर्व पराक्रम करून दाखविण्यासाठी देशाच्या सेवेत रुजू झाली आहे. एकूण 149.02 मीटर लांब आणि 17.8 मीटर रुंद असलेली ही युद्धनौका, दोन गॅस टर्बाइन्स आणि 2 मुख्य डिझेल इंजिनांच्या सीओडीओजी संयोजनाद्वारे चालवली जात असून, सुमारे 6670 टन वजन घेऊन स्थानांतर करताना 28 नॉट्सपेक्षा जास्त वेग प्राप्त करण्याच्या दृष्टीने तिचे डिझायनिंग केलेले आहे. प्रकल्प 17 ए अंतर्गत युद्धनौकेच्या मुख्य भागाच्या बांधणीत वापरलेले पोलाद हे स्वदेशी विकसित डीएमआर 249 ए असून ते भारतीय पोलाद प्राधिकरणाने (SAIL) उत्पादित केलेले लो-कार्बन मायक्रो अलॉय ग्रेड पोलाद आहे. स्वदेशी बनावटीच्या या स्टेल्थ युद्धनौकेमध्ये अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर्स, अत्याधुनिक कृती माहिती प्रणाली, एकात्मिक मंच व्यवस्थापन प्रणाली, जागतिक दर्जाची मॉड्युलर लिव्हिंग स्पेस, अत्याधुनिक वीज वितरण प्रणाली आणि इतर अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्ये आहेत.
या युद्धनौकेवर जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली बसवली जाणार आहे. शत्रूची विमाने आणि जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्रांच्या धोक्याचा सामना करण्यासाठी डिझाइन केलेली युद्धनौकेची हवाई संरक्षण क्षमता, व्हर्टिकल लॉन्च म्हणजेच हवेत मारा करणाऱ्या आणि लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीवर आधारित आहे. दोन 30 मिमी रॅपिड फायर गन युद्धनौकेला सर्व बाजूनी संरक्षण क्षमता प्रदान करतील तर एक एसआरजीएम गन युद्धनौकेत नौदलाच्या प्रभावी भडिमाराला पाठबळ देईल. स्वदेशी बनावटीचे ट्रिपल ट्यूब वजनाला हलके पाणतीर लाँचर्स आणि रॉकेट लाँचर्स युद्धनौकेच्या पाणबुडीविरोधी क्षमतेत भर घालतील. या युद्धनौकेच्या सहभागामुळे भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे.
प्रकल्प 17-ए अंतर्गत बांधण्यात आलेल्या या युद्धनौकेमुळे भारतीय जहाजबांधणी क्षेत्रातील कंपन्या, त्यांचे उप-कंत्राटदार तसेच संबंधित उद्योगांसाठी आर्थिक विकास, रोजगार निर्मिती असे विविध प्रकारचे अतिरिक्त फायदे झाले आहेत. या युद्धनौकेच्या निर्मितीत 75 टक्के स्वदेशी सामग्री वापरण्यात आली आहे, जी पूर्वीच्या पी-17 शिवालिक श्रेणीच्या युद्धनौकेत वापरण्यात आलेल्या सामग्रीपेक्षा जास्त आहे. देशातील प्रमुख उद्योग समूहांकडून तसेच 100हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाकडून मिळणाऱ्या मोठ्या प्रमाणात स्वदेशी उपकरणे आणि यंत्रसामग्रीसह या जहाजाची उभारणी केली जाईल. या जहाजाचे आरेखन आणि बांधणी भारतात होत आहे, जी कोणत्याही देशाच्या सामर्थ्यासाठी आवश्यक आहे. याद्वारे ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाच्या पूर्ततेसाठी देखील देशाला पाठबळ मिळत आहे.